ओमप्रकाश शेटेंच्या प्रयत्नाने सांगलीच्या आ. देशमुखांचा वांगीत विकासनिधी


 


 - ह.भ.प.माने महाराजांच्या हस्ते बांधकामाचा शुभारंभ


 


दिंद्रुड (प्रतिनिधी)


    विधान परिषदेचे माजी आमदार तथा सांगली जिल्ह्यातील साखरसाम्राट पृथ्वीराज देशमुख यांच्या विकास निधीतून वांगी येथे सांस्कृतिक सभागृह बांधण्यात येत आहे. भूमिपुत्र ओमप्रकाश शेटे यांच्या विशेष प्रयत्नाने होत असलेल्या या कामाच्या बांधकामाचा शुभारंभ ह.भ.प.एकनाथ महाराज माने यांच्या शुभहस्ते करण्यात आला.


           माजलगाव तालुक्यातील वांगी (बु.) येथे स्वानंद सुख निवासी वै. संत नारायण बाबा यांची समाधी आहे. वर्षभरात येथे महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच नियमितपणे सांप्रदायिक कार्यक्रमाची मांदियाळी असते. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी येथे सांस्कृतिक सभागृह अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे ओमप्रकाश शेटे यांनी या पावन भूमीत सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी विधान परिषदेचे माजी आमदार तथा सांगली जिल्ह्यातील साखरसाम्राट पृथ्वीराज देशमुख यांच्याकडून विकास निधी प्राप्त करून घेतला.


           सामाजिक अंतराचे सर्व नियम व निकष पाळून सभागृहाच्या प्रत्यक्ष बांधकामाचा शुभारंभ संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.एकनाथ महाराज माने यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच दिपकराव जाधव, बंडू खांडेकर, भगवानराव कांदे, मारोती दुनगु, गणेशराव रासवे, हभप भारत महाराज गरड, सतीश जाधव, अंगद गरड आदी मान्यवर उपस्थित होते. गावाला सांस्कृतिक सभागृहासाठी निधी मिळवून दिल्या बद्दल ग्रामस्थांनी शेटे यांचे आभार मानले.


टिप्पण्या