*एन.टी.सी.गिरण्यांच्या प्रश्नावर राजकीय पाठबळासाठी सर्व पक्षीय खासदारांना साकडे!सचिन अहिर यांनी वेधले सर्व खासदारांचे लक्ष!*


     *मुंबई दि.५ : मुंबईसह संपूर्ण महाष्ट्रातील एन.टी.सी. च्या गिरण्या अद्याप अधिकृत पणे सुरू न झाल्याने जवळपास १० हजार कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांवर अद्यापतरी उपासमारीची टांगती तलवार असल्याने तेथे असंतोष खदखदताना दिसतो आहे.तेव्हा या गिरण्या पूर्ववत चालू कराव्यात,या गोष्टीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राजकीय पाठबळ मिळावे म्हणून राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिन अहीर यांनी सर्वपक्षीय खासदाराना या प्रश्नावर निवेदन देण्याचा संकल्प केला.* 

    त्या प्रमाणे गेल्याच आठवड्यात अनेक खासदारांना पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली आहत,तर काही जलद पोस्टाने पाठविण्यात आली आहेत,अशी माहिती देऊन पुढे म्हटले आहे, एन.टी.सीच्या मुंबईतील इंडिया युनायटेड मिल क्र.५, टाटा, पोद्दार, फिन्ले स्थलांतरित दिग्वीजय,बार्शिमधील बार्शि टेक्साईल,अचलपूर मधील फिन्ले या सहा गिरण्या देशातील लॉकडाऊनमुळे दि.२३ मार्च पासून बंद आहेत.त्या मधील अचलपूरची-फिन्ले ही गिरणी येत्या २६ जानेवारी पासून चालणार असल्याचे समजते.

    तथापि या गिरण्यातील कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची उपासमार संपुष्टात यावी यासाठी, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी एन.टी.सी.व्यवस्थापनाकडे सातत्याने पाठपुरावा करून कामगारांना आर्धा पगार मिळवून दिला तर ऐन दिवाळीत आंदोलनाचे पाऊल उचलून त्या वर्षाचा पूर्ण बोनस मिळवून दिला आहे.संघटनेने या गिरण्या चालू करण्यासाठी न्यायालयात दावाही दाखल केला.तेव्हा एका बाजूने न्यायालयीन लढाई करताना दुसऱ्या बाजूने रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या मार्गाने संघर्ष केला आहे.असे जरी असले तरी आर्धा पगार आजच्या महागाईवाढीच्या काळात तुटपुंजा ठरला आहे !पण आता मात्र या गिरण्या सुरू होणे गरजेचे आहे.

    लॉकडाऊन काळापूर्वी या गिरण्या पूर्ण सक्षमतेने सुरू होत्या आणि आजही त्या गिरण्या उत्पादन देऊ शकतात,शिवाय गोडाऊन मधील तयार मालाची विक्री होते आहे! शिवाय अनलॉकमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे सुरू झाले आहेत,असे असताना केंद्र सरकार या गिरण्या पूर्ववत चालविण्यास दुर्लक्ष का करीत आहे?अशी व्यथा निवेदनात मांडून राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर यांनी म्हटले आहे,एन.टी.सी.दिल्ली प्रशासनाने दोन सत्रात देशातील एन.टी.सी.च्या गिरण्या चालविण्याचा निर्णय घेतला .पहिल्या सत्रात देशातील पाच गिरण्या चालविण्याचे ठरले.वर म्हटल्या प्रमाणे अचलपूरची फिन्ले गिरणी येत्या २६ जानेवारी पासून चालू होत आहे. देशातील एकूण लॉकडाऊन पूर्वी चालू असलेल्या जवळपास २२ गिरण्यांपैकी फक्त ५ गिरण्या चालणार! पण मुंबईतील गिरण्या किती चालणार?हे अजुनही गुलदस्त्यात आहे.म्हणजे अजूनही बेकारीची टांगती तलवार मुंबईतील गिरणी कामगारांवर कायमआहे.

    सन २००२ मध्ये बी.आय.एफ.आर.च्या निर्णयानुसार मुंबईतील २५ गिरण्यां पैकी १५ गिरण्याना विकण्याची मंजुरी देण्यात आली.या योजने नुसार जमीन विक्रीतून अंदाजे पाच हजार करोड रुपये मिळाले.या पैशातून अनेक एन.टी.सी.गिरण्या आर्थिक द्रुष्ट्या चालण्यास सक्षम ठरल्या आहेत.मुंबईही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असल्याने येथील जमीनीला सोन्याचा भाव आहे.मुंबईतील गिरण्या विकून आलेल्या पैशाचा विनियोग खरेतर महाराष्ट्रातील गिरण्यांचे आधुनिकीकरण करून त्या पूर्ववत चालू झाल्या पाहिजेत,ही आमची तात्विक मागणी आहे.मुळात यातील टी.डी.आर.च्या रुपाने आलेल्या कोट्यवधी रुपयावर मुंबईसह महाराष्ट्रातील एन.टी. सी.गिरण्या चालू शकतील.

    तेव्हा मुंबईसह महाराष्ट्रातील एन.टी.सी.गिरणी कामगारांवर बेकारीची कु-हाड येणार असेल,तर कामगार रस्त्यावर उतरतील,या कडे माननीय खासदारांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधावे आणि या गिरण्या पूर्ववत चालू कराव्यात,अशी मागणी सचिनभाऊ अहिर यांनी केली आहे.येथील हा गिरणी उद्योग पूर्वपारच्या इतिहासाला,रोजंदारीला चालना देणारा आहे,तेव्हा या प्रश्नावर सर्व पक्षाच्या खासदारांचे पाठबळ आवश्य ठरते,असे सचिनभाऊ अहिर यांनी म्हटले आहे.

    राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना या प्रश्नाची पूर्ण जाणीव असून,त्यांनाही संबंधित खात्याशी त्वरीत बोलण्याची विनंती निवेदन देताना करणार आहोत,असेही सचिन अहिर यांनी म्हटले आहे

   राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सैकर, बजरंग चव्हाण,सुनिल बोरकर आदी या प्रश्नी सक्रिय राहून सहकार्याचा हात देत आहेत

 ◆◆काशिनाथ माटल◆◆◆

टिप्पण्या