झाड एक मंदिर' : विचार देणारी किशोर कादंबरी डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

'झाड एक मंदिर' ही स्वाती कान्हेगावकर यांची किशोर कादंबरी पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनाने नुकतीच प्रकाशित केली आहे. लेखिकेने पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा विषय अतिशय लालित्यपूर्ण शैलीत हाताळला आहे. हेमाआजी हे ह्या कादंबरीतील मध्यवर्ती पात्र आहे. किंबहुना हेमाआजी हीच ह्या कादंबरीची नायिका आहे. हेमाआजीची मुलं, नातवंडं परदेशात स्थायिक झाले आहेत. गल्लीतील जग्गू, रीना, ओंकार, मनी, सोनी, रीमा, ही मुले दररोज आजीकडे येतात. शेजारच्या ह्या नातवंडांना ही आजी माया लावते. त्यांना दररोज वेगवेगळा खाऊ देते. जीवनोपयोगी गोष्टी सांगून त्यांच्या मनावर संस्कारांची शिल्पं कोरते. पण हे निव्वळ कोरडेपणाने नाही, तर जिवीच्या जिव्हाळ्याने.


आजीने ज्या गावाची गोष्ट सांगितली आहे, त्या गावाचे नावच मुळी 'सुंदरवाडी' असे आहे. त्या गावात दोन त्यागी आणि कर्तबगार माणसे राहत होती. लोक त्यांना 'नाना' आणि 'तात्या' ह्या नावानेच ओळखायचे. ह्या दोघांचा गावाला मोठा आधार वाटायचा. त्यांनी गावात खूप झाडे लावली होती आणि ती जोपासली होती. त्यांनी लावलेला एक विशाल वटवृक्ष वाटसरूंचा आधार बनला होता. पशुपक्ष्यांचा आशियाना बनला होता. ह्या झाडावर चिमण्या पाखरांनी आपली घरटी बनवली होती. ह्या झाडाच्या सावलीत सगळी चिमणी पाखरं निर्धास्त होती. 


हेमाआजी दररोज सायंकाळी ह्या नातवंडांना ह्या झाडाची आणि चिमण्या पाखरांची गोष्ट खुलवून फुलवून सांगत असते. आजीची गोष्ट इतकी रंजक आणि उत्कंठावर्धक आहे, की सगळे बाळगोपाळ आजीच्या गोष्टीत रंगून गेले होते. चिमणीच्या गोष्टीच्या माध्यमातून आजी 'आपली पायवाट आपल्यालाच तयार करावी लागते', अशी प्रेरणादायी वाक्ये सांगते. आजीच्या गोष्टीचा प्रभाव असा की जग्गू "स्वतःचे काम स्वतः करायचे आणि जमेल तेवढी मदत इतरांनाही करायची" असा निष्कर्ष काढतो. असे जीवनोपयोगी विचार मुले आचरणात आणतात. 


आजीला गुलाबाची फुले देऊन मुले आजीविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. 

त्या वेळी आजी म्हणते, "बाळांनो, रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेली काही नाती दाट आणि जवळची असतात".

आजीने गोष्टीच्या प्रवाहात काही पुराणकथा सांगून बालवाचकांना शाश्वत जीवनमूल्यांशी परिचित केले आहे. रामायण, महाभारत आणि महात्मा गौतम बुद्धांच्या जीवनातील ह्या उद्बोधक गोष्टी आहेत. 


ह्या कादंबरीतील मुले आपसात भांडतातही आणि एकमेकांना समजून घेतातही. पोरवयच असंच असतं. 

ह्या गोष्टीतली मुले जशी गुणी आहेत, तशीच ह्या गोष्टीतली चिमणी पाखरेही कामसू, प्रामाणिक, इमानदार आणि मेहनती आहेत. झाड संकटात सापडल्यावर सगळेच आपल्या एकीचे बळ दाखवितात. गावाचा, वाटसरूंचा आणि चिमण्या पाखरांचा आसरा असलेले विशाल झाड तोडायला काही माणसे येतात. तिथे त्यांना श्रीकृष्णाचे मंदिर बांधायचे असते. नाना आणि तात्या त्या लोकांना गोवर्धनधारी श्रीकृष्णाची गोष्ट सांगून निरुत्तर करतात. त्यांना परत पाठवतात. 


