कु. शिवानी भारत सुभेदार ही मुखेड तालुक्यातील येवती येथील श्री शिवाजी माध्यमिक विद्यालयातील नववीची विद्यार्थिनी. शिवानीने तिचे गुरुजी संतोष तळेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या 'युद्ध नको, बुद्ध हवा' ह्या कुमारकवितेची केलेली ही आस्वादक समीक्षा. शिवानीचे आकलन फारच स्वच्छ आहे! श्री. तळेगावे आणि कु. शिवानी ह्या गुरुशिष्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे!
युध्दाच्या खाईतून शांततेचा मार्ग दाखवणारा कवितासंग्रह
कु. शिवानी भारत सुभेदार
'युद्ध नको! बुद्ध हवा!' हा कवितासंग्रह डॉ. सुरेश सावंत सर यांचा आहे. डॉ. सुरेश सावंत हे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक आहेत. त्यांनी संपादित केलेले 'माझा शिक्षक : चरित्रनायक' हे पुस्तक मी वाचल्यामुळे मला त्यांनी त्यांच्या शाळेत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती मिळाली. डॉ.सावंत सर यांच्या कविता वाचून प्रेरणा मिळते. त्यांचा 'युद्ध नको! बुद्ध हवा!' हा कवितासंग्रह मला माझ्या सरांनी वाचण्यासाठी दिला.
'युध्द नको!बुध्द हवा!' हे पुस्तकाचे नाव वाचूनच यात युध्दाविषयीच्या कविता असतील, असे वाटले आणि झालेही तसेच. या कवितासंग्रहाचे नाव मला खूपच आवडले. 'युध्द नको ! बुध्द हवा!' याचा अर्थ मी असा काढले की, युध्द तर नकोच पण या जगाला शांततेचा संदेश देणारे महात्मा गौतम बुद्ध या जगाला आत्ता हवे आहेत. आपण अनेक देवी देवतांच्या मूर्ती , प्रतिमा पाहतो त्या काहींच्या युध्द करतेवेळेसच्या, तर काहींच्या क्रोधित ,वेगवेगळ्या अवतारातल्या, अशा अनेक मूर्ती, प्रतिमा आपण पाहातो, पण गौतम बुद्धाची एकच मूर्ती किंवा प्रतिमा आपण पाहतो ते फक्त ध्यान करत बसलेली. पिंपळाच्या झाडाखाली शांत बसलेली. यामुळेच कवीने या कवितासंग्रहाचे नाव 'युद्ध नको!बुद्ध हवा!' असे ठेवले असावे.
या कवितासंग्रहाचे आणखी एक वेगळेपण आहे : यात एकच दीर्घकविता आहे. संपूर्ण कवितेला एकच शीर्षक आहे. एकतीस पानांची एकच सलग कविता आहे.
'रक्तामांसानेच भरली
सुहासिनी पृथ्वीची ओटी
प्रेतांचे खच पाहून
डोळे झाले गारगोटी'
आनंदाने नांदत असलेल्या, सुखी समाधानी जनतेला युद्धात आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे प्रेतांचे खच पडतात. पृथ्वी रक्ताने माखून जाते. जणू काही पृथ्वीची रक्तामांसाने ओटीच भरलेली आहे की काय, असे कवीला वाटते. एक वर्षापूर्वी सुरु झालेल्या रशिया व युक्रेन या दोन देशांतील युध्दाच्या बातम्या रोज टी.व्ही. वर पाहत होते. युध्दामुळे किती नुकसान होते, निष्पाप लोकांचे जाणारे बळी पाहून मन सुन्न होत होते. ही कविता वाचताना त्या घटनेची आठवण झाली. अजूनही ते शांत झालेले नाही, याची मला खंत वाटते . तेथील राज्यकर्त्यांनी बहुतेक बुद्ध वाचलेला नसावा, असे मला वाटते.
