नांदेड:( दि.१४ जानेवारी २०२६)
यशवंत महाविद्यालयात अध्यात्मिक शिक्षण समितीतर्फे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ध्यान शिबिर संचालक श्री.सुरेश धूत यांच्याद्वारे संचालित विविध ध्यानप्रयोगांनी विद्यार्थी आणि श्रोतावृंद ध्यानमग्न झाले.
ध्यान उपक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, ध्यान ही विज्ञानवादी संकल्पना असून भारताने जगास दिलेली अमूल्य देणगी आहे. विद्यार्थी जीवनात ध्यानधारणा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परीक्षेचा, स्पर्धेचा व भविष्यविषयक चिंता व ताणतणाव व्यवस्थापनासाठी नित्य ध्यानधारणा करणे काळाची गरज बनलेली असल्याचे प्रतिपादित केले.
याप्रसंगी श्री.सुरेश धूत यांनी, जिबरीश ध्यान, नृत्य ध्यान, हास्य ध्यान, सायलेंट सीटिंग, लिसनिंग मेडिटेशन आदी ध्यानप्रयोगांनी संपूर्ण सभागृह हर्षोल्हासीत व आनंदमय केले. ध्यानधारणेविषयी बोलताना ते म्हणाले की, स्वतःला ओळखण्याची कला ध्यानामुळे प्राप्त होते तसेच मनाची शांतता व अतिविचार आणि अनावश्यक विचारांपासून मुक्ततादेखील मिळते. मन आणि मनाच्या पलीकडे जाण्याची क्षमता केवळ ध्यानामध्ये आहे.
प्रारंभी प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.अजय गव्हाणे यांनी केले. शेवटी आभार डॉ. दिगंबर भोसले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. रत्नमाला म्हस्के, डॉ.राजकुमार सोनवणे, डॉ.एल. व्ही. पदमाराणी राव, डॉ.मीरा फड, डॉ.शिवराज बोकडे, डॉ.साईनाथ बिंदगे प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, संविधान कांबळे, सचिन सरोदे, अनुपकुमार मस्के यांनी परिश्रम घेतले.
ध्यानसाधक सुभाष रणवीर, उमरखेड यांनी मान्यवरांना भगवान रजनीश (ओशो) यांच्या प्रवचनावर आधारित शिक्षा मे क्रांती, योग:एक विज्ञान, ध्यान-सूत्र आदी ग्रंथ भेट देऊन सन्मानित केले. यावेळी रामदास पुपलवाड, लोहा, डॉ. साहेब ढवळे आणि विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

addComments
टिप्पणी पोस्ट करा