रवींद्र खंदारे यांचे 'संघर्ष हेच सामर्थ्य' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

सातारा येथील उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांचे 'संघर्ष हेच सामर्थ्य' हे आत्मकथन पुण्याच्या चपराक प्रकाशनाने जानेवारी २३मध्ये प्रकाशित केले. ह्या पुस्तकाच्या सहा महिन्यांत चार आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. ही ह्या पुस्तकाच्या वाचकप्रियतेची एक पावतीच आहे, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही. आज उपशिक्षणाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या रवींद्र खंदारे यांनी आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत खूप खस्ता खाल्ल्या आहेत. त्यांच्यासाठी ही वाटचाल साधी, सोपी आणि सरळ मुळीच नव्हती. 


रवींद्र हा कोरडवाहू, अल्पभूधारक आणि राबत्या शेतकरी कुटुंबातील थोरला मुलगा. अभावग्रस्ततेत घडत असलेल्या चार भावंडांमधला अतिशय संवेदनशील आणि काळजी वाहणारा भाऊ. 

शेतीवर गुजराण होत नाही, म्हणून वडलांनी काही दिवस कोल्हापुरात हमाली केली. आईने गावी शेतमजूर म्हणून आणि शहरात बांधकाम मजूर म्हणून काम केले. आईवडलांनी बालपणापासून रवींद्रच्या मनावर श्रमसंस्कारांचे मूल्य बिंबविले. 

रवींद्रने स्वतःच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी भंगार गोळा करणे, लोकांच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करणे, विहिरीतील खडक फोडणे, पाझर तलावावर मजुरी अशी सर्व प्रकारची कष्टाची कामे न लाजता केली. आपला मुलगा शाळा शिकत, रिकाम्या वेळात भंगार गोळा करतोय, याचे आईवडलांना वाईट वाटायचे, पण त्यांचाही नाइलाज होता. भंगार गोळा करताना जशा लेखकाच्या शरीराला जखमा झाल्या, तशा त्या मनालाही झाल्या. लेखक ह्या आत्मकथनात जीवनानुभवांना थेटपणे भिडताना दिसतो. 


 झोपडपट्टीतील वास्तव्य, सभोवतालची घाण यामुळे आलेले अनारोग्य आणि गरिबीमुळे येणारे कुपोषण ह्या बाबी अपरिहार्यच होत्या. लेखकाचे शालेय शिक्षण म्हणजे आजन्म त्रिस्थळी यात्राच होती. लेखकाच्या कुटुंबाला कधीच स्थैर्य लाभले नाही. उपजीविकेसाठी सारखी भटकंती करावी लागत असे. विंचवाचे बि-हाड पाठीवर, अशी सगळी अवस्था. परिणामी रवींद्रच्या शिक्षणाची आबाळ आणि ससेहोलपट होत गेली. वेगवेगळ्या गावी विस्थापन आणि पुन्हा नवीन शाळा, असा सगळा मामला होता. आईवडील फारसे शिकलेले नसले, तरी लेकरांच्या शिक्षणासाठी आग्रही होते. 

लेखकाला सुदैवाने चांगले शिक्षक लाभले. मामामामीचाही आधार लाभला. त्यामुळे शिक्षणाची गाडी धीम्या गतीने का होईना, पण चालत राहिली. लेखकाला शाळेने जितके शिकविले, त्यापेक्षा अधिक प्रतिकूल परिस्थितीने शिकविले.


शेती हा जुगार असला, तरी वडलांना शेतीची आवड असल्यामुळे विहीर पाडण्यासाठी, पाईपलाईन करण्यासाठी, बैल खरेदी करण्यासाठी, दुभती जनावरे खरेदी करण्यासाठी वेळोवेळी कर्ज घेतल्यामुळे कुटुंबाभोवती सावकारी पाश आवळला गेला. नाइलाजाने शेती विकावी लागली. हे एक दुष्टचक्र आहे. ही शेतीप्रधान कुटुंबांची सार्वत्रिक शोकांतिका ह्या कुटुंबाच्या बाबतीतही घडली. कृषिसंस्कृतीतील सगळे खाचखळगे आणि बारकावे लेखकाने मोठ्या चिकित्सक पद्धतीने टिपले आहेत. लेखकाचे सबंध निवेदन अतिशय प्रांजळ आहे. 

