'साहित्यदिंडी' व 'गुरुजी आम्हांला क्षमा करा'चे प्रकाशन
नांदेड - मी मागील ६५ वर्षांपासून नियमित लेखन करीत आहे. चांगले लेखन करण्यासाठी भरपूर वाचनही केले. या लेखनाचे श्रेय माझ्या साहित्याच्या वाचकांना आहे. त्यांच्या भक्कम पाठबळावरच लेखन प्रवास होऊ शकला, असे प्रांजळ उद्गार ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात काढले.
ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे लिखित ‘गुरुजी, आम्हाला क्षमा करा’ हा बालकथासंग्रह आणि ‘इसाप प्रकाशन’च्या ‘साहित्यदिंडी’ ग्रंथाचे रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे प्रकाशन करण्यात आले. बोराडे यांच्या ‘शिवार’ निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, प्रकाशक दत्ता डांगे, साहित्यिक शंकर वाडेवाले आणि लेखिका सविता करंजकर-जमाले यांची प्रमुख उपस्थिती होती. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बोराडे यांचे गुरुपूजन करून विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विजयकुमार चित्तरवाड, वीरभद्र मिरेवाड व अशोक कुबडे यांनीही सत्कार केला. ‘पुस्तक प्रकाशनाचा हा प्रसंग आनंददायी आहे की दु:खद असा मला संभ्रम आहे. कारण वयोपरत्वे माणसे ओळखू येत नाहीत आणि ऐकू येत नाही. नांदेड येथून येऊन सर्वांनी आत्मीयतेने साधलेला संवाद मला ऊर्जा देणारा आहे. अशा लाखमोलाच्या माणसांमुळे साहित्याचे काही भले होते. साहित्यावरील निष्ठेपोटी प्रकाशन करणारे मोजकेच प्रकाशक आहेत. माझ्या प्रकाशित बालकथासंग्रहातील संस्कारकथा मुलांना प्रेरणा देतील’, असे बोराडे म्हणाले. बोराडे यांनी बालसाहित्य लेखनातही मोठे काम केले आहे. नवीन पिढीतील लेखकांसाठी त्यांचे काम प्रेरणादायी आहे. त्यांनी नियमित लिहीत रहावे, असे सविता करंजकर म्हणाल्या.
ग्रामीण साहित्य लेखन आणि चळवळीत रा. रं. बोराडे यांचे नाव अग्रभागी आहे. त्यांनी मराठवाड्यातील मोलाची भर घातली आहे. सहा दशकांपासून त्यांचे लेखन सुरू आहे. त्यांच्या कथा, कादंबऱ्यांचा चाहतावर्ग मोठा आहे, असे डांगे प्रास्ताविकात म्हणाले. शंकर वाडेवाले यांनी अध्यक्षीय समारोप केला. पंडित पाटील यांनी सूत्रसंचालन केले आणि अशोक कुबडे यांनी आभार मानले. यावेळी विजयकुमार चित्तरवाड, आनंद पुपलवाड, वीरभद्र मिरेवाड, डी. एन. मोरे खैरकेकर, उत्तम बावस्कर, प्रेरणा दळवी, सुलभा बोराडे, डॉ. रेखा शेळके, आशा देशपांडे आदी उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा