११व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सुरेश सावंत यांची निवड.

धाराशिव, दि. २०पळसप (ता. जि. धाराशिव) येथील शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान आणि किसान वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांची निवड करण्यात आली आहे. वसंतराव काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी हे संमेलन होत असते. यंदाचे हे एक दिवसीय साहित्य संमेलन सोमवार, दि २ फेब्रुवारी रोजी पळसप येथे होणार आहे. आमदार विक्रम काळे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. संयोजकांच्या वतीने प्रा. डी. बी. जांभरूनकर आणि यशवंत कांबळे यांनी डॉ. सावंत यांना निवडपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. 

यापूर्वी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. भास्कर चंदनशिव, प्रा. दत्ता भगत, उत्तम कांबळे, प्रा. ललिता गादगे, इंद्रजित भालेराव, डॉ. जगदीश कदम, डॉ. वृषाली किन्हाळकर, अंजली धानोरकर, डॉ. आसाराम लोमटे इ. मान्यवरांनी ह्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. या साहित्य संमेलनात परिसंवाद, कथाकथन आणि कविसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. यात दरवर्षी नवोदित कथाकार आणि कवींना सामावून घेतले जाते. 

हे संमेलन मराठवाडा पातळीवरचे असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न या संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. आमदार विक्रम काळे हे सातत्याने करीत असतात. या साहित्य संमेलनातून नवोदित साहित्यिकांना प्रेरणा मिळावी, असाही उद्देश या साहित्य संमेलनाच्या आयोजनात आहे. यंदा या साहित्य संमेलनाचे आयोजन अतिशय दिमाखदार स्वरूपात करण्यात येणार आहे. या संमेलनात भव्य ग्रंथदिंडी आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती  स्वागताध्यक्ष मा. विक्रमजी काळे तसेच संयोजन समितीचे प्राचार्य मधुकर गायकवाड, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे आणि प्रा. अंकुश नाडे यांनी एका पत्राद्वारे  दिली आहे. 

नियोजित संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सावंत यांची आजवर ५८ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या तीन पुरस्कारांसह अन्य प्रतिष्ठित साहित्यसंस्थांचे ४५ पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. शिक्षणक्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नांदेड जिल्हा परिषदेचा नरहर कुरुंदकर पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. पुणे येथील अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अलीकडेच त्यांना कुसुमताई चव्हाण जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. डॉ. सावंत यांचे साहित्य शालेय तसेच विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत समाविष्ट झाले आहे. त्यांच्या एकूण बालकवितेवर संशोधन करून एका विद्यार्थ्याने एम. फिल. ही पदवी संपादन केली आहे. अनेक विद्यापीठांत त्यांच्या बालसाहित्यावर संशोधन होत आहे. 

डॉ. सुरेश सावंत यांची १) वाचनसंस्कृती लेखनसंस्कृती, २) बालसाहित्य आणि बालशिक्षणाचा अनुबंध, ३) आजची मराठी बालकविता, आणि ४) बालसाहित्यातील नवे काही ही पुस्तके संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त ठरली आहेत. डॉ. सावंत यांनी कुंटूर, जळगाव आणि पैठण येथे संपन्न झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे. डॉ. सावंत यांनी १३५ पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत किंवा पाठराखण केली आहे. अलीकडेच शालेय विद्यार्थ्यांनी लिहिलेले आणि संतोष तळेगावे यांनी संपादित केलेले 'रानफुलं फुलवणारे बालकवी डॉ. सुरेश सावंत' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

साहित्यिक व साहित्यप्रेमींनी या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

टिप्पण्या