'आधुनिक भगीरथ' ना. शंकररावजी चव्हाण गौरवग्रंथ  डॉ. बाळू दुगडूमवार, कुंटूर, जि. नांदेड. 


 


     २०२० हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भारताचे माजी गृहमंत्री ना. शंकररावजी चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे.या निमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने महाराष्ट्र शासनासाठी एक गौरवग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आणि गौरवग्रंथाच्या संपादनाची जबाबदारी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांच्यावर सोपविली. 


मार्च ते जून ह्या ४ महिन्यांच्या कालावधीत, लॉकडाऊनच्या काळात, सभोवतालची संपूर्ण परिस्थिती प्रतिकूल असताना, डॉ. सावंत यांनी ह्या ६७२ पृष्ठांच्या गौरवग्रंथाचे संपादन केले आहे. दि. १४ जुलै रोजी शंकररावजींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून मुंबईत 'आधुनिक भगीरथ ना. शंकररावजी चव्हाण' गौरवग्रंथाचे प्रकाशन मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. 


डॉ. सावंत यांना संपादन समितीचे सदस्य प्रा. उत्तमराव सूर्यवंशी आणि संदीप काळे यांचे सकारात्मक सहकार्य लाभले. 


या सगळ्यांच्या सहकार्यातून संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरेल असा देखणा गौरवग्रंथ साकार झाला आहे. 


 


ना. शंकररावजी चव्हाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नांदेडच्या नगराध्यक्षपदापासून केली.


निष्कलंक चारित्र्य हा शंकररावजींचा सगळ्यात मोठा ऐवज होता. 


त्यांनी आयुष्यात पैसा हा नेहमीच गौण मानला. 


राबत्या शेतकरी कुटुंबात जन्म झालेला असल्यामुळे शेती आणि पाणी हे त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे विषय होते! 


महाराष्ट्राच्या जलसिंचनाच्या क्षेत्रात अभूतपूर्व कार्य करून त्यांनी महाराष्ट्राला भारताच्या जलसिंचनाच्या नकाशावर आणले. 


त्यामुळे आपण सगळे त्यांना 'महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक' म्हणून ओळखतो. 


 


प्रामाणिकपणा, सचोटी, श्रद्धाळू मन, भक्कम आध्यात्मिक अधिष्ठान, तत्त्वनिष्ठा, उच्चतम ध्येयनिष्ठा, कार्यकुशलता, प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाऊन सखोल अभ्यास करण्याची तयारी, गरिबीची जाण, कमालीचा साधेपणा, स्थितप्रज्ञ वृत्ती, शिस्तबद्ध जीवनशैली, वागण्या-बोलण्यातील काटेकोरपणा, प्रशासकीय कार्यातील पारंगतता आणि मुख्य म्हणजे निष्कलंक चारित्र्य इ. गुणांनी मंडित असे हे आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. 


समाजाच्या गरजांची जाणीव त्यांना होती. 


समाजाच्या उत्थानासाठी जे जे आवश्यक आहे, ते ते त्यांनी केले. 


त्याचा कधी गवगवा केला नाही. 


जाहिरातबाजी तर नाहीच नाही! 


त्यांनी आयुष्यभर दिखाऊ कामांपेक्षा टिकाऊ कामांवर अधिक भर दिला. 


 


आधुनिक भगीरथ ना. शंकररावजी चव्हाण हे निष्कलंक चारित्र्याचे राजकारणी होते. 


काही लोकांनी त्यांना 'हेडमास्तर' म्हणून दूषण दिले, तरी त्यांनी विहीत कार्याच्या परिपूर्तीसाठी विरोधकांकडे दुर्लक्ष करीत दूषणही भूषण म्हणून स्वीकारले. 


शंकररावजींची मनोभूमिका धार्मिक असली, तरी त्यांनी सार्वजनिक जीवनात कधीही धर्म आणि राजकारण यांची गल्लत केली नाही. 


त्यांची श्रद्धा ही डोळस होती. 


धार्मिक आचरण ही त्यांची खाजगी बाब होती. 


सार्वजनिक जीवनात त्यांनी त्याचे कधीच अवडंबर माजविले नाही. 


 


शंकररावजी हे कडक शिस्तीचे भोक्ते होते. 


५० वर्षांच्या आपल्या सार्वजनिक जीवनात त्यांनी लोकरंजनापेक्षा लोककल्याणावर अधिक भर दिला होता.


सवंग लोकप्रियतेसाठी त्यांनी कधीही घोषणाबाजी केली नाही. 


जेवढे करणे शक्य असेल, तेवढेच ते बोलत. 


कोणत्याही निवडणुकीत मतांचे भरघोस पीक घेण्यासाठी त्यांनी कधीही खोट्या आश्वासनांची खैरात केली नाही.


शंकररावजी आयुष्यभर विश्वस्तवृत्तीने जगले.  


सत्तेच्या माध्यमातून मालमत्ता वाढविण्याचा विचार कधी त्यांच्या मनालाही शिवला नसेल. 


आयुष्यात पैशाला महत्त्व द्यायचे नाही, हे संस्कार बालपणीच आईवडिलांकडून त्यांच्यावर झाले होते. 


 


भारताच्या राजकारणात इतक्या निर्लेप वृत्तीचा, निर्मोही आणि अपरिग्रही वृत्तीचा नेता होऊन गेला, हे भावी पिढ्यांना कदाचित खरेही वाटणार नाही. 


राजकारणी माणसाविषयी दंतकथा वाटावी, असे समाजासाठी समर्पित आयुष्य ते जगले. 


विचाराने ते निष्ठावंत कॉंग्रेसमन होते, पण आचाराने त्यांचा कल डाव्या किंवा समाजवादी विचारसरणीकडे होता. 


त्यांची प्रत्येक कृती ही अंत्योदयाची होती. 


त्यांनी राज्यात आणि केंद्रात ज्या ज्या खात्यांचा कारभार सांभाळला, त्या त्या खात्यांवर आपल्या अभ्यासपूर्ण कार्यशैलीने आपली नाममुद्रा उमटविली आहे. त्यांचे प्रशासकीय कौशल्य वादातीत होते. 


 


ना. शंकररावजी चव्हाण हे गोदाकाठचे राजयोगी होते. गोदातीरापासून यमुनातीरापर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास खाचखळग्यांचा, तरीही नजरेत भरण्यासारखा होता. त्यांनी सन्मानाचे हार झेलले, तसे टीकेचे प्रहारही झेलले, पण आपल्या चित्ताची समवृत्ती ढळू दिली नाही. 


त्यांच्या भाषणात आणि विचारांत कमालीचा ठामपणा होता.


'वाईट गोष्टींची गय केली जाणार नाही,' असे ते ठणकावून सांगत आणि तसे वागतसुद्धा! 


त्यांच्या वाणीत आणि करणीत एकवाक्यता होती. दुहेरी नीतिमत्ता त्यांच्या गावी नव्हती. त्यामुळे सार्वजनिक जीवनात त्यांची जरब होती, धाक होता आणि आदरयुक्त भीती होती. हा धाक त्यांच्या नैतिकतेतून आलेला होता. चुकीच्या माणसाची त्यांच्या नजरेला नजर देऊन बोलण्याची हिंमत होत नसे. 


 


ना. शंकररावजी चव्हाण यांनी केंद्रात अर्थमंत्री, मानव संसाधन विकास मंत्री, संरक्षणमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कामगिरी बजावली. 


त्यांनी राष्ट्रीय प्रश्नांवर उमटविलेली आपली अक्षय नाममुद्रा पाहून प्रत्येक मराठी माणसाला निश्चितच अभिमान वाटतो!


 


'आधुनिक भगीरथ' हा गौरवग्रंथ म्हणजे ना. शंकररावजींचे 'अक्षर' स्मारक आहे. 


आजच्या तरुण पिढीला एका स्वच्छ राजकीय नेत्याची ओळख व्हावी, हा या गौरवग्रंथाचा प्रांजळ हेतू आहे. 


ना. शंकररावजींच्या आठवणींना उजाळा देणारे मान्यवरांचे अभ्यासपूर्ण लेख देण्याचा प्रयत्न संपादकांनी केला आहे. 


ह्या गौरवग्रंथाच्या माध्यमातून ना. शंकररावजींच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांनी केलेल्या रचनात्मक कार्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. 


पुनरुक्ती टाळून प्रत्येक लेखात काही ना काही नवीन माहिती वाचायला मिळेल, अशी दक्षता संपादकांनी घेतली आहे. 


 


वाचकांच्या सोयीसाठी १०१ लेख असलेल्या ह्या गौरवग्रंथाची विभागणी ७ विभागांत केली आहे. 


'सहप्रवासी आणि उत्तराधिकारी' ह्या पहिल्या विभागात २३ राजकीय नेत्यांचे लेख आहेत. विशेष म्हणजे यात ५ माजी मुख्यमंत्र्यांचे लेख आहेत. 


'उच्चपदस्थ अधिकारी आणि राजसारथी' ह्या दुसर्‍या विभागात ९ अधिकाऱ्यांचे अतिशय अभ्यासपूर्ण असे लेख आहेत. 


तिसऱ्या विभागात ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार इ. मान्यवरांचे ३० महत्त्वपूर्ण लेख आहेत. 


'गणगोत' ह्या चौथ्या विभागात शंकररावजींच्या नातेवाईकांचे ८ लेख आहेत. 


या लेखांतून जगासाठी 'हेडमास्तर' असलेल्या 'कुटुंबवत्सल नानां'चे विलोभनीय दर्शन घडते. 


'मुद्रित माध्यमांची आदरांजली' ह्या पाचव्या विभागात नियतकालिकांतील पूर्वप्रकाशित १६ लेख आहेत. 


सहाव्या विभागात शंकररावजींची १६ संसदीय भाषणे वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 


ग्रंथाच्या शेवटी शंकररावजींची मुलाखत आणि जीवनपट देण्यात आला आहे. 


शंकररावजींच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांची रंगीत छायाचित्रे ग्रंथाच्या सौंदर्यात भर घालतात. 


ग्रंथाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री ना. सुभाष देसाई यांचे शुभेच्छा संदेश छापले आहेत. 


महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ना. शंकररावजी चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसा गौरवग्रंथ सिद्ध केला आहे. 


महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समकालीन राजकारणावर आणि समाजकारणावर प्रकाश टाकणारा हा एक वैभवशाली दस्तऐवज आहे. 


नयन बारहाते यांनी या ग्रंथाची अतिशय आकर्षक मांडणी केली आहे. 


ना. शंकररावजी चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित झालेल्या ह्या गौरवग्रंथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ह्या गौरीशंकराला विनम्र अभिवादन! 


 


डॉ. बाळू दुगडूमवार, कुंटूर, जि. नांदेड


टिप्पण्या