नाशिकचे राजेंद्र सोमवंशी यांचा 'गीत नवे गाऊ' हा बालकवितासंग्रह चपराक प्रकाशनाने दि. १२ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित केला आहे. ४० पृष्ठांच्या ह्या संग्रहात २७ बालकविता आहेत.
शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर. ह्या मंदिरात अज्ञानाचा अंधार संपतो. त्यागाचे संस्कार इथेच रुजविले जातात. इथेच बालमनाला हळुवारपणे फुलविले जाते. मानवतेचे, समतेचे आणि एकात्मतेचे बाळकडू इथेच मिळते. ह्या ज्ञानमंदिराविषयी कवीने लिहिले आहे :
'हे मंदिर आमुचे ज्ञानाचे
मानाचे, अभिमानाचे
इथेच घडते सुंदर जीवन
माझ्या तुमच्या भाग्याचे'
शाळेच्याही आधी आई हाच आपला पहिला गुरू असतो. ती घरातल्या सगळ्यांचं सगळं करते. कधी थकत नाही, कधी रुसत नाही. ह्या आईबद्दल एका कवितेतील चिमुरडी कृतज्ञतापूर्वक म्हणते:
'देवाने दिलेली भेट आहे
आई माझी ग्रेट आहे'.
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे महात्मा फुल्यांपासून प्रत्येक महापुरुषाने सांगितले आहे. त्यातही मुलींचे शिक्षण अधिक महत्त्वाचे! या संदर्भात कवीने लिहिले आहे :
'लेक वाचवा लेक शिकवा
घराघरात संदेश पाठवा
नवं अभियान झालय सुरू
चल शिकाया, चल ग सरू'.
परिवर्तनवादी चळवळीचे जागरगीत म्हणूनही ह्या कवितेकडे पाहता येईल.
खारूताई आणि नंदीबैल हे तर बाळगोपाळांचे मित्रच. ह्या दोन्ही विषयांवरच्या कविता वाचनीय आहेत.
कालच्या जुन्या पिढीपेक्षा आजची नवीन पिढी ही अधिक प्रगत आहे. विश्वमानवाचे पंख घेऊन जगभर विहार करणारी ही पिढी आहे. मानवता आणि विश्वबंधुता हे ह्या पिढीचे परवलीचे शब्द आहेत. म्हणून 'आभाळाची आम्ही लेकरे' ह्या कवितेतील बालक म्हणते:
'आभाळाची आम्ही लेकरे
तमा कशाची नाही
मानवतेचे स्वप्न घेऊनी
फिरू दिशा या दाही'
तंत्रकुशलतेमुळे दाही दिशांवर राज्य करण्याची क्षमता ह्या पिढीत आहे. ह्या प्रगत पिढीची ही बाणेदार कविता आहे. खेड्यातील मुलांमध्येही आता एक वेगळीच धमक आली आहे. म्हणून 'आपलं गाव' ह्या कवितेतील एक खेडवळ मुलगा ऐटीत म्हणतो आहे :
'कडक मडक आपलं गाव
घ्यायचं नाय भाऊ आपलं नाव'
हा एक प्रकारे इशाराच आहे. ह्या ओळी वाचताना
'जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राईएवढ्या'
ह्या कवितेतील बालनायकाची हटकून आठवण येते. ह्या बालकाच्या शब्दांमध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे.
ह्या कवितेतील बालकांनी मैदानाशी मैत्री करून निरोगी जीवनशैलीचा ध्यास घेतला आहे.
'आरोग्याच्या हितासाठी
जरा वेळ देऊ या वेळ रे
चला, खेळू या खेळ रे
चला, खेळू या खेळ रे'.
सुदृढ आरोग्यासाठी खेळ किती आवश्यक असतात, हे वेगळे सांगायला नकोच.
