नांदेड दि. २४
साहित्य अकादमी, नवी दिल्ली आणि भारत सरकारचे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हैदराबाद येथील राष्ट्रपती निलयममध्ये दि. २१ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत भारतीय कला महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. ह्या महोत्सवात दि. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी 'फेस टू फेस' ह्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. नारायणगाव (पुणे) येथील साहित्यिक डॉ. मिलिंद कसबे यांनी ही मुलाखत घेतली.
डॉ. कसबे यांनी अभ्यासपूर्वक तयारी करून डॉ. सुरेश सावंत यांचे बालसाहित्य, शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य, वाचनसंस्कृतीच्या आणि लेखनसंस्कृतीच्या विकासासाठी त्यांनी केलेले विविध उपक्रम, 'आभाळमाया' ह्या पुरस्कारप्राप्त बालकवितासंग्रहाची वैशिष्ट्ये, बालसाहित्याचे अंतरंग, बालसाहित्याची समीक्षा, महापुरुषांचे चरित्रलेखन, अनुवादाचे महत्त्व, 'माझा शिक्षक : चरित्रनायक' ही संकल्पना, बालसाहित्य आणि बालरंगभूमी, डिजिटल युगातील बालसाहित्याचे भवितव्य, बालकुमारांची साहित्य संमेलने, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि डॉ. सावंत यांच्या नवीन लेखन प्रकल्पांविषयी भरपूर प्रश्न विचारले. डॉ. सुरेश सावंत यांनी त्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली. राष्ट्रपती भवनाच्या रम्य परिसरात ही मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली.
मुलाखतीचा समारोप करताना साहित्य अकादमीचे प्रतिनिधी श्री. रत्नाकर पाटील यांनी डॉ. सुरेश सावंत यांच्या शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. ह्या कला महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी हैदराबाद परिसरातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. रंगीबेरंगी फुलपाखरांनी हा परिसर अक्षरशः बहरला आहे. भारतीय कलेचा वारसा आणि परंपरा समजून घेण्यासाठी हा कला महोत्सव अतिशय उपयुक्त आहे. ह्या मुलाखतीच्या निमित्ताने डॉ. सुरेश सावंत यांचे साहित्य आणि शैक्षणिक कार्य राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा