वंशावळीच्या प्राचीन सरीतील दाहक कविता अर्चना काळे येवले, नांदेड.

 

'वंशावळीच्या प्राचीन सरीतून' ह्या प्रतिभा खैरनार यांच्या कवितासंग्रहाचा मुख्य विषय बाई आणि बाईपणाचे सनातन दुःख हा असून यात त्यांनी ग्रामीण भागातील कष्टकरी बाईचे जिवंत चित्रण केलेले आहे.त्यांच्या मनोगताच्या दोन ओळींतून बाईच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सोशिकतेची दु:खद कहाणी समजते. कवयित्रीच्या जन्माच्या वेळी परिस्थितीने पोळलेली त्यांची आई आणि त्यात 'मुलगीच जन्माला आली, म्हणजे सामाजिक यज्ञकुंडात आहुती देण्यासाठी अजून एक बाई!' 'घुसमट' कवितेत कवयित्रीने अगदी नेमक्या शब्दांत सुधारलेल्या आणि स्वतंत्र स्त्रीच्या आतली बाई वर्णिली आहे.'एकदा तळपत्या उन्हात' ही कविता तर अंगावर काटा आणते. ह्या कवितेत आजकालचे नीतिभ्रष्ट लोक स्त्रीच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन एखाद्या स्त्रीला कसे आयुष्यातून उठवतात, याचे प्रत्ययकारी चित्र रेखाटले आहे. आजकाल एखाद्यावर विश्वास ठेवणे स्त्रीसाठी किती अवघड झाले आहे, हे या कवितेत दिसून येते.

स्त्री स्वतंत्र झाली, समाजात तिला बरोबरीचे स्थान आहे, असा आव आणणाऱ्या लोकांना घुसमट, मेक ओव्हर, संगम ह्या कवितांतून कवयित्रीने हे सांगितले आहे, की फक्त वरून सुंदर आणि फॅशनेबल राहिल्यामुळे तिला तिचे हक्क मिळाले असे होत नाही. तिची आजही तितकीच कुचंबना होते. उलट जास्त प्रमाणात तिचा छळ केला जातो, टोमणे मारले जातात तरी ती सर्व मेकअप खाली लपवून हसत हसत जगासमोर येते. किती दयनीय अवस्था आहे आजच्या स्त्रीची!बंधारा, पदर, चुंबळ, श्वास, किंकाळ्या, अलंकार, सोन्याचा मुकुट, कागदी फूल, तडफड या कवितांतून स्त्री आहे ती परिस्थिती स्वीकारून मुलांसाठी, कमावण्यासाठी जेव्हा घराबाहेर पडते, तेव्हा तिला कितीतरी वाईट नजरा झेलाव्या लागतात, तरी ती आपलं चारित्र्य जपण्याचा आटोकाट प्रयत्न करते.आत्महत्या' कवितेतून बाईची परकोटीची सहनशीलता आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तिची अचाट शक्ती दिसून येते.मुंग्या आणि मुली, बाई आणि चूल, कोडी भाकर, पितळी घंटा, या कवितांतून स्त्री आणि मंदिरातील घंटा, चूल आणि कोडी भाकर यांच्यातले साम्य कवयित्रीने नेमक्या शब्दांत अधोरेखित केले आहे. बाईच्या आतली बाई, सखी, अस्तित्व, मला मी भेटले नाही, अनुत्तरित मी ह्या कवितांतून ही स्त्री स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करते आहे.घरंदाज हुंदके, टिंम्बांची रांगोळी, आयुष्याचा पसारा या कवितांतून अनेक सधन घरातील स्त्रियांची होणारी घुसमट आणि त्या ती घुसमट लपवत, हसरा मुखवटा कसा धारण करतात, त्याची कहाणी अगदी नेमक्या शब्दांत मांडली आहे.लिलाव' ह्या कवितेतून तर स्त्रीच्या रक्षणासाठी स्त्री ही स्वतःलाच विकते, हे वाचून हृदय हेलावून जाते. एकूणच ह्या कवितासंग्रहात स्त्री आणि तिची होणारी घुसमट, तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला लढा देत तिचं जगणं, हक्काच्या प्रेमासाठी झुरणं, प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करणं, तिची जिद्द, तिची सहनशीलता यावर अतिशय उत्तम प्रकारे झगझगीत प्रकाश टाकला आहे.उत्तम कवितालेखनासाठी कवयित्री प्रतिभा खैरनार यांचे हार्दिक अभिनंदन!

अर्चना काळे येवले, नांदेड.

टिप्पण्या