अस्तित्वाची लढाई आता रस्त्यावर उतरून लढावी लागेल!आमदार सचिन अहिर यांचा हाफकिन कामगारांच्या आंदोलनात इशारा*





   ‌ मुंबई दि‌.२२: सध्या मुंबई पाठोपाठ हाफकिन इन्स्टिट्यूट सारख्या जीवनरक्षक लसीचे निर्माण करणा-या संस्थेचे महत्व कमी करण्याचे‌ षडयंत्र सुरू असून त्या ‌विरूध्द येत्या अधिवेशनात आवाज उठविला जाईल,अन्यथा अस्त्वित्वाची ही लढाई आता रस्त्यावर उतरून लढावी लागेल,असा इशारा हाफकिन बायो-फार्मास्युटिकल कार्पोरेशन एम्प्लॉइज युनियनचे मुख्य सल्लागार आमदार सचिनभाऊ अहिर यांनी इथे बोलताना दिला‌.

   या प्रसंगी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गटनेते आमदार अजय चौधरी प्रमुख वक्ते‌ म्हणून उपस्थित होते.युनियनचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले. 

   संपूर्ण देश पोलिओ मुक्त करण्यासाठी लस निर्मितीत आपले योगदान देणाऱ्या कामगार आणि महामंडळाला जमीन हस्तांतरण प्रकरणात अंधारात ठेवल्या बद्दल आज परेल येथील हाफकिन इन्स्टिट्यूटच्या द्वारपाशी कामगार आणि अधिका-यांनी जोरदार निषेध आंदोलन छेडले,त्या वेळी आंदोलनकर्त्यां पुढे शिवसेनेचे उपनेते आमदार सचिनभाऊ अहिर बोलत होते.

   जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी यांनी राज्य शासनाच्या आदेशानुसार ६ जून २०२३रोजी हाफकिन महामंडळ वापरित असलेली१८२६ चौ‌.फु. जागा भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद(दिल्ली)आंत्र-विषाणु अनुसंधान केंद्रास हस्तांतरित केली आहे.या व्यवहारात हाफकिन महामंडळाला अंधारात ठेवण्यात आले.शिवाय या संबंधातील बैठकीलाही महामंडळाला बोलावण्यात आले नव्हते.त्यामुळे कामगार आणि अधिकाऱ्यांमध्ये आपल्या अस्तित्वाची चिंता निर्माण झाली होती,या पार्श्वभूमीवर हे आंदोलन छेडण्यात आले.

  कामगारांच्या मनातील असुरक्षितेचा उहापोह करून सचिनभाऊ अहिर आपल्या भाषणात पुढे म्हणाले,जर केंद्र सरकार नियंत्रित विषाणू अनुसंधान केंद्रासाठी जागा हवी असेल तर अन्यत्र वर्षोनुवर्षे पडून असलेल्या जागेवर ते का उभारले जात नाही?असा सवाल करून कामगारांच्या मनात आज त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे तो राज्य सरकारने दूर केला पाहिजे,असेही आपल्या भाषणात सचिन अहिर यांनी सांगितले.

   आमदार अजय चौधरी आंदोलनाला पाठिंबा देताना म्हणाले,काही झाले तरी हाफकिन इन्स्टिट्यूटच्या कामगारांना एकाकी पडू दिले जाणार नाही.

  युनियनचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते म्हणाले, हाफकिन जीव-औषध निर्माण मंडळ महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे.लसी व प्रतिविषे व औषध निर्मितीत देशात अग्रेसर आहे, हे राज्याचे वैभव आहे.पण सन २०१३ मध्ये हाफकिन मंडळाच्या वापरातील ५एकर जागा टाटा मेमोरियलला बाल व महिला कॅन्सर रुग्णांलय आणि रेडिओ थेरेपी सेंटर साठी देण्यात आली होती.पण ही जागा त्या साठी न वापरता डॉक्टर आणि नर्सेस च्या निवासा करिता वापरण्यात आली.ही शुद्ध फसवणूक असून हाफकिन मंडळास दोन टॉवर बांधून देण्याचे दिलेले वचनही हवेत विरले आहे.हाफकिनची जागा हळूहळू ताब्यात घेऊन तिचे अस्तित्व धोक्यात आणण्याचे प्रयत्न होणार असतील तर ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही,असेही गोविंदराव मोहिते आपल्या भाषणात म्हणाले.आंदोलनात सर्व युनियन कार्यकर्त्यांनी महत्वाचे परिश्रम घेतले.महिला प्रतिनिधींचाही मोठाच सहभाग लाभला.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे ‌खजिनदार यांनी आभार मानले.अन्य पदाधिकारी ‌त्यावेळी‌ उपस्थित होते.**

टिप्पण्या