घराच्या प्रश्नावर २५ रोजी धडक मोर्चा.बास झाली आश्वास ने,आता हवी कृती! -गोविंदराव मोहिते



  *मुंबई दि.१३ :गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर बास झाली आश्वासनं आता हवी कृती! या मागणीसाठी येत्या पावसाळी अधिवेशन काळात दि.२५ रोजी सकाळी ११ वाजता आझाद मैदान येथून विधान भवनवर गिरणी कामगारांचा धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे,अशी माहिती गिरणी कामगार संघटना कृती समितीचे नेते, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी दिली आहे.* 

     हा धडक मोर्चा राज्य सरकारला धडकी‌ भरावी,असाच प्रचंड करण्याचा कामगार कृती संघटनेने निर्धार केला आहे,सर्वश्री जयश्री खाडिलकर पांडे, गोविंदराव मोहिते, जयप्रकाश भिलारे,निवृत्ती देसाई,अण्णा शिर्सेकर, प्रविण घाग, नंदू पारकर, प्रविण येरुणकर, बजरंग चव्हाण,बबन गावडे, जितेंद्र राणे, सुनिल बोरकर,साई निकम इत्यादी कामगार नेत्यांची मजदूर मंझील मध्ये सभा होऊन वरील प्रमाणे निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

    मोर्चाच्या प्रचारा साठी या नेत्यांनी दि.२ ते ११ जुलै पर्यंत गिरणी कामगार वास्तव्याला असलेल्या ग्रामीण भागात या सभा आयोजित केल्या होत्या.पुणे कोल्हापूर,सातारा,सांगली इत्यादी ठिकाणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनचे सरचिटणीस जयप्रकाश भिलारे, सेंच्युरी मिल एकता मंचचे सरचिटणीस जितेंद्र राणे,रा.मि‌.म.संघाचे सहचिटणीस साई निकम यांच्या पुढाकाराने सभा पार पडल्या,वाईत सेक्रेटरी शिवाजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडल्या.सर्वश्री सखाराम भणगे, भगवान पाटील, सुधाकर निकम आदी कार्यकर्त्यांनी सभेत भाग घेतला. कणकवली, कुडाळ,सिंधुदुर्ग मध्ये सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे प्रमुख नंदू पारकर,बबन गावडे,पाटणकर,तर पोलादपूर, रायगड पट्ट्यात बबन मालुसरे,पोयनाड आलिबाग मध्ये विलास म्हात्रे,अशोक म्हात्रे,प्रमिला पाटील आदी स्थानिक कार्यकर्त्यांनी सभेत भाग घेतला.तर चिपळूण,रत्नागिरी इत्यादी ग्रामीण भागातील प्रचार सभांनाही गिरणी कामगारांनी मोठी गर्दी केली.जवळपास सर्वत्र मोठ्याच सभा पार पडल्या.घरे मिळण्याच्या मंद गतीवर‌ या सर्व सभांमधून कामगारांनी नाराजीचा सूर काढला,अशी माहिती देऊन गोविंदराव मोहिते यांनी म्हटले आहे,दि.२८/६/२०१२,दि.९/५/२०१६, दि.२/१२/२०१६ आणि दि.१/३/ २०२० अशा चार वेळेच्या सोडतीत जवळपास १५,८९३ घरे कामगारांना मिळाली.त्या साठी जवळपास २० वर्षे आम्हाला ‌लढावे लागले.मग फॉर्म भरलेल्या १लाख ७५ हजार कामगारांना घरे कधी मिळणार?त्या साठी किती वर्षे लढावे लागणार आहे?असा संतप्त सवाल करून गोविंदराव मोहिते यांनी म्हटले आहे, विद्यमान सरकारने या प्रश्नावर नेमलेल्या संनियंत्रण समितीने फॉर्म भरलेल्या सर्वच कामगारांना घरे कशी आणि कधी देणार? हे निश्चित सांगितलेले नाही.या प्रश्नावर सरकारच्या समर्पक उत्तरासाठी २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता विधान भवनवर धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

    गिरणी कामगारांना घरांचा हक्क " गिरणी कामगार कृती सघटने"च्या लढ्यातून मिळाला आहे.मात्र राज्य सरकारने नेमलेल्या संनियंत्रण समितीवर एकाही कामगार नेत्याला घेण्यात आलेले नाही,अशी खंत व्यक्त करून गोविंदराव मोहिते यांनी म्हटले आहे, गिरणी कामगारांच्या घरांचा न्याय्य हक्क तत्कालीन गृहनिर्माण राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर यांच्या प्रमुख सहकार्यामुळे मार्गी लगला.पण सह्याद्री येथील चावी वाटप कार्यक्रमाला त्यांना कार्यक्रमाचे साधे निमंत्रणही देण्यात आलेले नाही. 

    ज्या गिरणी कामगारांनी मुंबईचे वैभव वाढविले.स्वातंत्र्य लढ्यात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान दिले.त्या गिरणी कामगारांच्या प्रश्नावर निव्वळ राजकारण नको.तरआम्हाला घरे हवी आहेत.नाहीतर शेवटच्या कामगाराला ‌घर मिळे‌ पर्यंत गिरणी कामगार कृती संघटनेचा लढा तीव्र होईल,असा इशारा कामगार नेते गोविंदराव मोहिते यांनी दिला आहे.

  मोर्चाद्वारे घरांसाठी प्रस्तावित ११०एकर जमीन लवकरात लवकर म्हाडा कडे सुपूर्द करावी! सिडकोने खारघर येथील घरे गिरणी कामगारांना देण्यास मान्यता द्यावी,या प्रमूख मागण्या करण्यात येणार आहेत.गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत जागेची उपलब्धता  

कमी आणि मागणी मात्रा मोठी हे विषम प्रमाण कमी करण्यासाठी, गिरणी कामगार कृती समितीने वरील प्रमाणे मागण्यां लावून धरल्या आहेत, असेही गोविंदराव मोहिते यांनी म्हटले आहे.गिरणी कामगार कृती समितीत सहा कामगार संघटना एकत्र येऊन ‌लढत आहेत***

टिप्पण्या