गोरक्षकांवरील हल्ल्याप्रकरणी चौघांना अटक ;४ दिवसांची पोलीस कोठडी

 

किनवट - इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणी परिसरातील गोरक्षक कार्यकर्त्यांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी चौघा आरोपींना गुरुवारी दि.२२ अटक केली.अटकेतील आरोपींना शुक्रवारी दि.२३ किनवटच्या दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले असता,न्यायालयाने चौघांनाही ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.  शिवणी परिसरात दि. १९ जून रोजी रात्री ६ गोरक्षकांवर १० ते १२ जणांनी प्राणघातक हल्ला केला होता.या भ्याड हल्ल्यात शेखर रापेल्ली या युवकाचा जागीच मृत्यू झाला.तर इतर ५ जण जखमी झाले होते.मारेकऱ्यांच्या अटकेसाठी सकल हिंदु समाजाने आक्रमक पवित्रा घेत किनवट,शिवणी,इस्लापूर,बोधडी,मुदखेड आदी ठिकाणी बंद पाळला.जिल्हाभरात या घटनेचा निषेध करण्यात आला.घटनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी आरोपींच्या शोधात विविध पथके स्थापन करून तेलंगणा राज्यासह सीमावर्ती भागात आरोपींचा शोध घेतला.मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी गुरुवारी अप्पारावपेठ येथील शेख इसाक शेख चांद ,शेख अमेर शेख अलीम, शेख मुजाहिद शेख इसाक व शेख मुजमीर शेख फयाज,  सर्व राहणार अप्पारावपेठ यांना अटक केली.अटकेतील आरोपींना शुक्रवारी किनवट न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद ऐकून चारही आरोपींना ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाय. बी. गोबाडे, पोलीस उपनिरीक्षक योगेश बोधगिरे, पोलीस उपनिरीक्षक भारत सावंत अधिक तपास करीत आहेत.
टिप्पण्या