'छंद देई आनंद' ह्या बालकवितासंग्रहासाठी एकनाथ आव्हाड यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या निमित्ताने डॉ. सुरेश सावंत यांनी ह्या पुस्तकाचा करून दिलेला हा परिचय:
साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल एकनाथ आव्हाड यांचे हार्दिक अभिनंदन!
एकनाथ आव्हाड हे शालेय पाठ्यपुस्तकांतील महत्त्वाचे कवी आहेत. त्यांनी आजवर बालकुमार वाचकांसाठी २७ पुस्तके लिहिली आहेत. बालकथा, बालकविता, नाट्यछटा, चरित्र इ. वाङ्मयप्रकारांत त्यांनी विपुल लेखन केले आहे. शैक्षणिक आणि साहित्यिक योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने त्यांचा आजवर तीन वेळा गौरव केला आहे.
नुकताच त्यांचा 'छंद देई आनंद' हा बालकवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. ६४ पृष्ठांच्या ह्या संग्रहात वेगवेगळ्या विषयांवरील ४२ कविता आहेत.
यातील छंद आनंद तर देतातच, शिवाय हे छंद जीवनासाठी उपयोगी पडतात. हे छंद आपल्याला आनंदाच्या वाटेवर नेऊन सोडतात. ह्या कवितेतला प्रत्येक मित्र लाखांमधला एक आहे. ह्या कवितेतील शिक्षिका मुळेबाई म्हणजे दुसरी आईच! वेगवेगळ्या वाद्यांचे सप्तसूर ह्या कवितेत ऐकायला मिळतात.
बहुगुणी असा नवीन मित्र संगणक ह्या कवितेत भेटतो, जो सगळ्या जगाला जोडतो. तिरंगा ध्वजाचे गौरवगीत वाचताना ऊर अभिमानाने भरून येतो.
छोट्या शाहिराची शाहिरी ऐकताना स्फुरण चढते. उंच भरारी घेणारा पोपट स्वातंत्र्याचे मोल सांगून जातो. मुंबई नगरीची नवलाई वाचताना मन दंग होऊन जाते. 'मी कोण होणार?' ह्या कवितेतून बाळगोपाळांची सगळी स्वप्नं उलगडत जातात.
'आई म्हणजे घरातलं बहरलेलं झाड', ही कल्पनाच मोठी अभिनव आहे.
पुस्तकांचे महत्त्व सांगणा-या दोन तीन कविता ह्या संग्रहात आहेत.
'ग्रंथसखा' ह्या कवितेत कवीने म्हटले आहे :
'पुस्तके जरी छोटी मोठी
विचार नवा देतात
ग्रंथसखा होऊन आपल्या
आयुष्याला घडवतात'
ह्या ओळी विचार करायला भाग पाडतात.
ह्या कवितेत एक परोपकारी भूत भेटते. गरीब गरजवंताला पैशाचे पाकीट देऊन 'आईशिवाय दुसरे दैवत नाही', असे सांगून जाते.
'गर्वाचे घर खाली' हे वारा आणि सूर्य यांच्यातील स्पर्धेचे एक मजेशीर कथाकाव्य आहे.
ह्या कवितेतील बालक पतंग होऊन आकाशाला गवसणी घालते आहे.
'ठकास महाठक' यांसारखी कथाकाव्यं छान मनोरंजन करतात.
'गाणारा वर्ग' ह्या कवितेतील माधव पोवाडा गातो. संगीता लावणी म्हणते. अहमद भावगीत म्हणतो. टीना लोकगीत गाते. जोसेफ भक्तिगीत गातो. रुखसाना बालगीत म्हणते. सुखविंदर प्रार्थना करतो. रीटा गझल म्हणते. राजू कोळीगीत गातो. देवकी नाट्यगीत गाते.
ह्या कवितेतील मुलामुलींची नावे विविध जातिधर्मांतील आहेत. गीतांच्या विविध प्रकारांतून आणि बालकांच्या नावांतून कवीने विविधतेत एकात्मता साधली आहे.
शेवटी कवीने म्हटले आहे :
'समूहगीत गाताना मात्र
एक होतो सारा वर्ग
गाणा-या वर्गाचा मग
होऊन जातो स्वर्ग'.
वर्गाचे रूपांतर स्वर्गात करणाऱ्या संगीताची ही महती आहे.
२०२०मध्ये एकनाथ आव्हाड यांचा 'शब्दांची नवलाई' हा बालकवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यात त्यांनी व्याकरणातील अवघड संकल्पना कवितेच्या माध्यमातून सोप्या करून सांगितल्या आहेत. ह्या संग्रहाला नुकताच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे . 'छंद देई आनंद' ह्या नवीन संग्रहातील कविता पूर्णतः वेगळ्या आहेत. एकनाथ आव्हाड आपल्या लेखनात सतत वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांच्या ह्या प्रयोगशीलतेमुळे त्यांच्या लेखनात ताजेपणाचा आणि नावीन्याचा अनुभव येतो.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष तथा निवृत्त जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी ह्या संग्रहाला फारच छान प्रस्तावना लिहिली आहे. खरं तर ही औपचारिक प्रस्तावना नाहीच आहे. हा बाळगोपाळांशी साधलेला मनमोकळा संवाद आहे. पाचवी सहावीत शिकत असताना ढकल पास होणारा मुलगा पुढे चालून जिल्हाधिकारी कसा बनला, याची प्रेरणादायी गोष्ट त्यांनी सांगितली आहे. ह्या प्रस्तावनेत त्यांनी आव्हाडांच्या कवितेचे कौतुक तर केले आहेच, शिवाय ही प्रस्तावना 'तिळा तिळा दार उघड' हा मंत्र देऊन जाते.
लक्ष्मीकांत देशमुख यांना पुस्तकांच्या माध्यमातून जादूई ज्ञानरूपी रत्नगुहा गवसली, तशीच ती प्रत्येक वाचकाला सापडेल, असा विश्वास ही प्रस्तावना देते.
सागर नेने यांनी मुखपृष्ठापासून आतील चित्रांपर्यंत अक्षरशः जीव ओतला आहे. दिलीपराज प्रकाशनाने आपल्या परंपरेला साजेशी पुस्तकाची वैभवशाली निर्मिती केली आहे. आनंददायी आणि ज्ञानदायी पुस्तकाच्या निर्मितीसाठी कवी आणि प्रकाशक अभिनंदनास पात्र आहेत! साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कवी एकनाथ आव्हाड आणि दिलीपराज प्रकाशन परिवाराचे हार्दिक अभिनंदन!
sureshsawant2011@yahoo.com
addComments
टिप्पणी पोस्ट करा