अक्षरयात्री' : नव्या पिढीसाठी एक मौलिक ग्रंथ  -  प्रदीप धोंडिबा पाटील 

  • 'अक्षरयात्री' : नव्या पिढीसाठी एक मौलिक ग्रंथ 

  • ------------------------------

  •                          प्रदीप धोंडिबा पाटील 


 


महाराष्ट्रातील प्रसिद्ध साहित्यिक डाॅ. सुरेश सावंत यांचा महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्याचा धांडोळा घेणारा 'अक्षरयात्री' हा ग्रंथ नुकताच सिद्ध झाला आहे. 


धर्माने मुस्लिम असूनही मराठी साहित्यावर व विशेषतः मराठी संत साहित्यावर ज्यांचा गाढा अभ्यास, संशोधन राहिलं आहे अशा यु. म. पठाण यांचा जन्म कुठे झाला आहे. इथपासून ते वडिलांनी विविध ठिकाणी केलेल्या नौकरीबरोबर लेखकाचे झालेले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, शालेय वयात झालेले राष्ट्रप्रेमाचे संस्कार, हरिभाऊ आपटे, नाथमाधव, यांच्या ऐतिहासिक कादंब-या, महात्मा गांधी यांचं आत्मकथन, विनोबा भावे यांचे लेखन , साने गुरुजींच्या लेखनाचा व विचारांचा पडलेला प्रभाव यातून झालेले साहित्यसंस्कार , पुढे विविध स्तरांवर केलेल्या लेखनाचा धांडोळा या ग्रंथात घेण्यात आला आहे. 


 


डाॅ. वि.भि. कोलते यांच्यानंतर महानुभाव पंथाच्या संशोधनकार्यात असणारे डाॅ. पठाण हे ' लीळाचरित्र: एकांक, दृष्टांतपाठ, स्मृतिस्थळ, डिंभविरचित ऋद्विपूरमाहात्म्य, गोपाळदासकृत शुकदेवचरित्र, महानुभाव साहित्य संशोधन खंड १ इ. त्यांनी संपादन केलेल्या ग्रथांचा उल्लेख करण्यात आला आहे. 


सुफी संतसाहित्याबरोबरच महाराष्ट्रातील नाथ, वारकरी, दत्त, समर्थ आदी संप्रदायांच्या साहित्याचा अभ्यास आणि त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर बखरवाड्.मय प्रकारातही त्यांनी संशोधन केले आहे.पहिल्या मराठी- फारशी व्युत्पत्तीकोशाचे संपादनही त्यांनी केले आहे. लोकसाहित्य व पुरातत्व या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेखही आहे. 


इतरही संतसाहित्यावर लिहिलेल्या ग्रंथांच्या उल्लेखाबरोबर त्यांना मिळालेल्या विविध साहित्य संमेलनांच्या अध्यक्षपदाबरोबरच त्यांच्या एकूणच साहित्यसेवेबद्दल मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराबरोबर इतरही अनेक पुरस्कारांचा उल्लेख करण्यात आला आहे. 


दीर्घायुष्य लाभलेल्या व आभाळाची उंची लाभलेल्या या साहित्यिकाच्या एकूणच साहित्यसेवेचा अगदी उत्कृष्ट आढावा मोजक्या शब्दांत डाॅ. सावंत यांनी घेतला आहे. 


दलित साहित्य चळवळीच्या पहिल्या पिढीतील म्हत्त्वाचे कवी म्हणून ज्यांचा उल्लेख होतो व ज्यांच्या 'बलुतं' ह्या आत्मकथनाने सबंध महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेले कवी दया पवार यांच्या समग्र साहित्यसेवेचा, कारकिर्दीचा आढावा डाॅ. सावंत यांनी घेतला आहे. त्यांचा जन्म, शालेय शिक्षण, त्यांची पशुवैद्यक महाविद्यालयातील नौकरी, पुढे रेल्वे खात्यात ऑडिटरची नौकरी, मुंबई येथे वास्तव्याला आल्यावर रिपब्लिकन व आंबेडकरवादी चळवळीशी झालेला परिचय, १९६७ पासून दलित साहित्य चळवळीत प्रत्यक्ष सहभाग कोंडवाडा, पाणी कुठंवर आलं गं बाई, बलुतं, विटाळ, चावडी, पासंग आदी विविध साहित्यप्रकारांतील लेखनाच्या उल्लेखा बरोबरच काही म्हत्त्वाच्या कविता व कथांचेही रसग्रहण करण्यात आले आहे. 


