बालकवितेतील विभाचे विभ्रम डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

मा. श्री. उद्धव कानडे यांचा 'बोल विभा बोल' हा बालकवितासंग्रह पुण्याच्या संस्कृती प्रकाशनाने प्रकाशनासाठी सिद्ध केला आहे. ह्या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार दि. २५ ऑगस्ट रोजी पुण्यात संपन्न होत आहे. वास्तविक ह्या सोहळ्यासाठी मला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण होते, पण माझ्या अडचणीमुळे मला हे निमंत्रण स्वीकारता आले नाही. हरकत नाही. प्रकाशनाच्या निमित्ताने ह्या कवितेविषयी लिहिण्याची संधी घेतो आहे. 

नातवंडं आजोबांना घोडा व्हायला भाग पाडतात. आपल्याला खांद्यावर घेऊन चंद्र दाखवायला आजोबांना भाग पाडतात. काही नातवंडं आजोबांना बालकविता लिहायची प्रेरणा देतात. नातवंडांविषयी कविता लिहिणं हा आजोबांच्या दृष्टीनेही भाग्ययोग असतो. दुधावरची साय असतेच तशी गोड! कवी उद्धव कानडे हे अशा भाग्यवंत आजोबाांपैकी एक आहेत. विभा नावाच्या नातीने त्यांना ह्या बालकविता लिहिण्याची प्रेरणा दिली. कवितेनंतरची कवीची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे विभा. विभा म्हणजे कवीच्या दृष्टीने दुसरी कविताच जणू! विभा म्हणजे कवीच्या आयुष्याच्या अंगणातील नक्षत्र आहे. त्या ममत्वातूनच 'बोल विभा बोल' हा देखणा बालकवितासंग्रह सिद्ध झाला आहे.

सुख म्हणजे काय? सुंदर काय आहे? अक्षर म्हणजे काय? स्वप्नांचा झुला असतो का? दीदी म्हणजे काय? झाड म्हणजे काय? पुस्तक म्हणजे काय? आकाश म्हणजे काय? नदी म्हणजे काय? सुंदर फूल कोणतं? पाणी म्हणजे काय? यासारखे विभाचे बालसुलभ प्रश्न आजोबांना विचारप्रवृत्त करतात आणि आजोबातील कवीला कविता लिहायला प्रवृत्त करतात. आजोबा आणि नात यांच्यातील हा सगळा लडिवाळ संवाद ह्या बालकवितेत आविष्कृत झाला आहे.

ही विभा म्हणजे कवीसाठी ज्ञानाची भूपाळी आहे. अमृताचा थेंब आहे. चांदण्याचा गाव आहे. कवीची संजीवनी आहे. म्हणूनच कवी ह्या संजीवनीला उद्देशून म्हणतो:

'तुझी वाट नवी, तुझा सूर्य नवा

मनात ठेवावे निर्मळ पाणी

सुखासाठी हवी सुंदर वाणी

माणूसपणाची हिरवी गाणी'

अशा नितांत नितळपणाने ही बालकविता फुलत जाते.

सुंदर काय आहे? ह्या प्रश्नाच्या उत्तरादाखल कवी लिहितो :

'सुंदर डोळे बघती सुंदर

सुंदर सरिता, सुंदर कविता

सुंदरतेने जीवन भरले

ती मनात असते सुंदरता'

दृष्य सुंदर आणि ते पाहणारी दृष्टीही सुंदर, असे ह्या कवितेचे स्वरूप आहे. सत्य, शिव, सौंदर्याचा साक्षात्कार घडविणाऱ्या ह्या कवितेत सकारात्मकता ओतप्रोत भरलेली आहे.

'आईचे शब्द अक्षर असतात

संतांचे शब्द अक्षर होतात'

असा ममत्वाचा आणि कृतज्ञतेचा संस्कार ही कविता देऊन जाते.

'स्वप्नांचा एक झुला असतो

तो प्रत्येकाला हवाच असतो

डोळ्यांमधल्या अनंत रंगांतून

जन्म स्वप्नांचा होतच असतो'

अशा शब्दांत ही कविता स्वप्नांचा अर्थ उलगडून दाखवते.

पशुपक्ष्यांशी संवाद साधत ही कविता बाळगोपाळांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाते.

'दीदीसंगे तुझे नाते

प्रकाश - वातीचे

प्रेमाचे हे धागे सारे

आकाश - मातीचे'

प्रकाश आणि वातीचे जे नाते, आकाश आणि मातीचे जे नाते, तसे आपले गणगोताशी असलेले घट्ट नाते ही कविता ह्या दोन अभिन्न प्रतिमांतून उलगडून दाखवते.

'झाडे उन्हाळे पिताना

त्यांना संतपण येते

वेदनेत डोलताना

झाड पांडुरंग होते'

झाडांची थोरवी यापेक्षा वेगळ्या शब्दांत कशी सांगता आली असती? यातूनच कोवळ्या जीवांचा झाडांसोबतचा जागता जिव्हाळा वाढीस लागू शकतो.

कवी असलेल्या आजोबांचा पुस्तक हा तर सच्चा मित्र! ह्या मित्राबद्दल कवी कृतज्ञतापूर्वक लिहितो :

'वेदना आणि संवेदनांना

पुस्तक मोठा आधार असते 

सुख-दु:ख, ज्ञान - विज्ञान

पुस्तकातच बंद असते'

कवीने नदीची ओळख फारच छान शब्दात करून दिली आहे :

'शांत आणि संयमी

असते नदीचे वाहणे

पाण्यामधून नदी गाते

एक समतेचे गाणे'

समतेचे गाणे गाणारी नदी बालकुमारांना आवडली नाही, तरच नवल!

सुंदर फूल कोणतं? ह्या प्रश्नाचे उत्तर देताना कवीने म्हटले आहे,

'माणसाइतकं मोठं

माणसाइतकं सुगंधी

माणसाइतकं सुंदर

जगात दुसरं फूल नाही'

कवीने माणसाचा केलेला हा गौरव माणूसपणाचे मूल्य वाढविणारा आहे.


ह्या कविता कवीने आपल्या नातीसाठी लिहिलेल्या असल्या, तरी ह्या केवळ नातीपुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत. नातवंडांचे निष्पाप आणि निरागस बालपण ह्या कवितेच्या शब्दाशब्दांत प्रतिबिंबित झाले आहे. विभाच्या निमित्ताने कवीची प्रज्ञा आणि प्रतिभा जगातल्या सगळ्या नातवंडांसाठी मुक्तपणे आविष्कृत झाली आहे. तमाम बाळगोपाळांसाठी हे जीवनाचं गाणं बनलं आहे. चित्रकार संतोष घोंगडे यांनी ह्या कवितांना छान सजविले आहे. बालसाहित्याचे अभ्यासक प्रा. विश्वास वसेकर यांनी ह्या पुस्तकाची समर्पक शब्दांत पाठराखण केली आहे.

संस्कृती प्रकाशनाच्या संचालिका सौ. सुनीताराजे पवार यांनी पुस्तकाची निर्मिती अतिशय अप्रतिम केली आहे!

'बोल विभा बोल' (बालकवितासंग्रह)

कवी : उद्धव कानडे

प्रकाशक : संस्कृती प्रकाशन, पुणे.

पृष्ठे ४० किंमत रु १४०

मुखपृष्ठ आणि सजावट : संतोष घोंगडे

sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या