वाजेगांव जिल्हा परिषद शाळेच्या आजी आणि माजी मुख्याध्यापकांच्या विरोधात शापोआ कामगारांचे अमरण उपोषण

 


सीईओ कडे सीटू ची तक्रार]

नांदेड :

शहरा लगत असलेल्या वाजेगांव जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक श्री बाबुराव जाधव हे षडयंत्र रचून शालेय पोषण आहार कामगारांना लक्ष करीत आहेत आणि राजकारण करून तक्रार का केली म्हणून मनामध्ये राग धरून शालेय शिक्षण समितीच्या काही लोकांना हाताशी धरून कामगारांना कामावरून काढून टाकण्यासाठी बेकायदेशीररित्या दबावतंत्राचा वापर करीत असल्याची लेखी तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्या कडे सीटू संलग्न महाराष्ट्र शालेय आहार कामगार संघटनेच्या वतीने केली आहे.दि.१३ जुलै रोजी दिलेल्या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक,जिल्हा शिक्षणाधिकारी (प्रा.)जि.प.नांदेड तसेच गट शिक्षणाधिकारी पं.स.नांदेड यांना देण्यात आल्या आहेत. दि.१७ जुलै रोज सोमवारी पीडित महिला कामगारांच्या वतीने जिल्हा परिषदे समोर अमरण उपोषण सुरु करण्यात येणार आहे.

मागील पंधरा ते वीस वर्षांपासून अत्यंत तुटपुंज्या मानधनावर विध्यार्थ्यांना मध्यानह भोजन देण्याचे कार्य करणाऱ्या महिला नामे श्रीमती रेखाबाई श्यामराव गजभारे,कांताबाई सोमाजी तारू,सयाबाई प्रकाश राक्षसमारे,महरून बेगम शेख हुजूर,बेगमबी शेख गफार आदी करतात. पूर्वी जि.प.प्रा.शाळा वाजेगांव येथे बाराशे विध्यार्थी पट संख्या होती परंतु अचानक विध्यार्थी संख्या निम्याहून कमी झाल्याचे विद्यामान मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे.

यापूर्वी बोगस विद्यार्थी पट संख्या दाखवून अन्नधान्य व इंधन,भाजीपाला व इतर बिलापोटी मोठ्या प्रमाणात रक्कम उचलून अनियमितता केली असल्याची गंभीर तक्रार संघटनेने केली आहे.

उपरोक्त कामगारांना बिलापोटी कमी पैसे देऊन दमदाटी केली जात आहे आणि कमी प्रमाणात पैसे दिले जात आहेत.तक्रार केल्यास कामावरून कमी करून दुसरे कामगार घेण्यात येतील अशा धमक्या देण्यात येत आहेत.सन २०१७ जून ते २०२३ पर्यंत एकूण किती विध्यार्थी शाळेत होते आणि किती धान्य व रक्कम उचलली आहे. या सर्व बाबींची वरिष्ठ समिती मार्फत चौकशी करून अपहार करणाऱ्या विरुद्ध विविध कलमान्वे व फोजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी उपोषणार्थीनी केली आहे. तातडीने योग्य कारवाई केली नाहीतर जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र शालेय आहार कामगार संघटनेचे सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने चौकशी सुरु केली असल्याचे समजते आहे परंतु संघटनेस अद्याप कसल्याही प्रकारचे अधिकृत पत्र प्राप्त झाले नाही असे देखील कॉ. गायकवाड यांनी सांगितले आहे

टिप्पण्या