अकरावीला असताना स्वतःच्या स्लीपर तुटल्यामुळे लेखकाने आईच्या लेडीज चप्पल वापरत दिवस काढले. जिथे वह्या पुस्तकांसाठी मारामार, तिथे खाजगी शिकवणी लावणे, ही तर फारच दूरची गोष्ट! पोटात शिरून, शिक्षकांच्या ओळखीने काही विषयांची मोफत खाजगी शिकवणी पदरात पाडून घेतली.

 

बारावी उत्तीर्ण झाल्यावर लेखकाची अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्याची इच्छा होती. त्याला वडलांनी विरोध केला. त्याऐवजी डी. एड्. करून शिक्षक बनण्याचा आग्रह धरला. गुणवत्ता असूनही डी. एड्. प्रवेशासाठी खूप संघर्ष करावा लागला. डी. एड्. झाल्यावरही लेखकाला शिक्षक होण्यासाठी मोठ्या अग्निदिव्यातून जावे लागले. नियुक्तीपत्र मिळविण्यासाठी उपोषण करावे लागले. याचा अर्थ, लेखकाला आयुष्यात कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळाली नाही. प्रत्येक गोष्टीसाठी झुंजावे लागले. मोठ्या संघर्षाअंती जि. प. प्रा. शाळा शिंदेवस्ती ( कुंभेज, जि. सोलापूर) येथे पहिली नियुक्ती मिळाली. शिक्षकांच्या उपस्थितीपटावर पहिली स्वाक्षरी करतानाच्या भावना लेखकाने फारच छान मांडल्या आहेत. 


शिक्षक झाले, तरी लेखकाची शिक्षणाची भूक संपली नाही. लग्नाच्या काळात, अंगाला हळद लागलेली असताना, घरातील सगळ्यांचा विरोध असतानाही शहरात जाऊन बी. ए.ची परीक्षा दिली. सवितासोबतचा नवीन संसार आणि बी. ए.चे शिक्षण समांतर चालूच राहिले. जोडीला सेवांतर्गत विविध प्रशिक्षणे होतीच. मुक्त विद्यापीठाच्या बी. एड्.ची प्रवेश परीक्षा देऊन बी. एड्.ला प्रवेश घेतला. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शिक्षण विस्तार अधिकारी बनले. शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून जावळीच्या खो-यात काम केले. दरम्यान पत्नी सविताचे आजारपण वाढत गेले आणि एक दिवस सहचारिणीनेही साथ सोडली. एक लहान मुलगी पदरात टाकून पत्नी परलोकवासी झाली. 


नातेवाईकांच्या आग्रहाखातर आणि मुलगी स्वप्नालीच्या संगोपनासाठी लेखक माधुरीशी विवाहबद्ध झाले. दरम्यान लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून उपशिक्षणाधिकारी बनले. पत्नीच्या पाठोपाठ आईनेही ह्या जगाचा निरोप घेतला. 'जीवनाची शर्यत' ह्या छोट्याशा प्रकरणाने ह्या आत्मकथनाचा समारोप केला आहे. 

शेवटी ते लिहितात :

'आयुष्याच्या या वाटेवर मी चालतोच आहे. एक वाटसरू म्हणून. एकटा. ज्याला आपले ध्येय गाठायचे आहे. जीवनाची शर्यत अजून चालूच आहे. स्वतःशीच असलेली स्पर्धा अद्यापही सुरूच आहे. 

जब तक जीवन है, तब तक संघर्ष है।' 

अशी आहे संघर्षयात्री रवींद्र खंदारे यांची आत्मकथा, जिला अर्धविराम आहे, पूर्णविराम नाही. हे आत्मकथन म्हणजे लेखकाच्या अर्ध्या साफल्याची चटका लावून जाणारी ह्रदयस्पर्शी गोष्ट आहे. दलितेतर बहुजन समाजातील माणसाच्या आयुष्यातही दु:ख, दैन्य, दारिद्र्य, उपासमार, अपमान, वंचना, यशापयश, जीवघेणा संघर्ष ह्या सार्‍या गोष्टी असतात, हे ह्या आत्मकथनाने अधोरेखित केले आहे. 


हे आत्मकथन वाचून पूर्ण झाल्यावर आपल्या असे लक्षात येते, की, 'संघर्ष हेच सामर्थ्य' हे केवळ ह्या पुस्तकाचे शीर्षक नसून ह्या लेखकाच्या संघर्षमय जीवनाचे ब्रीदवाक्यच आहे. हे आत्मकथन व्यक्तिप्रधान असले, तरी व्यक्तिकेंद्री निश्चितच नाही. हे जसे रवींद्र खंदारे यांचे आत्मकथन आहे, तसेच हे एका शेतकरी कुटुंबाचे आणि ग्रामीण समाजव्यवस्थेचे आत्मकथन आहे. लेखकाने ग्रामीण समाजजीवन आणि ग्रामीण संस्कृती छान चित्रित केली आहे. 

'वादळी बालपण' ह्या पहिल्याच प्रकरणात लेखकाने आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीची ओळख करून दिली आहे. 

आपल्या बालपणातील खोड्या प्रांजळपणे कथन केल्या आहेत. आपल्या कुटुंबाची आर्थिक ओढाताण नि:संकोचपणे सांगितली आहे. कचरा, भंगार गोळा करतानाचे अनुभव तितक्याच सहजतेने सांगितले आहेत. जगण्याच्या धबडग्यात लेखकाचे हरवलेले बालपण वाचकाला अस्वस्थ करून जाते. लेखकाने झोपडपट्टीचे आणि बैलबाजाराचे चित्रदर्शी वर्णन केले आहे. सावकारी विकृतीचे ओंगळवाणे दर्शन घडविले आहे. दारिद्र्याच्या दशावतारांचेही दाहक दर्शन घडविले आहे. लेखकाने स्वतःचे आयुष्य नेटाने घडविले हे जितके महत्त्वाचे आहे, त्याहीपेक्षा त्यांनी आपल्या भावंडांचे जीवन घडविले हे अधिक महत्त्वाचे आहे. 


लेखकाने जीवनातील सकारात्मकता आणि नकारात्मकता ह्या दोन्ही बाजू तितक्याच स्वच्छपणे मांडल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील कृती आणि विकृतीचे वर्णन करताना खंदारे यांची लेखणी अजिबात अडखळत नाही. प्रिय पत्नीच्या, नवजात अर्भकाच्या आणि कुटुंबासाठी आयुष्यभर खस्ता खाणा-या आईच्या वियोगाचे दु:ख लेखकाने पचवले आहे. लेखकाने हालअपेष्टांचे, दु:खाचे, दैन्याचे, दारिद्र्याचे, अपमानाचे, अपेक्षाभंगाचे अनेक चक्रव्यूह मोठ्या जिद्दीने आणि धीरोदात्तपणे भेदले आहेत. लेखकाच्या जीवनातील दु:खद प्रसंगांचे वर्णन वाचत असतानाही ते रडगाणे वाटत नाही. आपल्या व्यथा सांगून लेखकाला कोणाची सहानुभूती मिळवायची नाही किंवा आपले कर्तृत्व सांगून कोणाकडून पाठ थोपटून घ्यायची नाही. जीवनातील कटू अनुभवही ते तितक्याच त्रयस्थपणे आणि तटस्थपणे सांगतात. त्या प्रसंगाला सामोरे जाताना लेखकाची काय अवस्था झाली असेल, ह्या कल्पनेनेच वाचक अस्वस्थ होतो. लेखकाने जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने, अभावग्रस्ततेवर आणि संकटांवर मात करत वेगवेगळ्या पदव्या पदरात पाडून घेतल्या. 


