मुंबई दि.२१ :सरकार कुणाचे जरी असले तरी फॉर्म भरलेल्या प्रत्येक गिरणी कामगाराला घर मिळवून दिल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही,अशी ग्वाही राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी येथे कामगारांच्या मेळाव्यात बोलताना दिली.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने संस्थेचे आद्य संस्थापक कामगार महर्षी स्व.गं.द.आंबेकर यांची ११६ वी जयंती आज महात्मा गांधी सभागृहात पार पडली.या औचित्याने गिरणी कामगारांच्या मुलांचा शिष्यवृत्ती व शैक्षणिक सहाय्याने गुणगौरव करण्यात आला.त्या वेळी सचिन अहिर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.समारंभाला ज्येष्ठ पत्रकार आणि नाटककार ज्ञानेश महाराव,संघाच्या गं.द.आंबेकर होमिओपॅथी दवाखान्याच्या डॉक्टर रुपाली जाधव,महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम प्रमुख पाहुणे उपस्थित होते.प्रारंभी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले.सुरुवातीला आंबेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांचे पुण्य स्मारण करण्यात आले.
आमदार सचिन अहिर आपल्या भाषणात पुढे म्हणाले,आम्ही पाच कामगार संघटना आप-आपले झेंडे बाजूला ठेवून कृती संघटनेच्या बॅनरखाली एकत्र आलो, म्हणून आज विस्थापित होऊ पहाणा-या गिरणी कामगारांना मुंबईत घराचा हक्क प्राप्त करुन देण्यात यशस्वी ठरलो आहोत. आंबेकरजींनी गिरणी कामगारांच्या आर्थिक मागण्या मिळवून देताना त्यांना मालकी हक्काची घरे मिळवून दिली,असे सांगून सचिन अहिर म्हणाले,त्यांनी दिलेला विधायक विचार आजच्या कामगार चळवळीला मार्ग दर्शक ठरला आहे.
सरचिटणीस गोविंदराव मोहिते म्हणाले, आंबेकरजींनी कामगारांना मागण्या मिळवून देताना त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेला अधिक महत्त्व दिले.तोच विचार आत्मसात करण्याची गरज आहे.
ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव म्हणाले,पायाने चालतात ते अंतर गाठतात आणि डोक्याने चालतात ते ध्येय गाठतात.स्व.गं.द.आंबेकर यांनी कामगार चळवळीत दूरदृष्टी ठेवून वाटचाल केली म्हणूनच आज त्यांचा वारसा टिकून आहे.डॉक्टर रुपाली जाधव कामगारांच्या मुलांना नैराश्य झटकून ध्येय पुढे नेण्याचे आवाहन केले.या प्रसंगी .खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर सूनिल बोरकर, जी.बी.गावडे, सुनिल अहिर,राजन भाई लाड,संजय कदम सेक्रेटरी शिवाजी काळे,साई निकम आदी मान्यवर उपस्थित होते.उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.***
addComments
टिप्पणी पोस्ट करा