शिक्षण खात्यातील वरिष्ठ पदावरून नुकतेच निवृत्त झालेले अधिकारी श्री. नामदेव माळी यांनी मराठी साहित्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 'आभाळदानी', 'शंभर टक्के निकाल' आणि 'तरवाड' हे त्यांचे ३ कथासंग्रह असून 'खरडछाटणी' आणि 'छावणी' ह्या २ कादंब-या प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांनी प्राथमिक शिक्षकांना लेखनासाठी प्रवृत्त करून त्यांची 'शिक्षकांची आत्मवृत्तं' आणि 'ज्ञानरचनावाद' ही २ पुस्तके संपादित केली आहेत. नामदेव माळी यांनी विद्यार्थ्यांसाठी लेखन कार्यशाळा घेऊन आणि विद्यार्थ्यांची साहित्य संमेलने आयोजित करून विद्यार्थ्यांनाही लेखनाची प्रेरणा दिली. 'शाळकरी मुलांच्या कविता' आणि 'किलबिल गोष्टी' ही बालकुमारांची २ पुस्तके संपादित करून प्रकाशित केली आहेत. नामदेव माळी यांचे शिक्षणविषयक चिंतन 'शाळाभेट' आणि 'चला लिहू या' ह्या २ पुस्तकांत अभिव्यक्त झाले असून ह्या दोन्ही पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे पुरस्कार मिळाले आहेत.
'एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य' ही त्यांची बालकुमारांसाठीची कादंबरी साधना प्रकाशनाने नुकतीच प्रकाशित केली आहे. ह्या कलाकृतीत कल्पित आणि वास्तवाचे बेमालूम मिश्रण साधले आहे. गौरव हा शाळकरी मुलगा ह्या कादंबरीचा नायक आहे, की गब्रू नावाचा बलदंड कोंबडा ह्या कादंबरीचा नायक आहे, हा प्रश्न कायम राहतो. गब्रूच्या माध्यमातून लेखकाने पशुपक्ष्यांच्या आणि माणसांच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला आहे.
सांगली शहराच्या नव्याने विकसित होत असलेल्या भागात हे कथानक आकाराला येते. या भागात गौरव आपल्या आईवडलांसोबत आणि एका बहिणीसोबत राहत असतो.
गौरवची आजी एका खेड्यात राहत असते. तिच्या सोबत तिच्या कोंबड्या असतात. गावी ती सतत आजारी पडत असते, म्हणून तिच्या कोंबड्यांसह तिला सांगलीला घेऊन येतात.
गौरवची आजी तशी फारच भारी आहे.
शिकलेली नाही, पण हुशार आहे.
तिचे जीवनविषयक तत्त्वज्ञान तितकेच जबरदस्त आहे. ती नेहमी म्हणते, खाऊन माजावं, पण टाकून माजू नये.
कसं जगावं ते माणसानं जनावरं आणि पाखरांकडून शिकावं.
दुस-याच्या सुतळीच्या तोड्याला हात लावू नये.
नमून वागावं, पण लाचार होऊ नये.
मानानं पान खावं.
विनाकारण झाडाच्या फांद्या तोडू नयेत.
रात्री झाडं झोपलेली असतात. त्यांची फळं तोडू नयेत. इ.
झोपलेल्या झाडांचा विचार करणारी आजी किती संवेदनशील असेल, याची कल्पना करा!
कोंबड्या म्हणजे तिचा जीव की प्राण!
लेखकाने केलेले गब्रू कोंबड्याचे वर्णन वाचण्यासारखे आहे :
'बापरे! हा कोंबडा म्हणायचा की डायनॉसोर! हॉलिवूडच्या हॉरर चित्रपटात शोभेल असा कोंबडा. उंच मान. डोकीवर लालभडक तुरा. डोकीच्या खालच्या बाजूला गळ्याला तसाच पोळीसारखा लालभडक कल्ला. मानेवर तांबूस पिवळी पिसं. गुबगुबीत अंग. पैलवानाच्या मांड्यासारख्या मांड्या. गुडघ्यापर्यंत पिसं. शेपटीचा कमान झाल्यासारखा झुबका. काळी पांढरी पिसं. पंख केशरी, लाल. चमकदार. पोटाला काळी पिसं. तो उभा राहिला, की सूर्यप्रकाशात पिसं चमकायची. डौलानं चालू लागला, की त्याचा रुबाब एखाद्या राजासारखा असायचा. तसा तो गौरवच्या घरातला राजाच होता'.