रवींद्र खंदारे यांचे जीवन म्हणजे अडथळ्यांची शर्यत आहे. लेखकाचे जीवनानुभव अतिशय दाहक आहेत. संकटे आली, तरी त्यांनी हतबल होऊन शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. त्या सर्व संकटांतून तावूनसुलाखून निघाल्यामुळेच त्यांच्या जगण्याला तेज प्राप्त झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीपुढे शरणागती न पत्करता ते झुंजत राहिले, म्हणून त्यांना ध्येयपूर्तीचा आनंद घेता आला. ह्या आत्मकथनाचे सार महात्मा फुले यांच्या 'शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही' ह्या मूलमंत्रात समाविष्ट झाले आहे. ह्या लेखनात लेखकाचे अतिशय समंजस, समजूतदार, ध्येयनिष्ठ, सोशीक आणि सहनशील व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित झाले आहे. 'संघर्ष हेच सामर्थ्य' हे केवळ व्यथावेदना मांडणारे आत्मकथन नाही, तर जीवनाभिमुखतेचा संदेश देणारे आत्मकथन आहे. किंकर्तव्यमूढ होत चाललेल्या उगवत्या पिढीला अंतर्मुख करणारे हे आत्मकथन आहे. हे ह्या कलाकृतीचे मोठे यश म्हणावे लागेल. 


ह्या आत्मकथनाची भाषा अतिशय साधी, सोपी, सरळ, प्रवाही आणि अनलंकृत आहे. लेखकाने कुठेही शाब्दिक कसरती केलेल्या नाहीत. त्यामुळे ह्या भाषेला साधेपणातले सौंदर्य लाभले आहे. लेखकाने केलेली प्रसंगचित्रणे आणि भावचित्रणे अतिशय समृद्ध असल्यामुळे ह्या लेखनाला कमालीची वाचनीयता लाभली आहे. हे आत्मकथन वाचत असताना आपण चित्रपटच पाहतो आहोत, असे वाटते. हे संपूर्ण लेखन अतिशय उत्कटतेने आणि 'आतून' आलेले असल्यामुळे वाचक म्हणून आपण त्या जीवनसंघर्षाशी एकरूप होऊन जातो. लेखकाच्या जीवनातील दु:खाच्या प्रसंगी वाचकमनाला खिन्नता वेढून राहते. जसे आठवले तसे लिहून काढले, असे ह्या लेखनाचे सरधोपट स्वरूप आहे. सत्य सोलवटून सांगताना त्यांनी काहीही हातचे राखून ठेवलेले नाही. ह्या लेखनात कुठेही आवेश नाही किंवा अभिनिवेशही नाही. कुठेही गौरवीकरण नाही किंवा उदात्तीकरण नाही. लेखकाने मुद्दाम आपली 'छान' प्रतिमा निर्माण करण्याचा किंवा प्रतिमा जपण्याचा मुळीच प्रयत्न केलेला नाही. 


लेखकाने आपल्या लेखनावर अजिबात कारागिरी केलेली नाही. मुद्दाम कुठेही नाट्यमयता आणलेली नाही, तरीसुद्धा हे लेखन वाचकाच्या थेट काळजाला भिडते. लेखकाने आत्मकथनाची मांडणी छोट्या छोट्या २२ प्रकरणांमधून केली आहे. कच-याचे सोने, पुन्हा एक नवीन शाळा, शिक्षक भरतीची अग्निपरीक्षा, आणि पहिली सही, संधींचा स्वीकार, जावळीचे खोरे, अधु-या डावाचा पुन्हा श्रीगणेशा, जीवनाची शर्यत ही प्रकरणांची शीर्षके अतिशय अर्थपूर्ण आणि उत्कंठावर्धक आहेत. 'संघर्ष हेच सामर्थ्य' हे ह्या आत्मकथनाचे शीर्षक अतिशय अन्वर्थक आहे. लेखकाने रंगविलेल्या आई, वडील, भाऊ, बहीण, मामा, मामी, मित्र, सहकारी शिक्षक आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या व्यक्तिरेखा अतिशय ठसठशीत आहेत. आत्मकथन लेखनात जितकी समरसता असावी लागते, तितकीच तटस्थताही असावी लागते. रवींद्र खंदारे यांनी ह्या दोन्ही गोष्टींचा तोल अतिशय सहजतेने सांभाळलेला आहे. 


