राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज


       
       वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, विसाव्या शतकात होऊन गेलेला असा संत ज्या संताने बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक व्यवस्थेस जगण्याचा वास्तव मंत्र दिला. महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे या भूमीत अनेक संत झाले. जगतगुरु तुकाराम महाराज यांनी जशी विठ्ठल भक्ती शिकविली तसेच प्रबोधनाचे बाळकडूसुद्धा या समाजाला पाजले. संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, माउली ज्ञानेश्वर यांनी समाजाला विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. त्याच माळेतील संत तुकडोजी महाराज यांनी जगण्याचे वास्तव सांगितले. या संताने विश्वात असलेले सामाजिक, धार्मिक प्रस्थापित विचार प्रवाहांचा अभ्यास करून ज्यांचे जे जे चांगले त्याचा वास्तव जीवनाशी समन्वय साधून विश्वासकल्याणाचा मूलमंत्र या जगास दिला-
      आज संपूर्ण विश्व कोरोना आजाराने ग्रस्त आहे. संपूर्ण विश्वात हाहाकार मजला आहे. युद्धजन्य परिस्थिती सगळीकडे आहे. युद्धजन्य परिस्थितीपेक्षाही आताची परिस्थिती हि भयानक आहे. कारण युद्धात तहाचा पर्याय उपलब्ध असतो. आणी ते कुणाच्या तरी हातात असते पण आताची परिस्थिती हि भयाण आहे. आज सर्वानी समोर येऊन आपापल्या परीने जे होईल ते सहकार्य करण्याची गरज आहे या बाबतीत वंदनीय महाराजांच्या ग्रामगीतेतील एक ओवी मला आठवते. वंदनीय महाराज म्हणतात,
      अरे उठा उठा, श्रीमंतांनो , अधिकाऱ्यांनो पंडितांनो,
      सुशिक्षितांनो साधुजनांनो , हाक आली क्रांतीची ...... 
आजच्या या समयी राष्ट्रसंतांच्या हे विचार घेऊन प्रेरित होण्याची हि वेळ आहे. आणि या संकटावर मत करण्यासाठी आपापल्या परीने पुढे येण्याची गरज आहे. बदलत्या काळात सर्व व्यवस्था हि शहराकडे केंद्रित झालेली आहे. ज्या गावाने सर्वकाही दिलं त्या गावाला हींन समजणारी माणसे व त्या गावाकडे ढुंकूनही न बघणाऱ्या माणसांनी आज गावाची वाट धरली आहे. पण गाव हेच आपले प्रथम महेर आहे हि जण वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेत अगोदरच दिली आहे. वंदनीय महाराज म्हणतात कि,
      मानवमात्राचे प्रथम माहेर, आपले गाव त्यातील घर,
      त्यातून प्रगती करीत सुंदर, पुढे जावे विश्वाच्या .... 
आज जत्थेच्या जत्थे गावाकडे निघालेत. ज्यांचे गावाकडे काहीच नाही त्यांना पर्याय नाही पण मनातून गावाची आठवण तर नक्कीच येत आहे. त्यामुळे आपल्या गावाचे भान राखण्याची जाण वंदनीय राष्ट्रसंतांचे विचार आम्हाला देते. आज आपली समाजव्यवस्था पुढारी प्रधान झाली आहे. एक दगड मारला तर तो चार लोकांना बसावा अशी आपल्या समाजातील पुढारी या जमातीची झाली आहे. कधी कधी तर व्होटर कमी व लीडर जास्त अशीही प्रचिती आपल्याला येते यावर वंदनीय राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेत पुढारी कसा असावा याचे वर्णन करताना सांगितले कि, 
       लोकांशी जे शिकवावे, आधी आपणचि आचरावे,
       नुसते पुढारी म्हणोनि मिरवावे, तेणे आदर ना वाढे...... 
आज समस्त पुढार्यांनी जर ग्रामगीता हातात घेतली आणि त्यानुसार आचरण केले तर खरोखरच समाजाचे व त्याचे स्वतःचे भले झाल्याशिवाय राहणार नाही. आज एवढं मोठ संकट संपूर्ण विश्वावर असताना जगभरात, देशभरात जे राजकारण, आरोप प्रत्यारोप सुरु आहे ते अतिशय हीन आहे. 
      कष्टासाठी कोणीही मरो, प्रतिष्टेसाठी आपणचि उरो.... 
हि प्रवृत्ती देशविघातक आणि देशाला मागे नेणारी आहे म्हणून या प्रवृत्तीला अशा संकटाच्या वेळी जागे करण्यासाठी वंदनीय  राष्ट्रसंतांचे विचार हि काळाची गरज आहे.
आज समाजातील गरीब माणसावर उपाशी झोपण्याची पाळी आली आहे. ज्या श्रमिकांच्या श्रमावर भांडवलदारांनी आपले साम्राज्य उभे केले ते काही भांडवलदार आज त्याच मजुरांना वाऱ्यावर सोडताना दिसत आहे त्यावर महाराज म्हणतात कि,
    धन हे गरिबांचे रक्त, समाजोनी वागवत श्रीमंत ..... 
समस्त श्रीमंतांना दिलेला हा इशारा आज समजुन घेण्याची ही वेळ आहे. ज्यांची दोन वेळ जेवण्याची सोय आहे त्यांनी समजून घेणे आवश्यक आहे आणि आपल्या भोवताल कुणी उपाशी तर नाही ना याची काळजी घेण्याचे भान हे ग्रामगीता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार देते. तर संत दामाजीने आलेल्या परिस्थितीत गरिबांकरिता धान्याची कोठारे कशी खुली केली याचा दाखला वंदनीय महाराज देतात. जे प्रेरणादायी आहे. तर वंदनीय महाराज सेवासामर्थ्य या अध्यायात म्हणतात कि, अशा परिस्थितीत काही लोक कशा प्रकारे परिस्थितीचा गैरफायदा घेतात,
   काहींनी धंदा उभा केला, सेवेने दिपविले थोरामोठ्याला,
   आतुनी नष्ट  केले लोकजीवनाला, भ्रष्ट वस्तू पुरवोनिया.... 
आज अशाही परिस्थिती नाव मोठे नि लक्षण खोटे असे असणारी अनेक माणसे आहेत... दिवसेंदिवस फोटोसंस्कृती वाढत चालली आहे. दान द्यायचे पण फक्त फोटोपुरते हा विचार जास्त पुढे जात आहे ज्यावर वंदनीय महाराजांनी तेव्हाच प्रहार केला आहे. 
   वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार हे सार्वकालिक, सोपे, समन्वयवादी व अखिल समाजाचे कल्याण करणारे आहे. समाजातल्या प्रत्येक माणसाने ते अंगिकारण्याचा प्रयत्न केला तर अखिल समाजाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या या कठीण प्रसन्गताची राष्ट्रासनतचे विचार हे नवी प्रेरणा व नवी जाणीव देते . 
   सर्वाकडोनी ऐसी सेवा नव्हें, तरी गरजुंना सहकार्य करावे,
   होईल तेवढे तरी करावे, निष्कपटपणे. ..... 
आजच्या या परिस्थितीत वंदनीय राष्ट्रसंतांच्या या ओवीप्रमाणे आपण कर्तव्यरत राहण्याची आवश्यकता आहे.... या कठीण काळात आपण केलेल्या कर्तृत्वाची ऊर्जा हि आपल्या भविष्यच्या जगण्याची प्रेरणा असेल यात शंका नाही.


टिप्पण्या