नांदेड:(दि. ११ जानेवारी २०२६)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचालित यशवंत महाविद्यालयातील हिंदी विभागाच्या वतीने माजी प्र-कुलगुरु प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक हिंदी दिनानिमित्त “हिंदी भाषेचे जागतिक महत्त्व” या विषयावर विशेष व्याख्यान दि. १० जानेवारी रोजी वाणिज्य विभाग स्मार्ट क्लास येथे संपन्न झाला.
प्रमुख वक्ते महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथील हिंदी विभागाचे डॉ. बसवेश्वर नागोराव बेंद्रे उपस्थित होते. अध्यक्षस्थान हिंदी विभागप्रमुख डॉ. संदीप पाईकराव यांनी भूषविले.
सूत्रसंचालन व प्रास्ताविक हिंदी विभागातील डॉ. साइनाथ साहू यांनी केले आभार डॉ. विद्या सावते यांनी मानले. या प्रसंगी हिंदी विभागातील प्राध्यापकवर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. साइनाथ साहू यांनी जागतिक हिंदी दिनाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, हिंदी ही केवळ भारताची राजभाषा नसून जगातील अनेक देशांमध्ये बोलली व समजली जाणारी प्रभावी भाषा आहे. या व्याख्यानाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये हिंदीच्या जागतिक स्वरूपाविषयी जागरूकता निर्माण करणे हाच या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले.
प्रमुख वक्ते डॉ. बसवेश्वर बेंद्रे यांनी, हिंदी भाषेचा ऐतिहासिक विकास, सांस्कृतिक पाया आणि जागतिक विस्तार यावर सविस्तर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, हिंदीने आता राष्ट्रीय सीमांच्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली सशक्त उपस्थिती नोंदवली आहे. संयुक्त राष्ट्र संघ, आंतरराष्ट्रीय परिसंवाद तसेच जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये हिंदीचा अभ्यास केला जात असल्याने हे स्पष्ट होते.
डॉ. बसवेश्वर बेंद्रे यांनी पुढे सांगितले की, प्रवासी भारतीयांमुळे हिंदी भाषा अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस, फिजी आणि सुरिनामसारख्या देशांमध्ये लोकप्रिय होत आहे. तंत्रज्ञान, सोशल मीडिया, सिनेमा आणि डिजिटल माध्यमांनी हिंदीच्या जागतिक प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विद्यार्थ्यांनी हिंदीकडे रोजगार, संशोधन आणि जागतिक संवादाच्या दृष्टीने पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. संदीप पाईकराव यांनी, हिंदी ही केवळ एक भाषा नसून भारतीय संस्कृती आणि जीवनदृष्टीची संवाहक आहे. प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात अशा शैक्षणिक व साहित्यिक उपक्रमांचे नियमित आयोजन केले जात असून, ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. हिंदी विभागाच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करत विद्यार्थ्यांना हिंदीबद्दल आत्मगौरव बाळगण्याचा संदेश दिला.
शेवटी डॉ. विद्या सावते यांनी आभार मानले. उपस्थित विद्यार्थ्यांनी व्याख्यान अत्यंत ज्ञानवर्धक व प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, अभय थेटे, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा