एकनाथ आव्हाड यांचा बालकवितासंग्रह 'पाऊस पाणी हिरवी गाणी' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.


एकनाथ आव्हाड हे बालकथा, बालकविता, किशोर कादंबरी, नाट्यछटा, काव्यकोडी इ. विविध वाङ्मयप्रकारांत लीलया संचार करणारे वाचकप्रिय बालसाहित्यकार आहेत. त्यांची २८ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या लेखनाचा पाठ्यपुस्तकांत समावेश झालेला आहे. त्यांचे लेखन विविध पुरस्कारांनी सन्मानित झाले आहे.

एकनाथ आव्हाड यांचा 'पाऊस पाणी हिरवी गाणी' हा नादमधुर शीर्षकाचा बालकवितासंग्रह दिलीपराज प्रकाशनाने दि. २० डिसेंबर २०२२ रोजी प्रकाशित केला आहे. ६४ पृष्ठांच्या ह्या संग्रहात निसर्गवर्णनपर ४७ कविता आहेत. बालकुमारांचे जग हे मोठे मजेशीर जग असते. पहिल्याच कवितेतील नायकाला कधी झाड, कधी पर्वत, कधी झरा, कधी सूर्य तर कधी आभाळ व्हावेसे वाटते. अशा स्वच्छंदी लेकराला त्याची आई सांगते :

'रोजच नवीन व्हावे काही

सतत येते मनात

आई म्हणते,'आधी माणूस हो,

शोभून दिसशील जनांत!'

लेकरांना असे कुणी तरी सांगावेच लागते.

आव्हाडांच्या कवितेतील झाड चक्क नाचते आहे. सुसाट वारा सुटला आहे. टपो-या गारा पडत आहेत. झाड जणू पाऊसधारांशी बोलते आहे. ह्या कवितेत सगुणा नावाची नावासारखीच गुणी बकरी आहे.

सायकलीचे गुण किती वर्णन करावेत! ती पेट्रोल डिझेल मागत नाही. धूर सोडत नाही. हरणावाणी पळते आणि व्यायामात मदत करते.

प्रत्येक झाड माणसाचे लाड करते. पाऊस पाड, म्हणून आभाळाला सांगते. झाड माणसांशी हितगुज साधते. हे झाड पाखरांना आपल्या अंगाखांद्यावर खेळविते आणि पाखरांसोबत उंच उंच उडतेसुद्धा!

'गाणारी नदी

नाचणारे पाणी 

ओठांवर फुलती

पाऊस गाणी' 

असे ह्या कवितेचे एकंदरीत स्वरूप आहे. ही कविता वाचताना आपल्या मनालाही नवी पालवी फुटते. 

तुरट, खारट, आंबट, तिखट, कडू, गोड ह्या सगळ्या चवी आपल्या जिभेला समृद्ध करत असतात, म्हणून सगळ्या चवी आनंदाने चाखायच्या असतात.

पाखरांकडून आपल्याला खूप शहाणुल्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात, कारण पाखरे माणसाला जगण्याची नवी दृष्टी देत असतात.

नदी कधीच रडतकुढत बसत नाही. ती अडचणींतून मार्ग काढत सतत धावत असते. नदीकडून ह्या गोष्टी शिकायला काय हरकत आहे?

सिंधू, दर्या, जलधी, पयोधी आणि रत्नाकर ही सागराची नावे. त्याची विविध रूपे मनाला मोहिनी घालतात. निसर्गसखा असा विविध रूपांत आपल्याला साद घालत असतो. 

'चमेली, प्रियंवदा ही

जाईचीच नावे

एवढेच ठाऊक त्यांना 

सुगंध वाटत जावे'. 

करमणूक करत, माहिती देत, सुगंध आणि आनंद वाटणे हाच तर आव्हाड यांच्या बालकवितेचा मूळ स्वभाव आहे. 

तिन्ही ऋतूंमध्ये हिवाळा हा ऊर्जावान ऋतू. लांबच लांब पारंब्यांमुळे वडाचे झाड एखाद्या जटाधारी ऋषिमुनीसारखे दिसते. 

डोंगरची काळी मैना म्हणून ओळखले जाणारे करवंद आपल्याला क जीवनसत्त्व देतात. 

एकनाथ आव्हाड यांनी ह्या कवितेत जंगलाच्या शाळेतून फिरवून आणले आहे ह्या शाळेत छडी नाही ना फळा नाही. ह्या शाळेत झाडांची शीतल छाया आहे आणि आभाळाची माया आहे. सृष्टीची सगळी नवलाई ह्या कवितेत आहे. 

मामाच्या गावाचे वर्णन करताना कवीने लिहिले आहे :

'पिकं झोकात डोलती

हीच श्रीमंती, सुबत्ता 

कष्टावर हवी श्रद्धा 

गाव हाच गिरवी कित्ता' 

कष्टांवरची श्रद्धा दृढ करणारी ही कविता आपुलकीचाही संदेश देऊन जाते. 

उन्हाळा आणि झाडाला बांधलेले झोके यांचे एक मजबूत नाते आहे. आव्हाडांच्या कवितेतील मुले कशी समजूतदार आहेत, पाहा:

'मुले गात बसतात 

कुणावर ना रुसतात

टाळी देत उन्हाला

खूप खूप हसतात'. 

'उन्हाला टाळी देणे' याचा अर्थ प्रतिकूल परिस्थितीतही समायोजन साधणे. उन्हाला न घाबरता त्याचा मुकाबला करणे गरजेचे असते. जीवन जगत असताना ही गोष्ट आवश्‍यकच असते. 

'कष्टाचे हिरवे रान' ह्या कथाकाव्याच्या शेवटी कवीने लिहिले आहे :

'कष्टाविना जगणे व्यर्थ 

याचे राहू दे भान

कष्टातून फुलते मुला 

आयुष्याचे पान न् पान' 

अशा शब्दांत कवीने 'श्रममेव जयते'चा संदेश दिला आहे. 

एक चिमुरडी स्वप्नात फुलपाखरू बनून हिरवा निसर्ग पाहून येते. पावसाचा एक थेंब शिंपल्यात जाऊन बसतो आणि अनमोल मोत्याचे रूप धारण करतो.

एका कवितेत कवीने मोड आलेल्या कडधान्यांची गोष्ट सांगितली आहे.

'गाय, वासरू, मांजर, मोती

तेही आहेत माझे सोबती'

ही कवीची परिसराविषयीची सर्वसमावेशक भूमिका आहे.

'झाड हसले' ह्या कवितेतले झाड एकदम रुसून बसले. हलेना डुलेना. पण

'पाखरांची किलबिल पडता कानी

कळ्यांना सुचली फुलांची गाणी'

हा आहे चांगल्या सहवासाचा परिणाम.

म्हणून नेहमी चांगल्या माणसांच्या सहवासात राहिले पाहिजे.

सहा ऋतूंचे सहा सोहळे आपल्या परिचयाचे आहेत. 'निसर्गचक्र' ह्या कवितेत कवीने ते शब्दबद्ध केले आहेत:

'प्रत्येक ऋतूचा

आहे महिमा वेगळा

नाना रूपांतून भरे

इथे निसर्गाची शाळा'.

निसर्गाची ही शाळा आणखी आनंददायी व्हायची असेल, तर आपणही प्रत्येकाने काही तरी केले पाहिजे. काय करायचे?

'पाखरांसाठी चला फुलवू या बागा

पर्यावरणाची ते राखतात निगा'

ह्या ओळींतून कवीने पर्यावरणरक्षणाचा संदेश दिला आहे. 

पाणी हेच जीवन आहे, म्हणून पाणी जपले पाहिजे.

रंगांचे भांडण, धरती सुखावली अशी काही कथाकाव्यही ह्या संग्रहात आहेत. ह्या सर्वच कवितांतील निसर्गाची विविध रूपे आपल्या मनाला मोहिनी घालतात. 

कविवर्य फ. मुं. शिंदे यांनी ह्या पुस्तकाची पाठराखण केली असून उत्तम कोळगावकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. संतोष घोंगडे यांनी आकर्षक मुखपृष्ठ आणि आतील रंगीबेरंगी चित्रांच्या माध्यमातून पुस्तकाच्या सौंदर्यात भर घातली आहे. दिलीपराज प्रकाशनाने आर्ट पेपरवर रंगीत छपाई करून ह्या पुस्तकाची अप्रतिम निर्मिती केली आहे. 

'पाऊस पाणी हिरवी गाणी'

( बालकवितासंग्रह) 

कवी : एकनाथ आव्हाड 

मुखपृष्ठ आणि सजावट : संतोष घोंगडे 

प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे. 

पृष्ठे ६४ किंमत रु. १७०

sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या
Popular posts
पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडचे दहावीच्या निकालात घवघवीत यश
इमेज
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहिर अभिमन्यू पवार, लातूर – उपाध्यक्ष, सौ. अश्विनी पाटील, पुणे, व सौ ग्रीष्मा पाटील, पालघर – उपाध्यक्ष पदी
इमेज
मिल्लत नगरच्या नागरी सुविधासाठी लोकविकासचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना भेटणार (तातडीने कारवाई केली नाहीतर माकप आंदोलनाच्या पवित्र्यात)
इमेज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज
मराठा आरक्षण मुद्द्यावरून तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या.
इमेज