'सैनिकही माणूस असतो
त्यालासुध्दा भावना असतात
मुलाबाळांच्या आठवणीने
त्यालाही वेदना होतात'.
जय जवान जय किसान असे मोठ मोठ्याने आपण नारे देतो. या भारत देशात सैनिक व शेतकरी आहेत, म्हणून सगळी जनता सुखाने जीवन जगत आहे. युद्धाची सर्वात झळ कोणाला पोहचते तर ते आहेत सैनिक. सैनिक अहोरात्र सीमेवर डोळ्यांत तेल घालून जागतो, म्हणून आपण निवांतपणे झोपतो. सैनिकसुध्दा एक माणूसच असतो. त्यालासुध्दा मन असते. भावना असतात कुंटुंब असते. आई, वडील, पत्नी, मुले, भाऊ, बहीण. इ. सैनिक आपल्या कुटुंबापासून महिनोनमहिने दूर असतो. कुटुंबाच्या आठवणीने त्यालाही प्रंचड वेदना होतात. युध्दकाळामध्ये कुटुंबीयांना बोलण्यासाठी आपली ख्यालीखुशाली कळविण्यासाठीही त्याला वेळ नसतो. अहोरात्र देशाच्या सेवेसाठी प्राणपणाला लावून सेवा बजावत असतो, म्हणून युध्दाचा सगळ्यात जास्त ताण सैनिकांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर असतो. म्हणून मला वाटते, सैनिकांचा मानसन्मान ठेवला पाहिजे. प्रत्येक शाळेत १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या राष्ट्रीय सणादिवशी सैनिकांच्या हस्तेच ध्वजारोहण केले पाहिजे.
'युद्धात कोणीच जिंकत नाही
युद्धात दोन्ही पक्ष हरतात
स्वार्थी लोकांच्या हव्यासापायी
निष्पाप निरपराध लोक मरतात'
युद्धात एक हरतो आणि दुसरा जिंकतो असे नाही. युद्धात दोन्हीही पक्षांचा पराजयच होतो. दोन्ही बाजूकडचे हजारो सैनिक, निरपराध लोक मरतात. प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होते. दोन्ही देश शेकडो वर्ष विकासापासून मागे जात. साधनसंपत्तीचा नाश होतो. युद्ध म्हणजे सर्वनाश. युद्ध टाळण्याचा निश्चय करायला हवा, असा संदेश डॉ. सावंत सरांनी 'युद्ध नको! बुद्ध हवा!' या कवितासंग्रहातून दिला आहे .
'देशाला युद्धाच्या खाईत
ढकलती युद्धखोर नेते
युद्ध निरपराध रयतेचे
सुख स्वास्थ्य हिरावून घेते'.
राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते करतात. त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थच दिसतो. त्याच्यासाठी ते आपल्याला युद्धाच्या खाईत ढकलतात आणि आपली पोळी भाजून घेतात. यामुळे देशाचा सर्वनाश होतो. त्याला नेतेच जबाबदार असतात. त्यांच्यामुळे दीनदुबळ्यांचे, गोरगरिबांचे जगणे अवघड होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रयतेच्या रक्षणासाठी महाराजांनी मुघलाविरुध युद्ध केले व रयतेचे रक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला बजावले होते, की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. आताचे नेते रयतेचा किती विचार करतात? युध्दामुळे रयतेचे सुख स्वास्थ्य बिघडते .
'रंग एक असे रक्ताचा
सर्वांना समान वागवू
आपपर भाव गाडून टाकू
गांधीविचार मनी जागवू'.
सर्वांच्या रक्ताचा रंग लालच असतो. तो कोणत्याही जातीचा वा धर्माचा असूद्या . सर्वांनाच समानतेची वागणूक मिळाली पाहिजे . हा त्या धर्माचा, हा या धर्माचा असा भेदाभेद न पाळता सर्वांना समानतेची वागणूक देणे हाच मानवताधर्म आहे. म्हणून तर साने गुरुजी म्हणतात , "खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे".
अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज आजच्या काळाला आहे. गांधीजींचे विचार जर आत्मसात केले तर कधी युध्दाची गरज पडणार नाही. असा संदेश कवी या ओळीतून देतो.
'असा एक दिवस यावा
कुणी कुणाचा शत्रू नसेल
बंदूकीच्या नळीवर बसून
फुलपाखरू छान हसेल'.
कवी इथे अपेक्षा व्यक्त करतो की, या जगती कोणीही कोणाचा शत्रू राहणार नाही, असे जर झाले तर सगळेच कसे आनंदाने नांदतील! बंदुकीच्या नळीवर फुलपाखरू बसले असेल, तेही आनंदाने हसायला लागले पाहिजे, असे कवीला वाटते. युध्द म्हणजे केवळ दोन देशातीलच नव्हते तर आपसातील भांडणं,तंटे ,शेतातील बांधासाठीची भांडणं हेसुध्दा एक प्रकारे युध्दच आहे. यामध्ये सर्व समजुतदारीने वागले, तर आपसात भांडणं होणार नाहीत. कुणी कुणाचा शत्रू राहणार नाही.
'पाखरांना कुठे कळतात
कळतात देशांच्या सीमारेषा?
मुक्या जिवांनाही कळते
फक्त प्रेमाचीच भाषा'.
या पृथ्वीतलावर मानवच असा एकमेव प्राणी आहे की ,फक्त माझं माझं म्हणणारा स्वार्थी. पशुपक्ष्यांना कुठे कळतात सीमारेषा? त्यांना तर फक्त जो कोणी प्रेम देईल, जीव लावेल, त्याच्याकडेच जातील. त्यांना फक्त प्रेम हीच एक भाषा कळते. या ओळी वाचून मला वाटले, जर पक्षीही मानवाप्रमाणे स्वार्थी असले, तर त्यांचेही युद्ध झाले असते. हे झाड माझं आणि ते झाड माझं. हा भाग माझा आणि तो भाग माझा. यामुळे हजारो पक्षी मारले गेले असते.
'युध्द नको!बुद्ध हवा!' हा कवितासंग्रह खूपच प्रेरणादायी, आशयसंपन्न आणि विचार करायला भाग पाडणारा आहे. मुखपृष्ठ व आतील चित्रे ज्ञानेश्वर बेलेकर यांनी खूपच सुंदर रेखाटले आहेत. प्रत्येक पानावरील कवितेला अनुसरून एक उत्कृष्ट चित्र रेखाटले आहे. त्यामुळे कवितासंग्रह अधिकच सुंदर झाला आहे. मुखपृष्ठावर शांततेचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या कबुतराचे चित्र रेखाटले आहे आणि एका सैनिकाच्या बंदुकीवर एक फुलपाखरू बसून हसते आहे. असे बोलके चित्र चित्रकार ज्ञानेश्वर बेलेकर यांनी साकारले आहे. इसाप प्रकाशनाने एकूण 32 पानांचा अतिशय सुंदर असा रंगीबेरंगी कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. 'युद्ध नको! तर बुद्ध हवा!' असा संदेश सावंत सरांनी या संग्रहाच्या माध्यमातून दिलेला आहे. हा काव्यसंग्रह सर्वांनी वाचावा व संग्रही ठेवावा असा आहे.
कवितासंग्रह:- 'युध्द नको!बुद्ध हवा!'
कवी:- डॉ. सुरेश सावंत
प्रकाशक :- इसाप प्रकाशन, नांदेड.
मूल्य :- ऐंशी रुपये
--------------------------------------------------
नाव:- कु. शिवानी भारत सुभेदार
वर्ग:- नववा
शाळा:- श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येवती, ता. मुखेड जि. नांदेड.
addComments
टिप्पणी पोस्ट करा