आयुष्यभर अनेक मंडळावर काम करण्याच्या मिळालेल्या संधीबरोबरच १९९० साली मिळालेल्या पद्मश्री किताबाचाही उल्लेख करण्यात आला. आहे. 


एकीकडे महाराष्ट्रात साहित्य अकादमी पासून साहित्यातील सर्वात मानाचा समजला गेलेला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे साहित्यिकसुद्धा धर्म, जात, संप्रदाय,पंथ, प्रवाह, गट, तट, आदीत विभागले गेले असताना या कशाचीच बाधा न होऊ देता आपलं असामान्यत्व एवढ्या वयानंतरही निकोपपणे टिकवून ठेवण्यात यशस्वी झालेले, सगळ्यांकडेच समदृष्टीने पाहणारे, नावाजलेल्या साहित्यिकांबरोबर अगदी नव्याने साहित्य प्रांतात पाय ठेवू पाहणा-या नवोदित लेखकांच्या साहित्यकृतीचं मनमोकळेपणाने कौतुक करणारे, सगळ्यांचच कौतुक असलेले, या वयातही प्रत्येकाची वैयक्तिक नोंद घेणारे, प्रोत्साहन देणारे एकमेव असे मराठी साहित्यातील 'पितामह' प्राचार्य रा. रं. बोराडे यांचा जन्म, त्या काळात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत घेतलेले शिक्षण, शिवाजी महाविद्यालय परभणी, विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर, देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद या ठिकाणी प्राचार्य म्हणून केलेले उत्कृष्ट काम, त्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार देऊन केलेला गौरव. 


 


लातूर जिल्ह्यातील काटगावसारख्या खेडेगावात व शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने जन्मतःच असलेल्या शेतकरी दुःखाच्या जाणिवा लेखकाला सुखासीन नौकरीतही स्वस्थ बसू दिल्या नाहीत. शालेय जीवनात वाचनात आलेल्या व्यंकटेश माडगूळकर यांच्या 'गावाकडची माणसं' या पुस्तकाचा झालेला खोल परिणाम. आपणही आपल्या गावाकडच्या माणसांवर अशाच कथा लिहाव्यात, असा न कळतपणे झालेला संस्कार. त्याचीच प्रेरणा घेऊन लिहिलेली 'वसुली' ही पहिली कथा. या पहिल्याच कथेला दैनिक सकाळ मध्ये मिळालेला प्रथम पुरस्कार. तीच उर्मी, तीच प्रेरणा आयुष्यभर पुरून उरणारी ठरली . त्यातूनच पुढे पेरणी, मळणी, नातीगोती, बोळवण, वाळवण, माळरान, राखण, कणसं आणि कडबा, हरिणी, अगं अगं मिशी, आदी शेतीजाणीव समृद्ध करणा-या कथासंग्रहांबरोबर ताळमेळ, फजितवाडा, खोळंबा, गोंधळ, हेलकावे, हे विनोदी कथासंग्रह, पाचोळा, सावट, आमदार सौभाग्यवती, चारापाणी, महानगाव, रहाटपाळणा, इथं होतं एक गाव, नामदार श्रीमती, रिक्त अतिरिक्त इ. कादंब-या, पिकलं पान , विहीर, बंधमुक्ता, मी आमदार सौभाग्यवती ही नाटके, चूकभूल द्यावी घ्यावी, पाच ग्रामीण नाटिका, चोरीचा मामला, ह्या एकांकिका, कशात काय अन् फाटक्यात पाय, हसले गं बाई फसले, मला तुमची म्हणा ही वगनाट्ये, आम्ही लेकी कष्टक-यांच्या हे मुक्तनाट्य, शाळेला चाललो आम्ही ही किशोर कादंबरी, समीक्षालेखसंग्रह, अनुभव कथा असे तब्बल ४० च्या वर पुस्तके प्रसिद्ध आहेत. अजूनही वयाच्या ऐंशीतही त्याचं लेखनकार्य अखंड चालूच आहे. 


शेतकरी, शेतमजूर, गावगाडा, त्यातील चालीरीती, नातेसंबंध याबरोबर दारिद्र्य, अज्ञान, हेवेदावे, संकेत, परिस्थितीशरणता, लाचारी, मनोव्यापार यांचं सूक्ष्म चित्रण बोराडे सरांच्या साहित्यात येतं, असा उल्लेख करण्यात आला आहे. 


त्याचबरोबर पाचोळा, आमदार सौभाग्यवती, मळणी, नातीगोती यासह इतर साहित्यकृतीतील कथांचेही रसग्रहण करण्यात आले आहे. 


विशेष म्हणजे अनेक मोठ्या लेखकांना आपण जसजसे मोठे होऊ लागलो, तसतसा आपलाच मोठा सन्मान व्हावा होऊन गौरव व्हावा, असे वाटत राहते. परंतु आपणही कोणाचा सन्मान करावा, कौतुक करावे, याचा सोयीस्कर विसर पडलेला असतो. परंतु बोराडे सर मात्र याला अपवाद ठरले असून त्यांनी आपल्या वयाच्या एकसष्टीपासून नव्याने साहित्यप्रांतात पाय ठेवू पाहणा-या साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून 'शेतकरी साहित्य पुरस्कार' देऊन सन्मानित व प्रोत्साहित करण्याची चालू ठेवलेली परंपरा त्यांच्या साहित्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची वाढवणारी ठरते. स्वतःची उंची हिमालयाएवढी करणा-या व इतरांवर आभाळागत माया करणा-या या साहित्यातल्या बाप माणसाच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा , साहित्यसेवेचा अतिशय उत्कृष्ट असा आढावा डाॅ. सावंत यांनी घेतला आहे. 


त्यांना आतापर्यंत मिळालेल्या अनेक मानसन्मानांबरोबर महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्काराचाही उल्लेख करण्यात आला आहे. 


विशेष म्हणजे आपल्या ज्येष्ठतेचा आब राखत त्यांनी स्वतःच यापुढे कोणताही पुरस्कार स्वीकारणार नाही व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारणार नाही. असे जाहीर केले आहे. असा भीष्माच्या त्यागाची जातकुळी दाखवून देणारा साहित्यिक मराठी साहित्यात तरी विरळाच म्हणायला हवा.


नवी हत्यारं परजणारा कथाकार म्हणून ज्यांचा उल्लेख केला ते मराठवाड्यातील एक मनस्वी कथाकार प्रा. भास्कर चंदनशिव यांच्याही साहित्यसेवेचा आढावा डाॅ. सुरेश सावंत यांनी या पुस्तकात घेतला आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यातील हासेगाव या लहानशा खेड्यात एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या भास्कर चंदनशिव यांच्या शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाचा आढावा घेतला आहे. महाविद्यालयीन जीवनात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या भाषणाने प्रभावित होऊन शेतक-यांच्या सुखदुःखाकडे आकृष्ट होऊन त्यावर ते गांभीर्याने चिंतन करू लागले. पुढे वैजापूरच्या विनायकराव पाटील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू झाल्यावर त्यांनी रसिकरंजन मंडळ, शब्दवेध साहित्य मंडळ, सत्यशोधक व्याख्यानाला, नाट्यमंडळे, राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत लोककला शिबिरे, शेतकरी वाड्.मय शिबिर, ग्रामीण आत्मकथन शिबिर, कथालेखन कार्यशाळा, नवलेखक शिबिर, विद्यार्थिनीलेखन शिबिर, अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करत मराठवाड्यातील ग्रामीण साहित्य चळवळीच्या उगमस्थानाला पायवाट निर्माण करून दिली. 


