नांदेड. (प्रतिनिधी) चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरातील टीव्हीसह सुमारे ४३ ते ४५ हजार रूपये किंमतीचे सोने आणि चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना २ जून रोजी दुपारी दोन ते ६ जून रोजी सायंकाळी पाचवाजेदरम्यान, नांदेडच्या 'सिडको' वसाहतीमध्ये घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या 'सिडको' वसाहतीअंतर्गत असलेल्या पाण्याच्या टाकीशेजारील परिसरातील रहिवासी शरद उध्दवराव डहाळे यांचे घराला २ जून रोजी दुपारी दोन ते ६ जून रोजी सायंकाळी पाचपर्यंत कुलूप लावलेले होते. शरद डहाळे यांच्या घरात उपरोल्लेखित कालावधीत कुणीही नसल्याची तसेच घराला कुलूप लावलेले असल्याची सुवर्णसंधी साधून अज्ञात चोरट्यांनी उपरोक्त कालावधीत घराच्या दरवाजावरील कडी-कोंडी तोडून घरात प्रवेश मिळविला. दरम्यान, चोरट्यांनी घरामधील कपाटातील लॉकर तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि टी.व्ही. असा एकूण सुमारे ४३ ते ४५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे, असा आरोप शरद डहाळे यांनी दिलेल्या तक्रारीमध्येच नमूद असल्याची माहिती ठाणे अंमलदार ज्ञानोबा गिते व मदतनीस पो. कॉ. पूनम उदगिरे यांनी दिली आहे.
याप्रकरणी शरद उध्दवराव डहाळे यांनी दिलेल्या तक्रारीचेआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अखेर आरोपी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचे मार्गदर्शनाखाली नाईक पो. कॉ. ज्ञानेश्वर गव्हाणकर हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
विशेष बाब म्हणजे, नांदेडच्या सिडको-हडको परिसरात चोरी तथा घरफोड्यांचे सत्र सुरू असताना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील अत्यंत कार्यतत्पर 'डीबी' अर्थात गुन्हे शोधपथक सद्या कुठे व्यस्त आहे, असा संतप्त सवाल नवीन नांदेड परिसरातील व्यापारी बांधव तसेच सर्व सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
नांदेड पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आणि या ठाण्यातील अत्यंत कर्तव्यदक्ष म्हणून सर्वत्र ओळखल्या जाणाऱ्या 'डीबी' अर्थातच गुन्हे शोथ पथकाच्या विशेष कामगिरीचेही परीक्षण करावे, अशी मागणीही या परिसरातील बहुसंख्य सर्वसामान्य नागरिक तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

COMMENTS