एकनाथ आव्हाड हे एक प्रयोगशील असे ज्येष्ठ बालसाहित्यकार आहेत. त्यांनी बालकुमारांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्रे, काव्यकोडी इ. वाङ्मयप्रकारांत विपुल लेखन करून बालसाहित्यात मोलाची भर घातली आहे.
एकनाथ आव्हाड यांच्या बालसाहित्याचे वैशिष्ट्य असे, की त्यांच्या लेखनात तोचतोचपणा कधीच नसतो. त्यांची प्रत्येक कलाकृती ताजी- टवटवीत असते. त्यांना नावीन्याचा ध्यास आहे. त्यामुळे त्यांचे बालसाहित्य वाचताना नवीन काही वाचल्याचा आनंद मिळतो.
व्यास क्रियेशन्सने प्रकाशित केलेल्या 'प्रकाशाचा उत्सव' ह्या त्यांच्या नवीन बालकथासंग्रहात असाच नावीन्याचा अनुभव येतो. 'अभ्यास एके अभ्यास' ह्या कथेच्या नायकाचे नाव आहे रमेश, पण घरीदारी सगळे त्याला बंडू, बंड्या किंवा बंडोबा म्हणतात. परीक्षा जवळ आल्यामुळे त्याला ह्या विषयाचा अभ्यास करू का त्या विषयाचा, हा प्रश्न सतावतो आहे.
'कुसुमाकरचा सलाम' ह्या कथेचा नायक आहे कवितेचा दिवा लावणारा शाळकरी मुलगा श्रीशान. तो छान छान कविता लिहून सगळ्यांना प्रभावित करतो. 'माणसानं कमी बोलावं आणि जास्त ऐकावं. कमी लिहावं आणि जास्त वाचावं' हा बोध ह्या कथेतून मिळतो. नामवंत कवींप्रमाणे श्रीशानने 'कुसुमाकर' हे टोपणनाव धारण केले आहे.
पाचवीत शिकणारा खंडू नावाचा खेडवळ मुलगा 'माझ्या नावाची गोष्ट' सांगतो आहे. त्याला त्याचं खंडू हे नाव अजिबात आवडत नाही, कारण सगळी मुले त्याला खंड्या, श्रीखंड, त्रिखंड, वेखंड म्हणून चिडवायची. 'आईबाबांनी काहीही नाव ठेवले, तरी मुलांना आपले नाव आपणच कमवावे लागते', असा संदेश ह्या कथेतून मिळतो. खंडूचा खंडेराव कसा झाला, हे ह्या गोष्टीत मुळातून वाचण्यासारखे आहे.
'प्रकाशाचा उत्सव' ह्या कथेचा नायक आहे बाळू नावाचा कविवृत्तीचा मुलगा. त्याची ताई त्याला दिवाळीच्या सुट्टीत वेगवेगळ्या क्लासमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करते. तो म्हणतो, ज्या गोष्टीतून मला आनंद मिळतो, ती गोष्ट मला करू दे. मला पुस्तके वाचायला आवडते, तर माझी वाचनालयाची वर्गणी भरून दे. असा हा पुस्तकप्रेमी बाळू.
'शब्दांची नवलाई' हा एकनाथ आव्हाड यांचा अतिशय आवडीचा विषय. 'नवलाई' ह्या कथेतील आईबाबा, शमी आणि बाळू ही चौकडी शब्दांचे भाषिक खेळ खेळते. कळ, डाव, पक्ष, पण, ओढा, चाळ, तीर इ. शब्दांचे वेगवेगळे अर्थ सांगून वाचकांच्या ज्ञानात भर घालतात. रोज भांडण करून रडत घरी येणार्या मुलीची समजूत घालताना आई 'एकीने आग झालं, तर दुसरीने पाणी व्हावं' असा समंजसपणाचा सल्ला देते.
'सत्य हे नेहमीच सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आणि सुंदर असतं. खोटं बोलणारा माणूस खोटं बोलून स्वतःचाच विश्वासघात करत असतो. कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून करावी', असा विचार 'सत्यमेव जयते' ही कथा देते.
अंध मुलगी प्रांजल पाटील हिच्या जीवनावर बेतलेली 'अथक प्रयत्नांची यशोगाथा' ही अतिशय प्रेरणादायी कथा आहे. डर के आगे जीत है आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही, हे प्रांजलला माहीत होते. प्रांजलने अंधत्वावर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपले शिक्षण पूर्ण केले आणि ती भारतातील पहिली दृष्टिहीन महिला कलेक्टर बनली. प्रांजलच्या कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाचा हा विजय होता. तिच्या शिक्षकांच्या दृष्टीनेही तो धन्यतेचा क्षण होता. 'नवोन्मेष आनंदाचे' ह्या कथेत लेखकाने सार्वजनिक गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप वर्णन केले आहे.
'हाही आपला मित्रच' ह्या कथेत वर्तमानपत्राचे महत्त्व सांगितले आहे.
उन्हाळ्यात मैदानावर खेळणे अवघड असते. अशा परिस्थितीत घरातल्या घरात बसून बैठे खेळ खेळणे सोयीचे असते. 'खेळाचा तास' ह्या कथेतील आई मुलांना कवितेतून कोडी घालते आणि मुले कवितेतूनच त्या कोड्याचे उत्तर देतात. कुतूहल वाढवणा-या आणि आनंद देणा-या ह्या खेळात सगळेच रंगून जातात.
'शिळोप्याच्या फळगप्पा' ह्या कथेतील आईबाबा, बाळू आणि शमी डाळिंब, कलिंगड, पपई, आंबा इ. फळांविषयीच्या रसदार कविता एकमेकांना ऐकवतात. त्यामुळे फळांची आणि गप्पांची गोडी आणखीनच वाढते.
'हाताचा धर्म उगारणे नव्हे उभारणे' ह्या कथेतील आई 'हात' ह्या अवयवावरून तयार झालेले वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ सांगून मुलांच्या ज्ञानात भर घालते. ही कथा अर्थपूर्ण जीवन जगण्याची दृष्टी देते.
आव्हाडांची भाषा इतकी काव्यमय आहे, की ह्या प्रत्येक कथेत कविता एकरूप झालेली आहे. लालित्यपूर्ण भाषा हे ह्या कलाकृतीचे वैभव आहे. ओघवत्या आणि लडिवाळ संवादातून ही कथा फुलत जाते. ह्या प्रत्येक कथेत एक नाट्यछटा आहे आणि ह्या प्रत्येक कथेतून नाट्य फुलत जाते. ह्या संग्रहातील प्रत्येक कथा उत्कंठावर्धक आहे. ह्या कथा वाचत असताना आपण रंगमंचावर नाटक पाहतोय, असेच वाटत राहते.
एकनाथ आव्हाड यांचा बालमानसशास्त्राचा चांगला अभ्यास असल्यामुळे त्यांनी बालभावविश्व अतिशय प्रभावीपणे रेखाटले आहे.
एखाद्या कळीचे रूपांतर हळुवारपणे फुलात व्हावे, तशी ही कथा स्वाभाविकपणे फुलत जाते, उमलत जाते. ह्या प्रत्येक कथेतील वातावरण वेगळे आहे, पात्रं वेगळी आहेत आणि त्यांचे संस्कारही वेगळे आहेत.
ह्या कथा मनोरंजन तर करतातच, शिवाय बालकुमार वाचकांची भाषा समृद्ध करतात.
लेखकाने शब्द फारच छान वाकवले आहेत. एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ समजावून सांगितले आहेत. ह्या कथांमध्ये शब्दांच्या फिरक्या आहेत आणि गिरक्याही! ही शब्दचमत्कृती वाचकाला स्तिमित करते. वाक्प्रचार आणि म्हणींच्या मुक्त वापरामुळे ह्या भाषेचे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
ह्या कथांना नर्म विनोदाची रेशमी झालर आहे. एकनाथ आव्हाड यांनी ह्या कथांमधून सुविचारांची साखरपेरणी केली आहे. सत्यनिष्ठा, सर्जनशीलता, संवेदनशीलता, आत्मविश्वास, आत्मप्रतिष्ठा, जिद्द, मेहनत, पर्यावरणसंरक्षण आणि पर्यावरणसंवर्धन इ. मूल्यांचे संस्कार बिंबविणा-या ह्या कथा बालकुमार वाचकांना निश्चित आवडतील, असा विश्वास वाटतो. एकनाथ आव्हाड यांचा हा 'प्रकाशाचा उत्सव' म्हणजे ज्ञानाचा आणि निर्भेळ आनंदाचा उत्सव आहे. ह्या उत्सवात आपणही सहभागी होऊ या!
'प्रकाशाचा उत्सव' (बालकथासंग्रह)
लेखक : एकनाथ आव्हाड
मुखपृष्ठ : मिलिंद नार्वेकर
प्रकाशक : व्यास क्रियेशन्स, ठाणे ( प.)
पृष्ठे ८० किंमत रु १२०
sureshsawant2011@yahoo.com
addComments
टिप्पणी पोस्ट करा