त्याच दरम्यान , वैजापूर येथे महात्मा फुले यांच्या शेतक-याचे आसूड या पुस्तकाच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने शेतकरी नेते शरद जोशी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले. त्या व्याख्यानाचा प्रा. चंदनशिव यांच्या मनावर एवढा खोल परिणाम झाला की, त्यांच्या मनात शेक-यांची दुःखे , व्यवस्थेविषयीचा संताप, अन्यायाविरुद्ध मनस्वी चीड त्यांच्यात निर्माण झाली.  


पुढे शेतकरी सुखदुःखाशी अधिक समरस व संवेदनशील होत जांभळढव, मरणकळा, अंगारमाती, नवी वारूळं, बिरडं असे एकापेक्षा एक सरस कथासंग्रह लिहून ग्रामीण मराठी साहित्यात त्यांनी आपल्या प्रतिभा सामर्थ्याचा एक आगळावेगळा ठसा उमटविला आहे. 


 माती आणि मंथन, माती आणि नाती, भूमी आणि भूमिका या समीक्षात्मक व वैचारिक लेखसंग्रहांतून मातीशी नातं असलेल्या व्यक्तींच्या वाड्.मयाची व कार्याची डोळस कारणमीमांसा केली आहे. 


त्याचबरोबर त्यांच्या कथासंग्रहातील सरपंच, निवडणूक, पोस्टर, कावड, गुन्हेगार, वाटा, खेळ, पोटाचं पोटाला, जांभळढव्ह , एक कथा, रंडकी आवस, वासना, पोटांधळं, चिमणीचा घरटा, घात, इलाज, वतनाचा इनाम, तोडणी, नवी हत्यारं, लाल चिखल, मेखमारो, आग, पाणी, मसणवटा, बाप- लेक, पाणबळी, कळा, हिशोब, सडणी, स्फोट, येडगण्या, मेंगट्या आदी कथांचा उल्लेख करून गावातील राजकारण, दलित समाजाच्या व्यथा वेदना, शोषक- शोषित घटक, दलित- सवर्ण संघर्ष, शेतकरी आंदोलन, धरणग्रस्तांच्या व्यथा, दुष्काळी परिस्थिती मनोरूग्णांची मानसिकता , कौटुंबिक ताणतणाव, याबरोबरच वर्तमान जीवनातील बदलत्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक व सांस्कृतिक परिणाम कथाकारांनी कसा मांडलाय याची ओळख डाॅ. सावंत यांनी करून दिली आहे. 


एखादा शेतकरी शेतीनिष्ठ होऊन आपल्या काळ्या आईची ज्या निष्ठेने सेवा करतो, तीच निष्ठा, तोच सेवाभाव , तोच आत्मभाव ठेवून प्रा. भास्कर चंदनशिव यांनी आयुष्यभर शेतीमातीशी एकनिष्ठ राहणारी, ग्रामीण भागातील अनेक पात्रं उजगार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या साहित्यसेवेला शाबासकी म्हणून महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाड्.मय निर्मिती राज्य पुरस्कार, दमाणी साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. अशा कृषिनिष्ठ जाणिवांचा धनी असलेल्या ग्रामीण साहित्यिकाचा सर्वस्पर्शी परिचय डाॅ. सावंत यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने करून दिला आहे. 


वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी 'बारोमास' कादंबरीच्या रूपाने ज्यांना साहित्य अकादमीचा साहित्यातील अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार मिळाला, ते डाॅ. सदानंद देशमुख यांच्याही एकूण वाड्.मयीन वाटचालीचा परामर्श डाॅ. सुरेश सावंत यांनी या पुस्तकात घेतला आहे. 


बुलढाणा जिल्ह्यातील आमडापूरसारख्या आडवळणाच्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सदानंद देशमुख यांची शेतीचीच कौटुंबिक पार्श्वभूमी असल्यामुळे शेती व्यवसायाशी आपसूकच जवळचा संबंध आला. आईने सांगितलेल्या कथा-कहाण्यांचा संस्कार लहानपणीच डाॅ. देशमुख यांच्यावर होत गेला. 


