'
( इयत्ता चौथी)
डॉ. सुरेश सावंत सरांनी लिहिलेलं ‘अति तिथे माती’ हे पुस्तक मी वाचलं. वाचायला सुरुवात केली आणि पहिलीच कथा ‘असला राजा नको आम्हाला’ मला खूपच आवडली. ती कथा नव्हतीच, त्यामध्ये एक लय आणि ताल आहे. मला वाटलं, ती एक कविताच आहे. या कथेत प्रत्येक दोन ओळीमध्ये एक यमक आहे. मला तर वाटलं, सावंत सरांनी एवढे सगळे यमक जुळणारे शब्द कसे आणि कुठून शोधले असतील? वाचत असताना त्यातील ह्या दोन ओळी मला फारच आवडल्या, त्या म्हणजे
'एकाच तळ्यावर वाघ शेळी पाणी प्यायचे
सारे गुण्यागोविंदाने राहायचे'.
ह्याचं कारण म्हणजे वाघ आणि शेळी हे दोन्ही प्राणी वेगवेगळ्या वृत्तीचे. वाघ मांसाहारी, तर शेळी शाकाहारी. पण हे दोन्ही प्राणी एकाच तळ्यावर पाणी प्यायचे आणि गुण्यागोविंदाने राहायचे. खरोखरच हे किती आश्चर्यकारक आणि चांगलं आहे, नाही? असं जंगल असेल तर मला त्या जंगलात जायला आवडेल.
त्यातील दुसऱ्या दोन ओळी मी वाचल्या.
'प्रजेने राजाला हाकलून दिले
वाघ, साप नि गाढवाला हद्दपार केले'.
यातील वाघ आणि साप हे मांसाहारी आहेत मांस हे त्यांचे अन्न आहे. ते दुसऱ्या निष्पाप प्राण्यांना मारून खातात. मला वाटतं, असा नियम असता तर ह्या गुन्हेगार प्राण्यांना दुसऱ्या मांसाहारी प्राण्यांना खायला दिलं तर? किती छान झालं असतं!
पण निसर्गाचा नियमच आहे 'जिवो जिवस्य जीवनम'. म्हणजे जगा आणि आम्हालाही जगू द्या. मी 'पक्षीनिरीक्षण' हे पुस्तक वाचलं होतं. त्यात मला ह्या वाक्याची ओळख झाली. झाडं, वेली याची साक्ष आहेत. जंगलात खूप झाडे, वेली असतात, पण ते बरोबर राहतात.
त्यानंतर मी ‘हत्ती जमिनीवर आले’ ही कथा वाचली. ही कथा वाचल्यानंतर मला तशीच एक कथा आठवली, जी मी कुठे तरी वाचली होती, बहुतेक ‘शिक्षण संक्रमण’ मासिकात. फार पूर्वीच्या काळी माणसालाही पंख होते म्हणे. याचा त्याला खूप अभिमान होता. खूप गर्व होता. त्यामुळे देवाने त्याचे पंख काढून घेतले. तेव्हा माणसाला त्याच्या चुकीचा खूप पश्चात्ताप झाला. तो म्हणाला, “देवा मला माफ कर. माझे पंख मला परत कर”. तेव्हा देव म्हणाला, “मी तुला पंख परत देऊ शकत नाही, पण तू पुस्तकाचे पंख लावून आकाशभर फिरू शकतोस.” या कथेत सावंत सर लिहितात, ‘ज्या पंखांचा हत्तींना अभिमान वाटायचा, त्याच पंखांनी त्यांचा घात केला.’
दोन्ही गोष्टींमध्ये नेमकं तसंच तर आहे. हत्तीचे आणि माणसांचे पंख गर्व आणि अभिमानामुळेच गळून पडले.
मी ‘अवखळ आनंद’ ही कथा वाचली, तेव्हा मला सर्पतज्ञ ‘ रेमंड डिटमार्स’ यांची आठवण झाली. त्यांनाही असाच छंद होता. आनंदसारखा. या कथेत ‘सोनकिडे पकडणे हा आनंदचा आणखी एक आवडता छंद होता. धामणाच्या झाडाच्या शेंड्याचा कोवळा पाला खात सोनकिडे बसलेले असतात. आनंद गुपचूप जाऊन सोनकिडे पकडून त्यांना आगपेटीत ठेवायचा. हे वाचताच मला जितेंद्र कुंवर यांनी लिहिलेली ‘भिंगोटा’ ही कथा आठवली. मी पुढे वाचत गेले. प्रत्येक कथेत सर्वांसाठी एक छान धडा असतोच.
‘विंचू चावला’ह्या कथेतून विनाकारण कोणत्याही वस्तूला हात लावू नये, हा धडा मिळाला. ‘अवखळ आनंद’ ह्या कथेतून आपण संवेदनशीलतेचा धडा घेऊ शकतो. कारण आमचे सर म्हणतात की , “आपल्या हातून चूक झाली की लगेचच ती चूक सुधारणे, म्हणजे संवेदनशीलता होय.”
‘असला राजा नको आम्हाला’ ह्या कथेतून ऐक्याचा धडा घ्यायचाय, कारण तिथला वाराही एकीचे गाणे गातो. अशीच आणखी एक ‘रतन नव्हे रत्न’ ही कथा मी वाचली. त्यात जेव्हा रतनने सरांना घरी बोलावले, तेव्हा सरांनी नकार दिला. मला नाही आवडलं हे, पण सरांचंसुद्धा बरोबर होतं. कारण नांदेडला त्यांचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आधीच ठरला होता.
जेव्हा सरांना आपला माजी विद्यार्थी भेटला, तेव्हा त्यांना किती छान वाटले असेल! किती सुंदर अनुभव आला असेल! अभिमानास्पद!
पुस्तकाची पानं फारच गुळगुळीत आहेत. चित्रही खूप सुंदर काढलेली आहेत.
-निदा हुमेरा मुनवर शेख
वर्ग चौथा
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर
ता. सेलू, जिल्हा परभणी.
पुस्तकाचे नाव आहे : 'अति तिथं माती'.
पुस्तकाचे लेखक : डॉ. सुरेश सावंत.
प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, प्रा.लि.
मुखपृष्ठ व आतील चित्रे : संतोष धोंगडे
पृष्ठसंख्या : 64 किंमत रु. 200/-
addComments
टिप्पणी पोस्ट करा