आता मव्हं काय'! : लक्षणीय आत्मकथन डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

डॉ. देवीदास तारू यांचे 'आता मव्हं काय!' हे आत्मकथन मेहता पब्लिशिंग हाऊसने जून २०२३मध्ये प्रकाशित केले आहे. सावत्रपणाच्या जाचात बालपण करपून गेलेल्या एका उपेक्षित, पण प्रज्ञावंत मुलाची ही आतडी पिळवटून टाकणारी गोष्ट आहे. एकलव्याच्या निष्ठेने स्वतःला घडविणाऱ्या एका जिद्दी मुलाची ही प्रेरणादायी गोष्ट आहे. सुरुवातीच्या ८ पृष्ठांमध्ये लेखकाने आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी सांगितली आहे. माय जमनाबाई आणि बापू कचरू यांचा हा मुलगा. नाव जरी देवीदास असले, सगळे 'दैदास्या' ह्या नावानेच पुकारतात. बापू नांदेड टेक्स्टाईल्स मिलमध्ये मजूर. लग्नानंतर नऊ वर्षांत पहिल्या बायकोला मूलबाळ होत नाही, म्हणून कचरूने दुसरी बायको करून आणली. गिरजाबाई तिचं नाव. हीच लेखकाची सावत्र आई. दुसरी पत्नी गिरजाबाई काळी असूनही आवडती, तर पहिली पत्नी जमनाबाई गोरी असूनही नावडती. गिरजाबाईला गंगाधर नावाचा मुलगा झाल्यानंतर दोन तीन वर्षांनी जमनाबाईच्या पोटी 'दैदास्या' जन्मला. लेखकाने आपल्या सख्ख्या आईचे वर्णन एका वाक्यात केले आहे : 'दिसायला गोरी, पण तोंडात सुरी'. 

लेखकाचा जन्म भीमघाट ह्या दलित वस्तीत झालेला. ह्या भागात पक्की घरे नाहीत किंवा कोणत्याही भौतिक सुविधा नाहीत. केवळ झोपडपट्टी. लेखकाने ह्या वस्तीचे फारच छान वर्णन केले आहे : 'शहराच्या एवढी जवळ, पण प्रगतीपासून कोसो दूर!' 

झोपडपट्टीचे सगळे गुणधर्म ह्या वस्तीत आहेत. 

बापूची अवस्था : 'दोन बायका अन् फजिती ऐका!' अशी. शेवटी बापूने शेजारी दुसरी झोपडी बांधून त्यात लेखकाला आणि त्याच्या आईला ठेवून दिले. नायक एक वर्षाचा असताना आई त्याला अफू खाऊ घालून झोपवायची आणि बोरबन फॅक्टरीत कामाला जायची. 

घरच्या दारिद्र्यामुळे दैदास्या म्हणजे एक कुपोषित बालक. 

आई भाजीपाला व फळे विकण्यासाठी दिवसभर घराबाहेर असे. वडलांचे मुलावर अजिबात लक्ष नसे. त्यामुळे दैदास्या खोड्या करत गावभर भटकत असे. नायकाचे शालेय शिक्षण सलग असे झालेच नाही. त्याच्या शिक्षणाचा कोणी आग्रहही धरला नाही. गोट्या खेळणे, नदीत मनसोक्त डुंबणे, मासे पकडणे, उनाडक्या करणे, भांडणे आणि मारामाऱ्या करणे, बिड्या ओढणे, दारू पिणे, मंदिरासमोरच्या चप्पल-बूट चोरून आणून विकणे, पत्त्यांच्या डावावर बसून करमणूक करणे, हॉटेलमध्ये वेटरचे काम करणे, सिनेमा पाहणे, मिरवणुकीत काठीचे जीवघेणे खेळ खेळणे, दुकानदाराचे पैसे चोरून पळून जाणे, रेल्वेतून विनातिकीट भटकणे, उगीचच कोणालाही चिडवणे किंवा शिवीगाळ करणे, समजले तर वडलांचा हाग्यामार खाणे यातच लेखकाचे बालपण करपून गेले होते. पण उन्मार्गी वर्तनात आनंद मानणा-या नायकाला या गोष्टींचा खेदही नव्हता आणि खंतही नव्हती. नायक स्वेच्छेने त्या मार्गावर गेला नव्हता, तर तो सगळा परिस्थितीचा आणि पर्यावरणाचा परिपाक होता. 

लेखकाने शिवाजी विद्यालयात पाचवीला प्रवेश घेतला आणि त्याच्या आयुष्याला वळण लागले. येथील शिक्षकांनी जीव लावून नायकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. देवीदासच्या अंगच्या उपजत कलागुणांचा विकास करून त्याला 'माणूस' म्हणून घडविले. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडले. या सर्व गोष्टींची लेखकाने कृतज्ञतापूर्वक नोंद केली आहे. घरात वीज नसल्यामुळे लेखकाने नगरपालिकेच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला. शाळाबाह्य विद्यार्थी म्हणून दहावीची परीक्षा ६३ टक्के गुणांसह उत्तीर्ण केली. दहावीनंतर डी. एड्. करून शिक्षक बनायचे होते, पण त्याच वर्षीपासून डी. एड्. प्रवेश बारावीनंतर सुरू झाले. त्यामुळे ते स्वप्न लांबणीवर पडले.

कॉलेजला शिकत असताना शिष्यवृत्ती कपातीच्या कारणावरून विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा काढला. मंत्र्यांना घेराव घातला. परिणामी कॉलेजने प्रवेशच रद्द करून टाकला. पुढे समजूतदारपणे माघार घेत देवीदास हीरो झाला. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे देवीदासच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी आकार आला. राज्य सरकारच्या पुरस्काराचा तो मानकरी ठरला. विद्यार्थी संसदेचा अध्यक्ष बनला. डी. एड्. ची संधी हुकली, तरी पदवीधर झाल्यावर बी. एड्. करून माध्यमिक शिक्षक बनला. सामाजिक कार्यात सहभागी होत बचतगटांची स्थापना केली.

