'तृष्णाकाठ' हा कवी वैभव देशमुख यांचा पहिलाच कवितासंग्रह असला, तरी कवीचे कवितेशी सखोल सख्य जुळलेले आहे. एका कवितेत कवीने लिहिले आहे :
'मी भोगतो कवितेला
नखशिखान्त, म्हणून
तिच्या अंगावरचे तीळ
सांगू शकतो'. (तृष्णाकाठ, ४४)
कवितेच्या देहावरचे बारीकसारीक तीळ सांगण्याइतका प्रगाढ आत्मविश्वास कवीने ह्या सखोल सलगीतूनच संपादन केला आहे, हे उघडच आहे.
एका गझलेत कवीने
'मला वाचा दिली आहेस तू कविते
मला तुझियामुळे बोलायला येते'
अशा स्नेहचिंब शब्दांत कवितेविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
ही कविता म्हणजे कवीच्या भावविश्वाचा 'तृष्णाकाठ' आहे.
कदाचित् कवीने आपल्या आयुष्यात उगवलेली कविता उपटून फेकली असती, पण तिच्यासोबत जगणंच उपटून येण्याची जास्त शक्यता होती. इतकी ही कविता कवीच्या आयुष्याला व्यापून उरलेली आहे. कवीच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनली आहे.
कवीचा ह्या दुनियेविषयीचा अनुभव फारसा चांगला नाही.
'ही दुनिया असंच उघडत नाही दार
ती साजरे करायला लावते
पराभवांचे उत्सव'.
असे पराभवांचे अनेक उत्सव कवीने साजरे केले आहेत, असे कवितेच्या शब्दाशब्दांतून जाणवते.
'घामेजलेल्या प्रश्नांच्या संध्याकाळी
कवीच्या मनात टिकटिकतय
भीतीचं घड्याळ.'
अशा वेळी कवी बेहद्द बधिरतेचं फीलिंग अनुभवतो.
'शहराचा ना गावामधला झालो मी
दोघांमधली सीमारेषा झालो मी'
असे एका गझलेत कवीने आपले मनोगत व्यक्त केले आहे. हीच भावना आणखी दोन कवितांमधून व्यक्त झालेली आपल्याला दिसते. एके काळी कवीचे गाव कवीच्या रक्तामधून वाहत होते. हेच गाव कवीला श्वासांमधून जगवत होते. त्या गावाविषयीचा कवीचा हा अनुभव :
'किती ताजं करून जायचं
घराचं आपल्या रस्त्यावर डोळे सोडून बसणं'.
पुढे काही निमित्तानं हे गाव सुटलं. शहराचा रस्ता धरावा लागला. पुढे पुढे शहरात इतका जीव रमला, की आता गावाकडे जाताना पाय उचलत नाहीत. म्हणून कवितेच्या शेवटी कवीने म्हटले आहे :
'होताच येत नाही आऊट ऑफ कव्हरेज या शहरापासून'.
गाव आणि शहराच्या सीमारेषेवर रेंगाळणा-या तरुणांची मानसिकता कवीने येथे नेमकेपणाने टिपली आहे. 'हे' सोडवत नाही आणि 'ते' सापडत नाही, अशी ही दोलायमान अवस्था आहे. कवी हा ह्या पिढीचा प्रतिनिधी म्हणून पुढे येतो.
बरं, हे शहर तरी कसं आहे?
'प्रेम करणा-या
पण लग्नाला नकार देणाऱ्या
प्रेयसीसारखं हे शहर.
बेहोश केलं या शहरानं.
कधीची तहान घेऊन फिरतोय या शहरात
कधीची शोधतोय एखादी ओली जागा
कसे संपत नाहीत हे खडकांचे थर...
मुळंच हरवत चाललय घर' (तृष्णा. २५, २६)
प्रेम करणा-या, पण लग्नाला नकार देणाऱ्या प्रेयसीसारखं हे शहर आहे. धड जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. गावात रुजलेली मुळं उपटली गेली आहेत, पण शहरात अजून ती पुरती रुजलेली नाहीत, अशा द्विधेत कवी सापडलेला आहे.
'आपण पुसतो एकमेकांची खुशाली, पण तळमळ नसते पूर्वीसारखी'. यातून व्यक्त झालेली शहरी दांभिकपणाची आणि पोकळपणाची जाणीव अस्वस्थ करणारी आहे.
'दुखू दुखू आलेयेत
नात्यांचे देठ
पिवळी पडत चाललीयेत
संबंधांची पानं
भोवतालावर चमकतीये
विनाशाची चाहूल
फार दूर नाही
सर्वार्थाची पानगळ'. (तृष्णाकाठ, ३०)
असे हे शहरी नातेसंबंध बेगडी आणि तकलादू बनले आहेत. ही एक प्रकारे विनाशाची चाहूल आहे. तरीसुद्धा
'शहर वाहतय
आवाजांनी भरून
मलाही ऐकू येत नाही
आता माझा आकांत'. (तृष्णाकाठ, ३१)
इतकं ह्या शहरानं भोवंडून सोडलं आहे. ह्या शहरातली 'गर्दी म्हणजे समाज नाही', हे कवीला एव्हाना समजून चुकले आहे. अशा परिस्थितीत कवीला 'आयुष्य म्हणजे एक फुसका फटाका' याची तीव्रतेने जाणीव होते आहे.
जे समाजकारणाचं, अगदी तेच राजकारणाचं.
'ज्वारीला उंदीर, कापसाला उंदीर
उडदाला, मुगाला, गव्हाला उंदीर
या मातीचा राहिला नाही भरवसा
पेरतोय धान्य आणि उगवतायेत उंदीर'.(तृ. ३५)
पेरले एक आणि उगवले दुसरेच, असे आजचे राजकीय वास्तव आहे. सर्वांगाने समाज पोखरून टाकणा-या स्वार्थांध राजकारण्यांसाठी आलेली सर्वभक्षी उंदरांची प्रतिमा फारच अन्वर्थक आहे!
'सात सेकंद लाल असतानाच
एक ताफा जातो गाड्यांचा सुसाट
त्याच्या ॲक्सिलिटरमध्ये गुरगुरतं
एक हिंस्र जनावर'. (तृष्णाकाठ, ३८)
शहरी जीवनाला आलेली ही गतिमानता माणसाचं पशुत्व अधोरेखित करणारी आहे.
'पायी ठणका लालेलाल,
नयनी थकवा लालेलाल'.
वरील दोन्ही ठिकाणी आलेला लाल रंग भावनांची तीव्रता उद्घोषित करतो. म्हणूनच कवी म्हणतो :
'मी अनुभवतोय
भरधाव वेगातलं उत्कट मरण'. (तृष्णा. १३)
'बाभूळ झाडाची। फाटकी सावली
तेथे विसावली। झाडे काही'.
किंवा
'सुक्या नदीकाठी। नग्न उभे साग
आकाशात आग। लागलेली'. (तृष्णा, ८७)
अभंग वृत्तात आणि चित्रदर्शी शब्दांत ही कविता काही उदास आणि भकास अशी निसर्गचित्रे रेखाटते. समकालीन समाजजीवनाचे हे विरूपदर्शन चिंताजनक असले, तरी अटळ असे भागधेय आहे.
ह्या संपूर्ण कवितेत दोन स्त्रीप्रतिमा फारच उत्कटतेने उतरलेल्या आहेत. पहिली आहे आईची आणि दुसरी आहे सखी, सहचारिणी किंवा पत्नीची. कवीला आपली आई आयुष्यभर
'रक्त वाळवणारं काम करताना दिसली'. आईविषयी लिहिताना कवीने म्हटले आहे :
'सारे हंगाम सोंगून काढताना
तिच्या तळहाताचे खडक झाले.
आपल्या आयुष्याचं खारेपण
तिनं ओघळू दिलं नाही
कधीच कुणाच्या गोडव्यावर
फक्त अंधारालाच फुटायचे
कधीकधी हुंदके.
तिच्या अंगणातली रांगोळी
रंगांशिवाय राहिली
पण तुळस ठेवली हिरवीगार
अन् कुंकू तेवढं ठसठशीत.
लोक सांगतात गावातले
की इतक्या मळातून गेली
पण जरासुद्धा मळली नाही'. (तृ. ४६, ४७)
अभावग्रस्त अशा श्रममूर्ती आईची ही थोरवी वाचताना सबंध 'तृष्णाकाठ' उजळून निघतो.
सखीशी संवाद साधतानाही ही कविता तितकीच कृतज्ञतेने चिंब झाली आहे :
'आता आता तू भेटलीस
एखाद्या मशालीसारखी
एरवी या घरातला अंधार
गर्भश्रीमंत होता माझ्यासाठी'.(तृष्णा. २८)
किंवा
'पुढे अंधारच उभा माझी अडवून वाट
तूच दावली डोळ्यांना एक सोनेरी पहाट'.