पुढे शेतीविषयीच्या जाणिवा समृद्ध होत गेल्या. सततचा दुष्काळ, नापिकी, शेतमालाला मातीमोल भाव, आतबट्ट्याची शेती, हे शेतक-याच्या भोवताल बारोमास फिरणारं चक्र लेखकाला अस्वस्थ करून सोडत होतं. आतून हादरून सोडत होतं. 


दुष्काळ, दैन्य, दारिद्र्य, उपहास, लाचारी यात शेतक-यांची दरवर्षी होणारी ससेहोलपट पाहून तहान, बारोमास, खुंदळघास, रगडा, लचांड, उठावण, महालूट, गाभुळगाभा , गावकळा, मेळवण, भुईरिंगण अशा कादंबरी , कथा, कविता यांच्या माध्यमातून शेतक-यांचे अस्वस्थ वर्तमान डाॅ. देशमुख यांनी मांडलं. 


सुशिक्षित बेरोजगार, महिलांवरील अत्याचार, पाणीटंचाई, शेतक-यांची व्यापा-यांकडून होणारी लूट, यासह ग्रामीण भागातील इतर अनेक समस्या अतिशय खोलवर जाऊन डाॅ. सदानंद देशमुख यांनी आपल्या साहित्यात मांडल्याचा उल्लेख डाॅ. सावंत यांनी केला आहे. 


निसर्ग आणि कर्ज या दोन तोंडी अजगराच्या विळख्यात सापडलेल्या शेतकरी कुटुंबाची वाताहत म्हणजे देशमुखांनी लिहिलेली 'बारोमास' ही कादंबरी होय,अशा शब्दांत बारोमासचे वर्णन डाॅ. सावंत यांनी केले आहे. 


त्याहीपुढे जाऊन ही कादंबरी शेती जीवनाशी निगडित असलेल्या शेतक-यांची आणि शेतीचीही शोकांतिका ठरली आहे, असे ते म्हणतात . 


डाॅ. सदानंद देशमुख यांनी आतापर्यंत लिहिलेल्या एकूणच साहित्याबरोबर त्यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांचाही उल्लेख करण्यात आला आहे. 


मराठवाड्यातील अजून एक म्हत्त्वाचे नाव म्हणजे तु.शं. कुलकर्णी हे होय. 


तु.शं. कुलकर्णी हे आज नांदेड येथे स्थित असले, तरी त्यांचं जन्मगाव हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा हे आहे. त्यांचं माध्यमिक शिक्षण हैदराबाद येथे तर महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झाले . पुढे तेथेच सरस्वती भुवन महाविद्यालयात प्रदीर्घ काळ प्राध्यापक म्हणून काम केले आहे. त्यांनी ऐन तारूण्यात हैदराबादच्या निजामाची जुलमी राजवट जवळून पाहिली आणि द्विभाषिक राज्याच्या निर्मितीच्या कालखंडातच तु. शं . यांच्या लेखनाला सुरूवात झाली. त्यमुळे या संक्रमण काळातील स्थित्यंतराचे सूक्ष्म पडसाद त्यांच्या साहित्यात पडल्याचे जाणवते. तु. शं. जसे श्रेष्ठ दर्जाचे लेखक आहेत, तद्वतच ते एक जाणकार वाचक आहेत. मराठीबरोबरच हिंदी, उर्दू, इंग्रजी या भाषेचे अभ्यासक आहेत. बहुभाषिक संस्कारातून त्यांची लेखणी संस्कारित होत गेल्याचा उल्लेख डाॅ. सावंत यांनी केला आहे. 


तृणाची वेदना, ग्रीष्मरेषा, अखेरच्या वळणावर, कानोसा ही चारच पुस्तके त्यांच्या नावावर असली, तरी ते मोजकेच परंतु कसदार लेखन करणारे अक्षरयात्री आहेत,असा गौरवपूर्ण उल्लेख डाॅ. सावंत यांनी त्यांच्याबाबतीत केला आहे. 