भारी तगडा आहे गब्रू. तामिळी सिनेमातल्या हीरोसारखा. एकदम कडक!
असा बलदंड कोंबडा बघितल्यावर कोणीही घाबरणारच. गब्रूच्या नादाला सहसा कोणी लागत नसे. गौरवच्या घरात यायला त्याचे मित्रसुद्धा घाबरायचे.
गौरवला शाळेत पाठविण्यासाठी त्याची आई आग्रही असते. त्या वेळी आजी म्हणते, शिकायला साळंतच कशाला जायला पायजे? शिकायचं म्हटलं, की कोणाकडूनही शिकता येतं.
गौरव आणि त्याचे मित्र वेदान्त, श्रावणी, गायत्री, सुमरन, समृद्धी, प्रतीक, सलीम यांचा एक कट्टा आहे. त्या कट्ट्याचं नाव आहे 'सृजन कट्टा'. ह्या कट्ट्यावर रविवारी सगळे मित्र एकत्र येतात. चिकित्सक वृत्तीची ही मुले पुस्तके वाचून त्यावर चर्चा करतात. आपली मतं लिहून, बोलून व्यक्त करतात. लिहिलेल्या गोष्टी एकमेकांना वाचून दाखवतात. मनसोक्त गप्पा मारतात. समाजातील प्रमुख लोकांच्या मुलाखती घेतात. ही मुले वादविवादसुद्धा घालतात. कोंबड्यांनी दाणे टिपावेत, तसे आपल्याला अनुभव टिपता आले पाहिजेत, असे ह्या मुलांचे मत होते.
सृजन कट्ट्यावरची मुलं कोंबडा आणि इतर पक्षी, पक्ष्यांच्या गोष्टी, पक्ष्यांच्या सवयी, पक्ष्यांचे आवाज, पक्ष्यांचे उपयोग, पक्ष्यांविषयीचे गैरसमज, अंधश्रध्दा या विषयांवर चर्चा करतात. पक्ष्यांच्या गोष्टीतील लोककथा, रुढी, परंपरा आणि संस्कृती यांची चर्चा करतात. ह्या मुलामुलींना प्राण्यांचे गुरगुरणे, विव्हळणे आणि केकाटणे यातील फरक समजतो.
आपण घुबडाला अशुभ समजतो, पण घुबड हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, हे ह्या मुलामुलींना चांगले माहीत आहे.
प्रश्न विचारणं हा आपला हक्क आहे, हे सृजन कट्ट्यावरची मुलं शिकली होती. दयादादा, कृष्णातदादा, अर्चनाताई हे शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतात.
ही काल्पनिक पात्रे नसून लेखकाच्या सहवासात वावरणारी हाडामांसाची माणसे आहेत.
सृजन कट्ट्यावर भाषण करताना गौरव म्हणतो, 'शाळेत फक्त बेलके पोपट आणि ताटाखालचे मांजर नाही, तर गाणारे पक्षी आणि डरकाळ्या फोडणारे वाघ तयार व्हायला हवेत.... चार भिंतीची वर्गखोली आणि गोठा यामध्ये फरक तो काय? जनावरांचं दावं दिसतं. आमचं दिसत नाही'.
गौरवच्या ह्या वाक्यांवरून सृजन कट्ट्यावरची ही मुलं किती 'पार' आहेत, याची वाचकाला कल्पना येते. ही सगळीच फार कल्पक आणि गुणी मुले आहेत.
गब्रू कोंबडा पहाटे लवकर उठून आरवत असे. ह्या कोंबड्याच्या आरवण्यामुळे आमची झोपमोड होते. त्यामुळे त्याच्या आरवण्यावर बंदी घालावी, अशी तक्रार शेजारच्या आजीआजोबांनी पोलिसांत केली होती. पोलिसांनी चौकशी करून कोंबड्याच्या नैसर्गिक आरवण्यावर बंदी घालता येत नाही, असे सांगितले.
आजीआजोबांनी पुन्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. आजीआजोबांच्या तक्रारीमुळे आणि कोंबड्याच्या आरवण्यावर बंदी घालण्याच्या कल्पनेमुळे गौरवसह सृजन कट्ट्यावरची सगळी मुले अस्वस्थ झाली होती. दिवस आणि रात्र यातील फरक सांगून कोंबडा देवाचं काम करतोय, यावर ह्या मुलांचा विश्वास आहे. गब्रूचा आरवण्याचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी सगळी मुले जिद्दीने पेटून उठली होती.