अधिकारी बनण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा ध्यास घेऊन खूप मेहनत केली. जेतवननगराच्या विकासात भरीव योगदान दिले. धडपड्या शिक्षक म्हणून शाळा नावारूपाला आणली. सेवांतर्गत एम. ए. आणि पीएच.डी. ह्या पदव्या मिळविल्या. राज्यस्तरीय प्रशिक्षक म्हणून काम केले. लेखकाच्या आयुष्याचा हा आलेख नजरेत भरण्यासारखा आहे.

आता शिक्षकांची आत्मकथनं येऊ लागली आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे! 

ह्या आत्मकथनाची भाषा अतिशय साधी, सोपी आणि सरळ आहे. ह्या शैलीला आलंकारिकतेचा अजिबात सोस नाही. 'आता मव्हं काय!' हे केवळ आत्मकथनाचे शीर्षक नसून एका विशिष्ट टप्प्यावर लेखकाने आत्मपरीक्षण करताना अंतर्मुख होऊन स्वतःलाच विचारलेला प्रश्न आहे. इथूनच लेखकाची मर्मदृष्टी विकसित झाली. ह्या प्रश्नाच्या उत्तरातूनच लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत गेला आहे. आत्मकथनाच्या सुरुवातीच्या निम्म्या भागात लेखकाने स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून स्वतःच स्वतःची उलटतपासणी केली आहे. हे करताना त्यांनी स्वतःची वकिली मात्र केली नाही. आत्मकथनाच्या उत्तरार्धातील नायकाच्या विकासाचे विविध टप्पे स्तिमित करतात. 'हाच का तो प्रवाहपतित झालेला दैदास्या?' असा प्रश्न वाचकाला पडतो. दैदास्याच्या अवस्थांतराची ही हकिगत मोठी रोमांचकारी आहे. 

लेखकाने आत्मकथनाची मांडणी छोट्या छोट्या ६५ प्रकरणांमधून केली आहे. प्रकरणांची शीर्षकेही प्रासयुक्त आणि उत्कंठावर्धक आहेत. लेखकाने सावत्रपणाचे चटके सोसले असले, तरी कोणावरही आगपाखड केली नाही. बापू, सख्खी आई, सावत्र आई अशा सगळ्यांनाच समजून घेतले आहे. यातून लेखकाचे समंजस आणि समजूतदार व्यक्तिमत्त्व अभिव्यक्त झाले आहे. लेखकाने शहरी अधोविश्वाची ओळख अतिशय प्रत्ययकारी पद्धतीने करून दिली आहे. दारिद्र्याचे दशावतार प्रच्छन्नपणे मांडले आहेत. दारिद्र्यातील दिलदारपणाचे किस्से वाचकमनाला हलवून जातात. मानवी स्वभावाचे कंगोरे अतिशय बारकाईने टिपले आहेत. लेखकाने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटलेल्या सुह्रदांविषयी पानोपानी कृतज्ञता व्यक्त केली आहे. आपल्या फसलेल्या पहिल्या प्रेमप्रकरणाची प्रांजळ कबुली दिली आहे. शिक्षण संस्थेतील आर्थिक शोषणावर एक कटाक्ष टाकला आहे. हे जसे एका लेखकाचे आत्मकथन आहे, तसेच हे एका झोपडपट्टीचे आणि तेथील दुर्लक्षित जनजीवनाचे स्वकथन आहे. 

स्वतःच्या लग्नातील मानपानाचा आणि नातेवाईकांच्या वर्तनाचा प्रसंग लेखकाने तटस्थपणे सांगितला आहे. नायकाची झालेली वंचना आणि उपेक्षा पाहिल्यावर हा खडकावरचा अंकुर आहे, अशीच प्रतिमा वाचकमनात निर्माण होते. नायकाची सामाजिक परिवर्तनाविषयीची तळमळ दिसून येते. शिक्षणाची आणि एकएक गड सर करण्याची नायकाची जिद्द पाहिल्यावर ह्या नायकाने महात्मा गौतम बुद्धांचा 'अत्त दीप भव' हा संदेश आपल्या आयुष्यात तंतोतंत उतरविला आहे, हे आपल्या लक्षात येते. नायकाची संवेदनशीलता आणि सर्जनशीलता अनेक प्रसंगांतून प्रतिबिंबित झाली आहे. 

शिक्षणाचा ध्यास घेतला, तर माणसाच्या जीवनात क्रांती होऊ शकते, हा मुद्दा लेखकाने ह्या आत्मकथनात अतिशय जोरकसपणे अधोरेखित केला आहे. लेखकाने स्वतःसह, गणगोतापैकी कोणाच्याही चुकांवर पांघरूण घातले नाही. लेखकाने कुठेही स्वतःचे समर्थन केले नाही. प्रयत्नपूर्वक वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, हे लेखकाने दाखवून दिले आहे. आयुष्याचा पूर्वार्ध कितीही काळाकुट्ट असला, तरी उत्तरार्ध उज्ज्वल करता येतो, हे लेखकाने सिद्ध केले आहे. हे अतिशय प्रांजळ आणि म्हणूनच प्रेरणादायी आत्मकथन आहे.

'आता मव्हं काय!' (आत्मकथन)

लेखक : डॉ. देवीदास तारू

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.

मुखपृष्ठ : संतोष घोंगडे 

पृष्ठे १६०. किंमत रु. ३००


sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या