लेखकाच्या जीवनाविषयी आणि ह्या आत्मकथनाविषयी दोन ठळक बाबी इथे मुद्दाम नमूद केल्या पाहिजेत:

 १) लेखकाने आपल्या आयुष्यात कृतज्ञता हे मूल्य फारच जिवापाड जपले आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर भेटलेले नातेवाईक, मित्र, सहाध्यायी, शिक्षक, सहकारी, वरिष्ठ अधिकारी यांच्याविषयीच्या नोंदी त्यांच्या नावानिशी कृतज्ञतापूर्वक केल्या आहेत. ही संख्या कदाचित हजारात जाईल.

२) दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखकाची सदैव सकारात्मक जीवनदृष्टी.

कोणी कितीही वाईट वागला, तरी लेखकाने त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे न करता त्यालाही सहानुभूतीने समजून घेतले आहे. कोणाविषयीही कटुता बाळगलेली नाही. कधीही, कुठेही, कुणावरही आदळआपट केली नाही किंवा आगपाखडही केली नाही. अनेक कडवट प्रसंगही त्यांनी सौम्य करून मांडले आहेत. ह्या संयमित लेखनशैलीला तोड नाही. अशी सकारात्मकता ही हल्ली फारच दुर्मीळ गोष्ट आहे.


हे आत्मकथन म्हणजे एक स्मरणसाखळी आहे. हे आत्मकथन म्हणजे जीवनातील भल्याबु-या अनुभवांची गोळाबेरीज आहे. ह्या आत्मकथनाच्या माध्यमातून लेखकाने आत्मशोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे आत्मकथन म्हणजे लेखकाने घेतलेला स्वत्वाचा शोध आहे. लेखकाने कुठेही आत्मगौरव केलेला नाही किंवा आत्मप्रौढी मिरविली नाही. रवींद्र खंदारे जीवनसत्याला अतिशय धीटपणे सामोरे जाताना दिसतात. हे आत्मकथन कठोर वास्तवाच्या पायावर खंबीरपणे उभे आहे. लेखकाने आपल्या आयुष्याचे यथातथ्य मूल्यांकनही केले आहे. मला ह्या आत्मकथनातील वाङ्मयीन मूल्यांपेक्षा यातील कृतज्ञतामूल्य अधिक मौलिक वाटते. सतत नन्नाचा पाढा वाचणा-या नवीन पिढीसाठी हे आत्मकथन दिशादर्शक आणि अतिशय प्रेरणादायी आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने हे आत्मकथन वाचलेच पाहिजे.


ज्याप्रमाणे भाऊ गावंडे यांच्या आत्मकथनावर आधारित 'जिंकी रे जिंकी' हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्याप्रमाणे ह्या आत्मकथनावर छान चित्रपट होऊ शकेल, असे मला वाटते.

लेखकाने स्वतःच्या शिक्षणाविषयी लिहिले असले, तरी शिक्षणव्यवस्थेवर फारसे भाष्य केलेले नाही. रवींद्र खंदारे लवकरच शिक्षणाधिकारी होतील. आणखी वरिष्ठ पदावर जातील. आता जेव्हा त्यांच्या आत्मकथनाचा दुसरा भाग येईल, तेव्हा त्यात शिक्षणव्यवस्थेच्या, विशेषतः प्रशासकीय यंत्रणेच्या कृष्णधवल बाजूंवर प्रकाश पडेल, अशी अपेक्षा आहे. 


'संघर्ष हेच सामर्थ्य' (आत्मकथन) 

लेखक : रवींद्र खंदारे 

प्रकाशक : चपराक प्रकाशन, पुणे. 

मुखपृष्ठ : राहुल पगारे

पृष्ठे २९६ मूल्य रु. ४००. 


sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या