दुस-या दिवशी पुन्हा काही लोक येतात. त्यांना ते झाड तोडून त्या ठिकाणी बौद्धविहार बांधायचे असते. नाना आणि तात्या त्यांना वृक्षप्रेमी बुद्धाची गोष्ट सांगून परत पाठवतात. सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींमधील संघर्ष लेखिकेने अतिशय संयमाने हाताळला आहे. 

आजीची ही नातवंडे ह्या गोष्टीशी इतकी एकरूप होतात, की झाडाची आणि पशुपक्ष्यांची सुखदुःखे त्यांना आपलीच वाटायला लागतात. आजी ह्या नातवंडांना पर्यावरणसंरक्षण, बेसुमार वृक्षतोड, नदीतील वाळूउपसा, कारखान्यांतील सांडपाणी इ. प्रश्नांविषयी सावध करते. 

कादंबरीच्या शेवटी हे समजते की नानाआजोबा हे दुसरे तिसरे कोणी नसून आजीचे पती होते. नाना आणि तात्या हे निसर्गधर्माचे आणि मानवताधर्माचे पाईक म्हणून समोर उभे राहतात. निसर्गरक्षणासाठीचा त्यांचा समर्पणभाव अतिशय अनुसरणीय आहे. 


सुंदरवाडीची गोष्ट ऐकून मुले पेटून उठतात. झाडांचे पूजन हेच ईश्वरपूजन होय, हे त्यांच्या लक्षात येते. झाड हेच एक मंदिर आहे, हे ह्या बाळगोपाळांना मनोमन पटले आहे. नानाआजोबांचे अपूर्ण राहिलेले काम पुढे नेण्याचा ते संकल्प करतात. धरतीमातेचे रक्षण करण्याचा निर्धार करतात.

लेखिकेची भाषा आणि कथनशैली अतिशय ओघवती आहे. चित्रदर्शी वर्णनांमुळे गोष्टीतील 'तो' परिसर वाचकांच्या नजरेसमोर साकार होतो. कादंबरीचे शीर्षकच मुळात वाचकमनावर प्रसन्नतेचा शिडकावा करून जाते. 


ह्या कथेतील हेमाआजी म्हणजे प्रेममय, मायाळू आणि वात्सल्यमूर्ती आहे. ही आजी म्हणजे संस्कारांचे विद्यापीठ आहे. ही कादंबरी म्हणजे दोन पिढ्यांचा संवाद आहे. ह्या संवादातून बालसुलभ कुतूहल व्यक्त होते. गोष्टीच्या माध्यमातून ही आजी बालकुमारांच्या मनांची मशागत करून त्यात सुसंस्कारांचे सहजी बीजारोपण करते. ही आजी भूतदया शिकविते. प्राणिमात्रांवर प्रेम करायला शिकविते. निसर्गातच ईश्वराचे रूप पाहायला शिकविते. लेखिकेने ह्या कादंबरीच्या माध्यमातून बालकुमारांच्या मनात पर्यावरणवादी विचारांची ज्योत पेटविली आहे. आपल्या मनातील संवेदनशीलता बालवाचकांच्या मनात रुजविण्यात लेखिकेला कमालीचे यश लाभले आहे. 


माधव चुकेवाड यांनी प्रस्तावनेत आणि डॉ. अलका पोतदार यांनी पाठराखणीत ह्या लेखिकेचे लेखनविशेष नेमकेपणाने टिपले आहेत. 

सरदार जाधव यांच्या मुखपृष्ठाने आणि आतील रंगीबेरंगी चित्रांनी ह्या पुस्तकाच्या सौंदर्यात मोलाची भर घातली आहे. दिलीपराज प्रकाशनाने बहुरंगी छपाई करून आपल्या समृद्ध परंपरेला साजेशी, पुस्तकाची निर्मिती अतिशय देखणी केली आहे. बालसाहित्यात लक्षणीय भर घातल्याबद्दल लेखिका आणि प्रकाशक हे दोघेही अभिनंदनास पात्र आहेत! 


झाड एक मंदिर ( किशोर कादंबरी) 

लेखिका : स्वाती कान्हेगावकर 

मुखपृष्ठ आणि सजावट : सरदार जाधव 

प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे. 

पृष्ठे ७० किंमत रु. १७० 


sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या