म्हणूनच त्यांच्या ओठांवर शब्द येतात :
'सारे मिळूनी
गीत नवे गाऊ
नव्याने जगाया
नवा दीप लावू'
हे नवे गीत एकात्मतेचे आहे आणि हा नवा दीप मानवतेचा आहे. हा तेजस्वी दीप सगळा आसमंत उजळून टाकणारा आहे.
एखादे विशिष्ट पुस्तक अन्य कवीच्या कवितेचा विषय होते, ही फारच दुर्मीळ गोष्ट आहे. 'श्यामची आई' ह्या पुस्तकाला हे भाग्य लाभले आहे. 'श्यामची आई' हे ममतेची शिकवण देत मूल्यांची पेरणी करणारे पुस्तक आहे. ह्या पुस्तकाविषयी कवीने एका कवितेत लिहिले आहे :
'गोष्ट बघा ऐकता श्यामची
गंध असा मातीतून येतो
प्रत्येकाची आई बनूनी
ह्रदयाशी कवटाळून घेतो
संस्कारांची अशी शिदोरी
जगात उपमा नाही
श्यामची आई, श्यामची आई'.
'मराठीची लेकरं' ह्या कवितेत कवीने मराठी भाषेचा गौरव केला आहे. आपल्या लेकरांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या आईवडलांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी ही कविता आहे. ह्या कवितेतील बालकांचे गुण बघून कुणीही म्हणेल,'बच्चे पार्टी जिंदाबाद!'
'आनंद घ्या, आनंद द्या
आनंद वाटू जगामध्ये
आनंदाविन सारे खोटे
कशास किंतू मनामध्ये'.
जगाला आनंद वाटणारी ही कविता खरोखरच आनंददायी आहे.
अशी आनंदी बालकेच म्हणू शकतात :
'हसू बागडू नाचू खेळू
आनंद देते नवा
छान किती ही हवा
छान किती ही हवा!'
ह्या कवितेतली झुळझुळती प्रसन्न हवा वाचकमनाला उभारी देऊन जाते.
'थेंब थेंब वाचवा' ह्या कवितेत कवीने पाण्याचा थेंब न् थेंब वाचविण्याचा संदेश दिला आहे. कारण पाणी म्हणजेच जीवन आहे. पाणी म्हणजे चैतन्याचा अंश आहे.
ह्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत संदीप वाकचौरे यांनी ह्या कवितेच्या गुणवैशिष्ट्यांचा छान परामर्श घेतला आहे. नागेश शेवाळकर यांनी ह्या पुस्तकाची पाठराखण केली आहे.
मनोरंजनाबरोबरच कृतज्ञता, मानवता, माया, ममता, समता, विश्वबंधुता, आत्मविश्वास, सहवेदना, जिव्हाळा, स्त्रीशिक्षण, देशप्रेम, समृद्ध सांस्कृतिक वारसा, निसर्गप्रेम, अनुकंपा, पर्यावरण संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन इ. मूल्यांचे संस्कार बिंबविणारी ही नव्या पिढीची नवी बालकविता आहे. ही प्रेरणादायी बालगीते, संस्कारगीते म्हणजे कवीने बालकुमार वाचकांसाठी बांधून दिलेली शिदोरी आहे. संतोष घोंगडे यांच्या मुखपृष्ठाने आणि आतील रंगीबेरंगी चित्रांनी ह्या पुस्तकाच्या सौंदर्यात मोलाची भर घातली आहे. चपराक प्रकाशनाचे घनश्याम पाटील यांनी आर्ट पेपरवर बहुरंगी छपाई करून पुस्तकाची निर्मिती देखणी केली आहे!
'गीत नवे गाऊ' (बालकवितासंग्रह)
कवी : राजेंद्र सोमवंशी
मुखपृष्ठ : संतोष घोंगडे
प्रकाशक : चपराक प्रकाशन, पुणे
पृष्ठे ४० किंमत रु. १७०
addComments
टिप्पणी पोस्ट करा