श्रीमद्भगवद्गीता पठण । पाठांतर स्पर्धा संपन्न

 


नांदेड दि. २

श्रीदासगणु संत भक्त मंडळ आणि सायन्स कॉलेज नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या दहा वर्षांपासून गीताजयंतीनिमित्त श्रीमद्भगवद्गीता पठण / पाठांतर स्पर्धा आयोजित केली जाते. आतापर्यंत जवळपास वीस हायस्कूलच्या १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. 

 

 सोमवार दि. १ डिसेंबर रोजी ही स्पर्धा कुसुम सभागृहात संपन्न झाली. स्पर्धेसाठी गीतेचा १३वा अध्याय होता. शहरातील १२ शाळांच्या १२८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. 

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत आणि यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे हे उपस्थित होते. गीता परिवार नांदेडचे संस्थापक सदस्य ॲड. दागडिया, सायन्स कॉलेजच्या उपप्राचार्या सौ. अरुणा शुक्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.  

स्पर्धेचे परीक्षक प्रा. शंतनु कस्तुरे, श्री संताबास देशमुख आणि सौ. नीता चौधरी हे होते.

या स्पर्धेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक गुजराती हायस्कूल, टायनी एन्जल्स स्कूल, प्रतिभा निकेतन हायस्कूल यांनी पटकावले. कै. मदनूरकर गुरुजी उतेजनार्थ पारितोषके ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल व होली सिटी पब्लीक स्कूल यांनी पटकावले. पारितोषिक स्वरूप सन्मानचिन्ह व रोख ₹ ३०००/-, ₹२०००/- , ₹१०००/- व सर्वांना प्रमाणपत्र असे असते. 


कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व मंत्रघोषाने झाली. सर्व शाळेच्या संघांनी अध्याय सादर केल्यानंतर मागील तीन वर्षांतील विजेत्या विद्यार्थिनींनी गीतापाठांतराचे अनुभव सांगितले. ह. भ. प. प्रा. रामकृष्ण जामकर यांनी चित्रफीतीद्वारे गीतेचे महत्त्व आणि गीतेचा जगातील वाढता प्रभाव याबाबत सादरीकरण केले. 

प्रमुख पाहुणे डॉ. सुरेश सावंत यांनी विनोबा भावे आदी थोर माहात्म्यांनी वर्णन केलेले गीतेचे अनुभव व माहात्म्य सांगितले. तसेच त्यांच्या आयुष्यात दासगणु प्रतिष्ठानचे संस्कार झाल्याने साहित्य अकादमी व राष्ट्रीय पुरस्कारापर्यंतची वाटचाल सांगितली. विद्यार्थ्यांनी गीतेचे महत्त्व समजून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. 

प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी गीतेचे वैज्ञानिक महत्त्व व सकारात्मक विचार करण्याबाबत मार्गदर्शन केले. 


परीक्षकांच्या वतीने श्री. देशमुख यांनी गीता पाठांतर व अध्ययन याबाबत सांगितले. ॲड. दागडिया यांनी गीता परिवाराचे कार्य व विद्यार्थी अवस्थेतच गीतेच्या अभ्यासाची सवय लागल्यास आयुष्यात कसा फायदा होतो याबाबत सांगितले. 

दशकपूर्तीनिमित्त सर्व शाळांच्या शिक्षकांचा प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. 

उपस्थितांचा परिचय व प्रास्ताविक प्रा. डाॅ. श्री वेसणेकर यांनी केले. प्रा. डॉ. अर्चना राजूरकर यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन श्री रेणुकादास कंधारकर व श्री. श्रेय पानसे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ब्र. स्वामी वरदानंद भारती यांच्या राष्ट्रसंरक्षण पोवाड्यातील पसायदानाने झाली. रेणुकादास कुलकर्णी, ॲड. केदार जामकर, श्रेय पानसे, बाळू जिल्हेवार, यांनी पसायदान सादर केले. 

कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, नागरिक, दासगणु भक्त मंडळाचे सदस्य, सायन्स कॉलेजचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या