भांडवलधार्जिणे सरकार घालविण्यासाठी श्रमिकांनी एकजुटीने लढा देण्याची गरज - हरभजनसिंग सिद्धू



भारतात वाढती महागाई व बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून, दीडशे वर्षांपूर्वी कामगारांच्या संघर्षातून निर्माण झालेले कामगार कायदे नष्ट केले जात आहेत. हेच सरकार जर पुन्हा आले तर, भविष्यात येणारा काळ फार कठीण आहे. त्यासाठी आपापसातील मतभेद बाजूला ठेऊन भांडवलधार्जिणे सरकार घालविण्यासाठी कष्टकरी व श्रमिकांनी एकजुटीने लढा देण्याची गरज आहे, असे स्पष्ट उद्गार हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी श्री. हरभजनसिंग सिद्धू यांनी मुंबईत एका सभेत काढले.

हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिलच्या कार्यकारणीची सभा २४ जुलै २०२३ रोजी न्युसी कार्यालयात महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे कार्याध्यक्ष सुधाकर अपराज यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

सुरुवातीला हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी श्री. हरभजनसिंग सिद्धू यांचे स्वागत करून, त्यांची इंटरनॅशनल कॉमनवेल्थ ग्रुपच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कामगार संघटनांच्या वतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

हरभजन सिंग सिद्धू आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, दिल्लीत १० केंद्रीय कामगार संघटना एकत्रित आल्या असून २४ ऑगस्टला शेतकरी व कामगार यांचे संयुक्तपणे सम्मेलन होणार आहे . या संमेलनामधून आपल्या एकजुटीचे दर्शन होईल. देशभर ९ ऑगस्टला क्रांति दिनाच्या दिवशी शेतकरी व कामगार एकजुटीने मोर्चे व बाईक काढून केंद्र सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणाचा जाहीर निषेध करणार आहेत. महाराष्ट्रात देखील जिल्हास्तरीय बाईक रॅली व मोर्चे निघणार आहेत. आताचे सरकार सत्तेवर आले तेव्हा जाहीर केले होते की, दोन कोटी लोकांना रोजगार दिले जातील. रोजगार तर मिळालेच नाही, परंतु भारत हा लोकसंख्या व बेरोजगारीमध्ये जगातील एक नंबरचा देश झाला आहे. भांडवलदारांना झुकते माफ दिले जात असून, कष्टकरी कामगारांचे मात्र हाल होत आहेत. असंघटित कामगारांना किमान वेतन देखील मिळत नाही. पोर्ट, रेल्वे, स्टील, बँक इत्यादी सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करून कंत्राटी कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या असंघटित कामगारांना संघटित करणे हे कामगार चळवळीसमोर खरे आव्हान आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे जनरल सेक्रेटरी संजय वढावकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिल या संघटनेच्या कार्याचा आढावा देऊन २६ व २७ ऑगस्ट २०२३ रोजी कोल्हापूर येथे होणारे महाराष्ट्र हिंद मजूर सभेचे अधिवेशन यशस्वी करावे असे सर्वांना आवाहन केले, तर खजिनदार निवृत्ती धुमाळ यांनी कोल्हापूर येथे होणाऱ्या अधिवेशनाविषयी सविस्तर माहिती दिली.

या सभेत कार्याध्यक्ष सुधाकर अपराज, एसटी कामगारांचे नेते संदीप शिंदे, म्यून्सिपल मजदूर युनियनचे नेते अशोक जाधव, कविस्कर, न्युसीचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदळगावकर, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, मेरीटाईम युनियनचे अध्यक्ष तुषार प्रधान, वेस्टर्न रेल्वेमेन्स युनियनचे नेते जे. आर.भोसले, विकास गुप्ते, नॅशनल रेल्वेमेन्स युनियनचे जनरल सेक्रेटरी वेणू नायर, नाशिक मिंट टाकसाळ मजदूर सभेचे नेते जगदीश गोडसे, मुंबई टांकसाळ मजदूर सभेचे नेते मुकुंद वाजे, जनरल मजदूर सभेच्या अध्यक्षा संज्योत वढावकर, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या खजिनदार कल्पना देसाई यांनी उद्योगनिहाय कार्याचा आढावा दिला. हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिलचे पदाधिकारी राजेश टाकेकर यांनी आभार मानले.


आपला

 मारुती विश्वासराव

टिप्पण्या