इथपर्यंतचे कथानक वास्तवावर आधारित आहे. पुढच्या २० पृष्ठांमध्ये लेखकाने फॅण्टसीचा, म्हणजे अद्भुतरम्यतेचा आधार घेतला आहे. असे चमत्कार बालसाहित्यात घडू शकतात. किंबहुना बालवयाची ती गरजच असते. बालकुमारांना कल्पनेच्या अद्भुतरम्य विश्वात रमायला आवडते. झोपेत, स्वप्नात गौरव हा बहादूर कोंबडा बनतो आणि गब्रू कोंबड्यासोबत जंगलात जातो.
तिथे पशुपक्ष्यांची सभा भरलेली आहे. त्या सभेत सगळे पशुपक्षी मानवाच्या चुकीचे आणि दुर्गुणांचे पाढे वाचतात.
पोपट म्हणाला, 'माणसांच्या राज्यात सुंदर असणं आणि गुन्हेगार असणं सारखंच आहे. ते आम्हाला पिंजऱ्यात डांबतात'.
माकड म्हणाले, 'भीक मागून खाण्याची पद्धत फक्त माणसांतच आहे. त्यांनी पर्यटन स्थळांवरच्या आमच्या बांधवांना ती सवय लावली आहे'.
चिमणी म्हणाली, 'झगमगता प्रकाश आणि धडाडधूम आवाजानं दिवाळीत जीव नकोसा होतो. फटाक्यांच्या आवाजानं दरवर्षी हजारो पक्षी मरतात'.
अशा प्रकारे सगळ्या पशुपक्ष्यांनी मानवाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ह्या कादंबरीत पेचप्रसंगांचे एक अभिनव नाट्य आहे, जे उत्तरोत्तर खुलत जाते.
शेवटी लोकशाहीदिनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आजीआजोबांच्या तक्रारीवर सुनावणी होते. तिथे गौरवची आजी गब्रूची बाजू ठामपणे मांडते.
गब्रूही आपली बाजू मांडतो. इथेही अद्भुतरम्यता आहेच. निकाल देताना जिल्हाधिकारी गब्रू कोंबड्याचा आरवण्याचा अधिकार, अर्थात अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करतात. तक्रारदार आजींच्या मनातही भूतदया जागी होती. मानवतामूल्य होते. त्याला अनुसरून त्यांनी आपली चूक कबूल केली. आपले एकाकीपणाचे दु:ख सगळ्यांसमोर उजागर केले.
ह्या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने एकाकी वृद्धांच्या समस्येकडे वाचकांचे लक्ष वेधले आहे. लेखकाने संघर्षांतून आणि वादविवादातून कादंबरीचा आनंदपर्यवसायी शेवट केला आहे.
कादंबरीची भाषा अतिशय ओघवती आहे. 'पंख झाला नीट। चिमणी झाली धीट' यांसारखी काव्यमय वाक्ये भाषेची लज्जत वाढवतात. संपूर्ण कादंबरीत इखारी, व्हट, टम्म, टुच्च, खुडूक, सजागती, कुसव, छकाटी, तराट, तालेवार, गब्रू, थान, गिन्यान, इ. ग्रामीण बोलीभाषेतील शब्दांची अक्षरशः रेलचेल आहे. ह्या शब्दांमुळे भाषेचे सौंदर्य आणखी वाढले आहे. माया आटणे, माया पातळ होणे यांसारखे वाक्प्रचार बालकुमारांची भाषिक समृद्धी वाढवतात. 'कोंबड्यानं बांग दिली
मला ग बाई जाग आली
सुपात जोंधळं घोळीते
जात्यावर दळण दळीते'
यासारख्या जात्यावरच्या ओवींमधून बालकुमारांची लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीपासून तुटत चाललेली नाळ पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखकाने ९० पृष्ठांच्या एका छोट्याशा कलाकृतीत पशुपक्ष्यांसोबतचे मानवी सहजीवन, ग्रामीण लोकजीवनातील एकोपा, शहरी जीवनातील औपचारिकता, दुरावत चाललेले मानवी नातेसंबंध, औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण, अनुभवांतून आलेले शहाणपण, बालकुमारांमधील सर्जनशीलता, त्यांचे कुतूहल जागविण्याची आवश्यकता, भूतदया, लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती, समकालीन शिक्षणातील फोलपणा, पशुपक्ष्यांचे आणि मानवाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सुखी सहजीवनासाठी समंजसपणाची आवश्यकता, पर्यावरणसंरक्षण आणि पर्यावरणसंवर्धन इ. विविध विषय अतिशय कौशल्याने हाताळले आहेत. ही कादंबरी रंजक तर आहेच, पण थेटपणे कोणताही उपदेश न करता ही कादंबरी विचार करण्यास प्रवृत्त करते.
गौरवच्या प्रथमपुरुषी निवेदनातून ही उत्कंठावर्धक कादंबरी फुलत जाते.
'कॉक' आणि 'क्लॉक' ह्या दोन शब्दांमध्ये फक्त एकाच अक्षराचा फरक असला, तरी
दोघांचेही काम मात्र सारखेच आहे, हे गौरवला समजले आहे.
'आमची सांगली। लै लै चांगली।' अशा घोषणा ह्या कादंबरीत घुमतात. हे कथानक निसर्गरम्य वातावरणात उलगडत असल्यामुळे पशुपक्ष्यांच्या हास्याची किलबिल, चिवचिव, गुणगुण, रुणुझुण सर्वदूर ऐकायला मिळते. चिवचिव, कावकाव, कुहूकुहू, किलबिल, गुटर्गूं, डरावडराव, गुणगुण, सळसळ, टिकटिक, फुरफुर, छनछन अशा स्वरांच्या आणि सुरांच्या लकेरी वाचकमनाला वेढून टाकतात. लेखकाने केलेली निसर्गवर्णने वाचकांच्या मनाला मोहिनी घालतात.
लेखकाने संपूर्ण आयुष्य शिक्षणक्षेत्रात व्यतीत केलेले असल्यामुळे शिक्षणातील फोलपणावर त्यांनी अक्षरशः आसूड ओढले आहेत.
उदाहरणार्थ :
पोपट म्हणतो,'माणसांनी सांगेल तेवढेच बोलण्यासाठी, त्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या आहेत. तिथे ते बोलके पोपट तयार करतात'.
बहादूर कोंबडा म्हणतो, 'शाळेत शिकवलेलं आणि प्रत्यक्षात समाजात, घरात जे घडतं, ते खूप परस्परविरोधी असतं'.
हाच बहादूर पुढे म्हणतो, 'जगाला प्रेम अर्पावे असे आम्ही म्हणतो, पण प्रेम अर्पण करणाऱ्या माणसांपेक्षा भांडणारी माणसंच अधिक दिसतात'.
'परीक्षेच्या वेळी ढगफुटीसारखी पेपरफुटी होते'
अशा शब्दांत लेखकाने पुस्तकी शिक्षण आणि जीवनव्यवहारातील विसंगतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे.
लेखकाने आपल्या आयुष्याची सुरुवात शिक्षकी पेशातून केलेली असल्यामुळे त्यांचा बालमानसशास्त्राचा अभ्यास पक्का आहे, हे त्यांच्या लेखनातून आणि चिंतनातून प्रकर्षाने जाणवते.
झुंज लावण्यासाठी कोंबडे पाळणे व त्यांना त्रास देणे जुर्म आहे, अशा विधानांतून बालकुमारांची संवेदनशीलता जागविण्याचा प्रयत्न केला आहे.
देशपातळीवरील आणि जागतिक पातळीवरील पशुपक्ष्यांच्या संबंधातील विविध घटनाघडामोडींचे पडसाद ह्या कादंबरीत उमटले आहेत. पशुपक्ष्यांच्या संदर्भातील गैरसमज आणि अंधश्रद्धांचे लेखकाने अक्षरशः उत्खनन केले आहे. सनातनी विचारांच्या लोकांना अक्षरशः झोडपले आहे. प्रतिगामी लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घातले आहे. ही कलाकृती जगण्याकडे बघण्याची एक निखळ दृष्टी देऊन जाते.
आपल्या विचारांचं, अभिव्यक्तीचं रूपांतर चांगल्या कृतीत झालं पाहिजे, असा संदेशही लेखकाने दिला आहे.
'एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य'
(बालकादंबरी)
लेखक : नामदेव माळी
मुखपृष्ठ व आतील चित्रे : गिरीश सहस्रबुद्धे
प्रकाशक : साधना प्रकाशन, पुणे
पृष्ठे ९० किंमत रु. १२५
sureshsawant2011@yahoo.com
addComments
टिप्पणी पोस्ट करा