कथा, कविता, समीक्षा असे विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांचे काव्यलेखन बी. रघुनाथ, वा. रा. कांत, ना. धों.महानोर यांच्याशी साधर्म्य राखणारे आहे. त्यांच्या समीक्षेच्या बाबतीत कवी फ.मु. शिंदे यांच्या शब्दात सांगायचं झालं तर 'विश्वमित्राची व्याघ्रता आणि कण्वाची करूणा आलिंगणात आत्मीय होऊन जावी ' अशा सद्भावनेची समीक्षा तु. शं. कुलकर्णी यांनी लिहिली आहे. 


कथेच्या बाबतीत तु. शं .ची कथा ही कल्पनेचे मोरपंख लावून भरा-या मारणारी नव्हे, तर प्रखर वास्तववादाचे सजग भान असणारी कथा आहे, असे वर्णन लेखकाने केले आहे. 


तु. शं. कुलकर्णी हे साहित्यसेवेबरोबरच ते सामाजिक, राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील संक्रमण काळाचे साक्षीदार आहेत, असे सांगत त्यांच्या ( कड्याच्या तुकारामाच्या ) जगण्याची व लेखनाची तुलना चक्क देहूच्या तुकारामाशी केली आहे. 


मराठवाड्याच्या साहित्यप्रांतातील मनमौजी म्हणून ज्यांची ओळख आहे, असे कविवर्य फ.मु. शिंदे यांच्या खट्याळ व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडत त्यांच्या लग्नाची रंजक गोष्ट लेखकाने सविस्तर मांडली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्यांच्या ठायी असलेल्या जिद्द, चिकाटी, परिश्रम, कृतज्ञता, समर्पणशीलता, वैचारिकता, भावोत्कटता, कार्यकुशलता, कार्यमग्नता, सालस बहुश्रुतता, प्रांजळपणा नि मोकळेपणा, मनस्वीपणा व खट्याळ मिश्किलपणा आदी गुण वैशिष्ट्यांबरोबरच विलक्षण बुद्धिमत्तेचा आणि अभिजात रसिकतेचा बादशहा अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले आहे. त्यांच्या काही गाजलेल्या कवितांचे रसग्रहणही अतिशय तरल भाषेत केले आहे. 


'आरोग्यपर्यटन आणि आरोग्यसेवेत रमलेला आनंदयात्री' या शब्दांत डाॅ. अच्युत बन यांचे वर्णन करून नांदेड जिल्ह्यातील होटाळ्यासारख्या अतिशय लहानशा गावात एका गोसावी कुटुंबात जन्म घेऊन उच्च शिक्षणाची कसली पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून पुढे येत, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतील शिक्षणाचा आढावा या लेखात लेखकाने घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर नांदेड येथे वैद्यकीय क्षेत्रात आपला योग्य जम बसवल्यावर जग भ्रमंतीचे वेड जोपासत तब्बल पन्नासच्या वर देशांना जाऊन तेथील चालीरीती, निसर्ग, भव्यदिव्यता, गुणवैशिष्ट्ये यांचा अभ्यास करून त्यावर सुमारे १८ प्रवासवर्णनपर पुस्तके लिहून सगळ्यांना स्तिमित केले आहे. एकूणच त्यांच्या आजपर्यंतच्या थक्क करणा-या प्रवासाबद्दल डाॅ. सावंत यांनी अतिशय तपशीलवार लिहिले आहे. त्याचबरोबर वैद्यकीयसेवा, जगभ्रमंतीबरोबरच प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान स्थापन करून महाराष्ट्रातील अनेक गुणी साहित्यिकांचा गौरव करण्याची परंपरा चालू केल्याचा उल्लेखही केला आहे. 


धर्मा, पांगोरे, काजोळ, कायापालट, रंग नाही पाण्याला, दशक्रिया, नीतीकथा, तंट्या भिल्ल, आदी साहित्यकृतींबरोबरच महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनचरित्राच्या माध्यमातून अखिल भारतीय पातळीवरचा बृहद् प्रकल्प साकार करणारे, तत्वचिंतक, थोर अभ्यासक, बालसाहित्यिक, प्रकाशक बाबा भांड यांच्या कार्याचाही आढावा घेण्यात आला आहे. 


