भारतातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०१७ पासून नवीन वेतन करार लागू होत आहे, द्विपक्षीय वेतन समितीची चांगली प्रगती असून, या समितीच्या आत्तापर्यंत चार मिटिंग झाल्या आहेत . दोन ते तीन महिन्यांमध्ये वेतन कराराचा प्रश्न निकालात काढू, असे आश्वासन मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे चेअरमन श्री. राजीव जलोटा यांनी जाहीर सभेत दिले.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने युनियनचा शतकपूर्ती कौटुंबिक सोहळा, हिंद मजूर सभेचा अमृत महोत्सव, डॉ. शांती पटेल यांचा शतक महोत्सव असे औचित्य साधून ८ ऑगस्ट २०२३ रोजी डॉ. शांती पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त परेल येथील दामोदर हॉलमध्ये युनियनचा ऐतिहासिक शतकपूर्ती सोहळा ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली भव्य आणि दिव्य स्वरूपात संपन्न झाला. याप्रसंगी राजीव जलोटा यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की, मुंबई बंदराच्या विकासात गोदी कामगारांची खूप मेहनत आहे. पोर्टला जमीन भाडेरुपात जे पैसे मिळतील, त्यातील ७५ टक्के रक्कम कामगारांच्या पेन्शन फंडामध्ये टाकली जाईल. यापुढे कामगारांचा पेन्शन फंड कमी पडू दिला जाणार नाही. तीन वर्षात पेन्शन फंड पूर्ण करायचा आहे. मुंबई पोर्टच्या इतिहासात प्रथमच २०२२ व २३ या आर्थिक वर्षात गोदी कामगारांनी ६३.६१ दशलक्ष टन मालाची उलाढाल केली आहे. स्पर्धेच्या युगात आपणाकडे जास्तीत जास्त कार्गो कसा येईल, हे आमचे लक्ष आहे. आपण कार्गो साठविण्यासाठी जागा निर्माण केली आहे. गॅसचा एक प्रकल्प आला तर, आपणांस महिन्याला ४० कोटी रुपये उत्पन्न मिळेल. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत . केंद्र सरकारची काही मार्गदर्शक तत्वे आहेत, त्याच्यातून मार्ग काढला जाईल. बोनसचा प्रश्न निकाली लागला असून, आता कामगारांना यापुढे दरवर्षी बोनस मिळेल. गेल्या वेतन कराराची राहिलेली १५ टक्के थकबाकी दोन महिन्यात देण्यात येईल. जगातील आशिया खंडात आपले पोर्ट एकेकाळी सर्वात मोठे पोर्ट होते. त्यामध्ये कामगारांचा फार मोठा हिस्सा आहे. गोदी कामगारांची मुले चांगल्या मार्गाने गेली आहेत, याचा मला आनंद वाटतो. मुंबई पोर्टमधील युनियन कामगारांसाठी व कुटुंबासाठी कामगार हिताची चांगले कार्य करतात, याचा देखील मला आनंद वाटतो. कामगार कमी आहेत, याची मला जाणीव असून, यामधून देखील अत्यावश्यक कामासाठी मार्ग काढला जाईल. क्रूझ टर्मिनल मधून आपल्याला जरी पैसे कमी मिळत असले तरी, ती एक देशसेवा म्हणून आपणास करावी लागेल. कदाचित अजून आपल्याला दोन ते तीन क्रूझ टर्मिनल उभारावे लागतील. यापुढे पेन्शन फंडाला आपण कोणत्याही परिस्थितीत हात लावणार नाही.
हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी श्री. हरभजनसिंग सिद्धू यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, डॉ. शांती पटेल हे एक स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील त्यागी नेतृत्व होते. त्यांनी कामगार वर्गाला अनेक सुविधा मिळवून दिल्या आहेत. आपल्या युनियनचा इतिहास कामगार चळवळीला दिशा देणारा आहे. कोरोना काळापूर्वी आपल्या देशात १०० करोडपती होते, परंतु कोरोना काळात त्यामध्ये ६१ करोडपतींची आणखी भर पडली. काँग्रेसच्या काळात ५२ लाख कोटी कर्ज होते. परंतु २०१४ नंतर एक लाख कोटी कर्ज आणखी वाढले. जगात सर्वात जास्त बेरोजगारी आपल्या देशात आहे. आपल्या देशात रेशनिंग माध्यमातून ८२ कोटी लोकांना दोन वेळचे जेवण मिळतं. ४४ कामगार कायदे बदलून आता फक्त त्याचे ४ लेबर कोर्टमध्ये रूपांतर केले आहे. हे कायदे अमलात आल्यानंतर कामगार संप करू शकणार नाहीत. बेकायदेशीर संप केल्यास कामगार नेत्यांना अटक होईल. या कायद्यामुळे मालकांना संरक्षण मिळाले असून, कामगारांना मात्र आपल्या हक्कापासून वंचित केले. कोरोना काळात ४१ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. आपल्या देशातील परिस्थिती भयानक असून आपल्यासमोर अनेक आव्हाने आहेत, त्याचा आपणास एकजुटीने सामना करावा लागेल
आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले ॲड.एस. के. शेट्ये यांनी सांगितले की, गोदीमध्ये सर्व जाती धर्माचे कामगार चांगले काम करतात. कोरोना काळात गोदीचे कामकाज २४ तास चालू होते. गोदी कामगार कृतज्ञ आहेत. याचा मला आनंद वाटतो मुंबई पोर्टला १५० वर्ष पूर्ण झाली म्हणून कामगारांना काहीतरी भेट वस्तू द्यावी, अशी मागणी ॲड. एस.के.शेट्ये यांनी यावेळेस केली. युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात स्वातंत्र्यपूर्वी ३ मे १९२० रोजी युनियनची झालेली स्थापना, आणीबाणीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना झालेली अटक, गोदी कामगारांचे ऐतिहासिक संप, गोदी कामगारांची पगारवाढ, वैद्यकीय सुविधा, पेन्शन, नवीन वेतन करार इत्यादी शंभर वर्षातील घटनांची नोंद घेतली.
या सत्कार सोहळ्याचे सुंदर सूत्रसंचालन युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांनी केले तर आभार युनियनचे सेक्रेटरी विजय रणदिवे यांनी मानले.
याप्रसंगी संतोष कोयंडे दिग्दर्शित व गजेंद्र हिरे लिखित "कर भला सो हो भला" ही लघुनाटिका सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून दाखविण्यात आली.सुरुवातीला दीप प्रज्वलन झाल्यानंतर गणेश स्तवन, मंगळागौर, पोवाडा व दिंडी असे सांस्कृतिक कार्यक्रम दाखविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश घाडी यांनी केले.
सदर सत्कार सोहळ्यास वेस्टर्न रेल्वेमेन्स युनियनचे जे. आर. भोसले, न्यूसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर, महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर, जनरल मजूर सभेच्या अध्यक्षा संज्योत वढावकर, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरसी पारेख, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, मेरीटाईम युनियनचे अध्यक्ष कॅप्टन तुषार प्रधान, सौराष्ट्र कर्मचारी संघटनेचे शिवाजी सावंत, मुंबई टांकसाळ मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय सावंत, माजी जनरल सेक्रेटरी मुकुंद वाजे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जी.बी. गावडे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे दिल्लीतील प्रतिनिधी राजेंद्र गिरी, प्रवीण राव, न्हावा शेवा पोर्ट अँड जनरल वर्कर्स युनियनचे यशवंत कोळी, जेएनपीटीचे सेवानिवृत्त अधिकारी आनंद गुप्ते, मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष मिनास मेंडोसा, जहाज तोडणी कामगार संघटनेचे खजिनदार विकास नलावडे, मुंबई पोर्टचे सेवानिवृत्त ट्रॅफिक मॅनेजर आर. एन. शेख, सेवानिवृत् अधिकारी प्रकाश दाते, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे कार्याध्यक्ष बबन शिरोडकर, माजी कार्याध्यक्ष नंदू राणे, केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाच्या लायब्रीयन डॉ. अस्मिता देशमुख, निमंत्रित सुदेश कुडाळकर, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियनचे आहिर, जेलचे साथी सुभाष कोयंडे, युनियनचे माजी पदाधिकारी कुंदा सामंत, जयप्रकाश सावंत, श्रीकांत बिर्जे, मनीषा पेंढुरकर, मारुती विश्वासराव, रामभाऊ घाडगे, विठोबा पवार, माजी उपाध्यक्ष, संघटक चिटणीस, युनियन कर्मचारी आदी मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विविध संस्थांचे पदाधिकारी, युनियनचे पदाधिकारी, कमिटी मेंबर, कामगार, सेवानिवृत्त कामगार व कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धी प्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन
addComments
टिप्पणी पोस्ट करा