नांदेड :(दि.१९ जानेवारी २०२६)श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील मराठी विभाग आणि कै.डॉ.शंकरराव चव्हाण लेक्चर सिरीजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त कविता वाचन व व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर येथील मराठी विभागप्रमुख व लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ.सूर्यप्रकाश जाधव व महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी श्री. अमृत तेलंग होते. प्रथमतः दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ.संजय जगताप यांनी तर स्वागतपर मनोगत डॉ.विश्वाधार देशमुख यांनी केले. पाहुण्यांचा परिचय हिंदवी जाधव व दुर्गा देशमुख यांनी करुन दिला.डॉ.सूर्यप्रकाश जाधव यांनी, 'अभिजात मराठी भाषा: काल, आज आणि उद्या' या विषयावरील मार्गदर्शनात,'मराठी भाषेची अभिजातता टिकून ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे आले पाहिजे. भाषा समृद्धीमध्ये विद्यार्थी अत्यंत महत्त्वाचा घटक असून भाषा आणि संस्कृतीची जोपासना विद्यार्थ्यांनीच केली पाहिजे, असे ते म्हणाले. याप्रसंगी अमृत तेलंग यांनी आपल्या गाव आणि गावगाड्याविषयीच्या अंतःर्मुख करणाऱ्या कवितांनी श्रोत्यांची मने जिंकली. शेतकरी जीवनाचे अत्यंत विदारक चित्रण त्यांनी आपल्या कवितेतून केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि संस्कृतीबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले व यशवंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्य आत्मसात करून कौशल्याचे उपयोजन आपल्या जीवनात यशस्वीपणे करावे. यासाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांना नेहमी मदत करीत राहील, अशी हमी देऊन नवनवीन उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना या संधीचा फायदा करून दिल्या जाईल, असे गौरवोद्गार काढून उपक्रमशील मराठी विभागाच्या वतीने घेतलेल्या कार्यक्रमाची प्रशंसा केली.
याप्रसंगी अभिजात मराठी भाषेच्या संदर्भाने दोन भित्तीपत्रकाचे अनावरण करण्यात आले. त्या भित्तीपत्रकाचे संयोजन डॉ.शिवाजी सूर्यवंशी यांनी केले. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांची स्वागतपर मनोगते व्यक्त झाली. सूत्रसंचालन राधा कराड ह्यांनी तर शेवटी आभार गोदावरी कानशुक्ले ह्यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ.अजय गव्हाणे आणि विद्यार्थी विद्यार्थिनींची बहुसंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अधीक्षक गजानन पाटील यांनी सहकार्य केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा