डॉ. भगवान अंजनीकर हे एक बहुप्रसवा लेखक, कवी आहेत. त्यांचा हात अखंड लिहिता असतो. आजवर त्यांची कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्रे, प्रवासवर्णन इ. वाङ्मयप्रकारांतील १३५ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यापैकी ५४ पुस्तके बालसाहित्याची आहेत. १० जून २०२३ रोजी त्यांची 'माझ्या लहानपणाच्या गोष्टी' ही बालकादंबरी प्रकाशित झाली आहे. ह्या पुस्तकात त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या बालपणीच्या आठ गोष्टी आहेत. ह्या गोष्टी अतिशय उद्बोधक आहेत.
लेखकाचा जन्म एका खेड्यातला. वयाच्या ७०व्या वर्षी लेखकाने आपल्या बालपणीच्या, म्हणजे ५०-५५ वर्षांपूर्वीच्या कटूगोड आठवणींना उजाळा दिला आहे. ५०-५५ वर्षांपूर्वीचे बालपण आणि आणि आजचे बालपण आणि एकंदरीत जीवन, शिक्षणपद्धती, सोयीसुविधा यात खूप बदल झालेला आहे. ह्या दोन्हींची तुलना करून लेखकाने आपल्या नातवांच्या वयाच्या बाळगोपाळांना विश्वासात घेऊन काही गुजगोष्टी सांगितल्या आहेत.
लेखक १९६४ साली चौथी पास झाले. गावात पाचवीचा वर्ग नसल्यामुळे त्यांनी गावाजवळच्या नागणी ह्या गावी पायी येजा करत सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. दररोज तीन किलोमीटर काट्याकुट्याची वाट तुडवत अनवाणी जायचे आणि यायचे. त्या वयात केलेल्या खोड्या आणि उनाडक्याही त्यांनी प्रांजळपणे कबूल केल्या आहेत. पाऊलवाटेवर काटे रोवण्याच्या चुकीबद्दल पश्चात्तापही व्यक्त केला आहे. पुन्हा अशी चूक करायची नाही, असा निर्धार वयाच्या अकराव्या वर्षी केला आणि तो आयुष्यभर पाळला.
प्रत्येकाचे बालपण परिसराचा मागोवा घेत आणि चांगल्या - वाईटाचे अनुकरण करत घडत असते. लेखकाने बालपणी रामकाका आणि गणूकाका यांना व्यायाम करताना पाहिले आणि त्यांच्यासारखा पहिलवान होण्याचा संकल्प सोडला. त्यासाठी गायीचे दूध काढून परस्पर चोरून प्यायला सुरुवात केली. आई रागावली, पण वडलांनी पाठिंबा दिला. आपले उदाहरण देऊन लेखकाने आजकालच्या मुलांच्या अरबट - चरबट खाण्याच्या सवयींवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. सकस आणि पौष्टिक आहाराकडे बाळगोपाळांचे लक्ष वेधले आहे.
बालपणी लेखकाला कंदिलाच्या उजेडात एकट्याने अभ्यास करताना भीती वाटत असे. त्या भीतीवर मात करण्यासाठी, अभ्यासात आईची सोबत व्हावी, म्हणून लेखकाने एक नामी युक्ती शोधून काढली.
रात्री 'श्यामची आई' हे पुस्तक आईला पोथीच्या चालीवर हेल काढत वाचून दाखवायचे. विशेष म्हणजे आईलाही सानेगुरुजींची ही मंगल पोथी आवडली.
लेखकाचा अभ्यास झाला आणि आईला नवीन पोथी ऐकायला मिळाली. बारा वर्षांच्या वयातील लेखकाची ही युक्ती कौतुकास्पद आहे. अभावग्रस्ततेतून घडलेले लेखकाचे आयुष्य बालकुमार वाचकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
मनोहर नावाच्या कामचुकार बालमित्राला लेखकाने कशी अद्दल घडवली, याचा किस्सा मुळातून वाचण्यासारखा आहे. ह्या गोष्टीतून लेखकाने बालकुमारांना, 'मित्र करा. मैत्री संपादन करा. एकमेकांना समजून घ्या. वेळीच आपल्यातील दोष ओळखून ते दूर करा', हा संदेश दिला आहे.
पोरपणात चोरी करून फळे खायला मुलांना फार आवडते. तसा प्रयोग लेखकाने आपल्या बालपणी केला होता. मित्रांसोबत रांजणीच्या शाळेत जाताना
शेतकऱ्याचा डोळा चुकवून, चोरून पेरू खाल्ले होते. शेतकऱ्याने सरपंचांकडे तक्रार केली. सरपंचांनी पाचही मित्रांना पारावर बोलावून सर्वांसमक्ष समज दिली. हुशार म्हणून ओळखले जाणारे पोरं गावाच्या नजरेत 'चोर' ठरले. लेखकाने त्याचा पश्चात्ताप तर केलाच, पण त्याच वेळी 'यापुढे चोरी करणार नाही. फुकटचे खाणार नाही' अशी प्रतिज्ञा केली आणि ती आयुष्यभर पाळली.
५०-५५ वर्षांपूर्वी मोबाईल तर सोडाच, पण साधे फोनसुद्धा नव्हते. म्हणून काही बिघडले नाही. बालपणी लेखकाने आपल्या मित्रांना सोबत घेऊन खापराच्या नळ्यांना दोरा बांधून फोनवर बोलण्याचा आनंद घेतला होता. हा किस्सा वाचल्यावर बालकुमारांमधील कल्पकता आणि प्रयोगशीलता आपल्या लक्षात येते. त्या अडनिड्या वयात लेखकाला काही तरी नवीन करण्याचा नाद लागला होता. ह्या प्रयोगाविषयी शाळेत समजल्यावर मुख्याध्यापकांनी व्यासपीठावर बोलावून लेखकाची पाठ थोपटली होती. त्या कौतुकामुळे लेखकाला धडपड करण्याची सवय लागली. त्यातूनच त्यांच्यातील लेखकाचा विकास होत गेला. लेखक म्हणतो, अजूनही माझी धडपड संपलेली नाही.
एकदा भरत नावाच्या मित्राला अपघात झाला. त्याच्या ऑपरेशनसाठी ३०० रुपये लागणार होते. तेव्हाचे ३०० रुपये म्हणजे आजचे ३० हजार रुपये. भरतच्या वडलांकडे एवढे पैसे नव्हते. लेखकाने आणि मित्रांनी मिळून गणेशोत्सवात चिखलाच्या गणेशमूर्ती बनवून गावात विकल्या. त्यातून दीड हजार रुपये जमा केले. भरतच्या ऑपरेशनसाठी ३०० रुपये दिले आणि उरलेले बाराशे रुपये शाळेच्या मुख्याध्यापकांना दिले. त्यातून गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. ह्या गोष्टीतून लेखकाने इतरांसाठी काही तरी करण्याचा संदेश दिला आहे. बालवयातील ही संवेदनशीलता आणि सहकार्य करण्याची वृत्ती लाखमोलाची आहे!
पुस्तकाच्या शेवटी लेखकाने आपल्या रागीट वडलांची प्रेमळ गोष्ट सांगितली आहे. ह्या गोष्टीतून लेखकाने काटकसरीचा संदेश बिंबविला आहे. बालपणी लेखकाकडे साधनांचा अभाव होता, पण आनंदाचा अभाव नव्हता. सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या आजच्या बालकुमारांना लेखकाने जबाबदारीची जाणीव करून दिली आहे.
हे पुस्तक म्हणजे सानेगुरुजींच्या 'श्यामची आई'सारखीच प्रेमळ पोथी आहे. यात कुठेही उपदेशाचे डोस पाजले नाहीत. आजोबाने आपल्या नातवाला मांडीवर घेऊन प्रेमाने कुरवाळत गप्पा माराव्यात, तसे इथे हितगुज साधले आहे. लेखकाने आपली जडणघडण सांगत बालकुमारांजवळ मन मोकळे केले आहे. मानवी जीवन म्हणजे भल्याबु-या अनुभवांची गोळाबेरीज असते. डॉ. भगवान अंजनीकर यांनी अतिशय प्रांजळपणे मांडलेली आपल्या बालपणाची गोळाबेरीज आजच्या बालकुमार वाचकांसाठी हितोपदेशाचे काम करील, असा विश्वास वाटतो.
मधुराज पब्लिकेशन्सने आणलेला हा गोड गोष्टींचा खजिना म्हणजे बालवाचकांसाठी पर्वणीच आहे!
माझ्या लहानपणाच्या गोष्टी
( बालकादंबरी)
लेखक : डॉ. भगवान अंजनीकर
मुखपृष्ठ : संतोष घोंगडे
प्रकाशक : मधुराज पब्लिकेशन्स, पुणे.
पृष्ठे ४८ किंमत रु ७०
sureshsawant2011@yahoo.com
addComments
टिप्पणी पोस्ट करा