बाबांची पार्श्वभूमीही खेडेगावची आणि शेतकरी कुटुंबातीलच आहे. योग्य वेळी योग्य मार्ग सापडत गेला आणि आज बाबा भांड हे साहित्यविश्वातला बापमाणूस म्हणून उदयास आले. बालसाहित्यिक म्हणून जरी त्यांची सुरूवात झाली, तरी पुढेपुढे ते संशोधनात्मक लेखन करणारे लेखक म्हणून नावारुपाला आले. त्यांनी आपल्या आयुष्यात केलेले संशोधनकार्य पाहून थक्क व्हायला होतं. साहित्यसेवेबरोबरच 'साकेत' ही प्रकाशनसंस्था स्थापन करून मराठवाडा व मराठवाड्याबाहेरचे अनेक लेखक, कवी त्यांनी प्रकाशात आणले. 


लेखकाच्या उमेदीच्या काळात गुरूजी म्हणून लाभलेले व त्यांच्यासोबत राहून नकळत लेखकावर साहित्यसंस्कार करण्यास कारणीभूत ठरलेले पु. अ. पांडे या व्रतस्थ माणसाच्या जीवनचरित्रासह लेखनकार्याचा आढावा घेत त्यांच्या अनेक कवितांचे रसग्रहण विविध अंगांनी केले आहे. 


नितळमनाचा माणूस म्हणून भगवान अंजनीकर यांचा लेखकाने नावाला व वागण्याला साजेसा गौरव केला आहे. समकालीन कोणाशीही स्पर्धा न करता निरंतर लिहीत राहणे हे ध्येय ठेवून जवळपास ११४ पुस्तके लिहिण्याचा व विविध संस्थांच्या अनेक पुरस्कारांसह महाराष्ट्र शासनाचे पाच उत्कृष्ट वाड्.मय निर्मिती राज्य पुरस्कार मिळवण्याचा विक्रम केल्याचा उल्लेख आला आहे. त्यांच्या सोज्वळ व्यक्तिमत्त्वाबरोबर त्यांनी चालवलेल्या वाड्.मयीन चळवळीचा आढावा घेतला आहे. 


पत्रकारितेतून साहित्यिक झालेल्या संदीप काळे व कार्यकर्ता ते साहित्यिक असा प्रवास केलेल्या, नव्या पिढीचं आशास्थान ठरू पाहणा-या बाळू दगडूमवार या दोन समकालीन, समवयस्क मित्रांचीही दखल घेत त्यांचं साहित्य व त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा वेध डाॅ. सुरेश सावंत यांनी घेतला आहे. 


'अक्षरयात्री' या पुस्तकात एकूण तेरा साहित्यिकांवर लेख आहेत . पैकी अकरा साहित्यिक हे ज्येष्ठ आहेत, तर दोन साहित्यिक हे नवीन पिढीतील आहेत. या पुस्तकातील समाविष्ट साहित्यिकांचा अगदी जन्मगावापासून सुरु झालेला प्रवास, साहित्यप्रवास, विविध साहित्य प्रकारांत लिहिलेलं समग्र साहित्य, मिळालेले सन्मान याचा एकत्रित ठेवा डाॅ. सावंत यांनी मोठ्या कष्टाने एकत्र केला आहे. त्यामुळे नव्या पिढीसाठी हा ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून फारच मौलिक ठरणारा आहे. आशय- विषयाबरोबरच अतिशय सुसूत्रपणे या पुस्तकाची बांधणी व निर्मिती झाली आहे. 


 


 



  • पुस्तकाचे नाव : 'अक्षरयात्री' 

  • लेखक : डाॅ. सुरेश सावंत 

  • प्रकाशक: संगत प्रकाशन नांदेड 

  • मुखपृष्ठ : नयन बाराहाते 

  • पृष्ठ : ११२

  • मूल्य : १६०


टिप्पण्या