सखीने कवीच्या अंधारलेल्या डोळ्यांना सोनेरी पहाट दाखविली. सखीच्या सहवासात कवीच्या पांगलेल्या जीवनाला आकार येऊ लागला. सखीच्या सुगंधामुळे कवीला नव्याने जिवंत झाल्याचा अनुभव आला.
वैभव देशमुख यांची कविता कधीकधी आठवणींच्या बनात, गतस्मृतीत आणि स्मरणरंजनात रमते. ह्या आठवणींत निंबोणीचं झाड आहे, आईनं गायिलेली अंगाई आहे. लखलखत्या चांदण्या आहेत, थरथरत्या कहाण्या आहेत, पाटी आणि लेखणी आहे, बाराखडी आणि उजळणी आहे, धुवाधार पावसाळा आहे, घर पडल्यामुळे बुडालेली शाळा आहे, सोसाट्याचा वारा आहे, आईच्या डोईवर अवजड भारा आहे. आठवणींच्या ह्या बनात लाख लाख आठवणी आहेत आणि म्हणूनच ओठात थोडं हासू आणि डोळ्यांमधे पाणी आहे. अशा गर्द गहि-या आठवणींमध्ये
'एक पाहुणी पोरगी पाणी शेंदायला येते
आणि जराशा उन्हानं फूल पळसाचं होते'
असेही एक वेल्हाळ शब्दचित्र येते.
म्हणूनच कवी म्हणतो :
'ह्रदयाच्या या फांदीला
स्मृतींचा झुलतो झोका
व्याकूळ तुझ्या स्पर्शाच्या
रक्तातुन येती हाका'. ( तृष्णाकाठ, ६७)
रक्तातून येणाऱ्या ह्या हाका कवीसोबत वाचकालाही अस्वस्थ करून जातात.
'पाऊस बरसतो पहिला
मौनाला अर्थ बिलगतो
मी वेचून माझे तुकडे
कवितेवर गोळा करतो'. ( तृष्णाकाठ, ८४)
आपल्या पूर्वायुष्याचे भलेबुरे तुकडे कवितेत गोळा करण्याइतपत कवीने कवितेशी समरसता साधलेली आहे.
'त्या बालवयात माझ्या
प्रौढत्व मनाला आले'
ही काळजातली दुखरी सलही कवीने कवितेजवळ विश्वासाने व्यक्त केली आहे.
शेवटी कवीला असा प्रश्न पडला आहे, की
'स्वप्नांच्या जागेवरती
दु:खांची वसली गावे
कोणाच्या खांद्यावरती
अश्रूंचे ओझे द्यावे?' (तृष्णाकाठ, ८९)
अशा परिस्थितीत कवीला माणसांपेक्षा झाडं श्रेष्ठ वाटतात, कारण 'झाडं उन्मळून पडतात, पण आत्महत्या करत नाहीत'. (तृष्णा. ९४)
वैभव देशमुख यांची कविता बव्हंशी मुक्तछंदातून, कधी अभंग, कधी गीत, तर कधी गझलेतून वाचकांशी संवाद साधते. ही कविता भीतीचं घड्याळ, निराशेचे एजंट, म्हातारं उत्तर, विटलेला उजेड, गर्भश्रीमंत अंधार, नात्यांचे देठ, फुसका फटाका, आठवणींचे बन, अनाथले डोळे, नग्न साग यांसारख्या अर्थसघन प्रतिमांतून वाचकाच्या काळजाचा ठाव घेते.
एका कवितेत कवीने फारच छान अपेक्षा व्यक्त केली आहे :
'तर हे
काळ नावाच्या कुंभारा,
तुझ्या दारात
होऊन पडलोय माती
आता घडव गड्या या मातीतून
निदान एखादा फ्लॉवरपॉट तरी!' (तृ. ३३)
ही अगतिकता, काळ नावाच्या कुंभारासमोर पत्करलेली शरणागतता केविलवाणी किंवा करुणाजनक नक्कीच नाही. जग सुंदर करण्यासाठी, कविह्रदयाचे हे एक नितांत सुंदर समर्पण आहे!
तृष्णाकाठ (कवितासंग्रह)
कवी : वैभव देशमुख
मुखपृष्ठ : अन्वर हुसेन
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस, पुणे.
पृष्ठे ९६ किंमत रु. २००
पुस्तक परिचय :
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com
addComments
टिप्पणी पोस्ट करा