जुक्टा संघटनेतर्फे साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचा सत्कार संपन्न


नांदेड, दि. २६

साहित्य अकादमी या केंद्रीय स्वायत्त साहित्य संस्थेच्या वतीने बालसाहित्यासाठी दिला जाणारा पुरस्कार नांदेड येथील ज्येष्ठ बाल‌साहित्यकार तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांना त्यांच्या 'आभाळमाया' या संग्रहासाठी जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल नांदेड जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या (जुक्टा)  वतीने संघटनेचे मार्गदर्शक प्रा. मुकुंद बोकारे, अध्यक्ष प्रा. संभाजी वडजे, साहित्यिक प्रा. महेश मोरे, प्रा. विजय कदम, प्रा. विलास वडजे, प्रा. डॉ. विनायक देव यांनी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचा हृद्य सत्कार केला.

बालकुमार साहित्याचे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत, सुसंस्कारात असणारे योगदान याविषयी सविस्तर चर्चा केली. डॉ. सावंत यांची आजवर ५६ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यापैकी  ३३ पुस्तके बालसाहित्याची आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या तीन पुरस्कारांसह अन्य प्रतिष्ठित साहित्यसंस्थांचे ४५ पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षणक्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल डॉ. सावंत यांना  यापूर्वी राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या नरहर कुरुंदकर पुरस्कारासह पुणे येथील अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

डॉ. सावंत यांचे साहित्य शालेय तसेच विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत समाविष्ट करण्यात आले आहे. त्यांचे १४ बालकवितासंग्रह, ३ बालकथासंग्रह, ४ संस्कारक्षम चरित्रे, ३ किशोर कादंब-या, एका जनार्दनी ही एकांकिका, हिंदी अनुवाद आणि बालसाहित्य समीक्षेची ४ पुस्तके  प्रकाशित झाली आहेत .     

'आभाळमाया' या संग्रहाला प्राप्त झालेला साहित्य अकाद‌मीचा हा सन्मान नांदेडच्या साहित्यविश्वाचा लौकिक वाढवणारा असून अनेक नव्या लेखक-कवींना यापासून प्रेरणा मिळेल, असा विश्वास प्रा. मुकुंद बोकारे यांनी यावेळी व्यक्‍त केला. जुक्टा संघटनेने यथोचित सत्कार करून डॉ. सुरेश सावंत यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या