नाळेश्वर जवळील बांधण्यात आलेल्या पूलाला अवकळा

 

भुरट्या चोरट्यांनी कठड्यावरील लोखंडी पाईप केले गायब
नांदेड/प्रतिनिधी-मागील सहा महिन्यापूर्वी बनविण्यात आलेल्या नाळेश्वर-रहाटी मार्गावरील नाळेश्वर जवळील बांधण्यात आलेला पूल नसून खोळंबा असून वळंबा अशा स्थितीत सद्यस्थितीत आहे. पुलाच्या अलिकडून शंभर फूट आणि पलीकडून शंभर फूट रस्ता एखाद्या वाडी-तांड्यावरील रस्त्याप्रमाणे झाला आहे. याचे एकमेव कारण म्हणजे या मार्गावरुन वारेमाप अवैध रेतीची भरमसाठ वाहने रात्रं-दिवस सुरु असतात. या जड वाहनामुळे 200 फुटाचा रस्ता पूर्णतः खचला आहे.संबंधीत गुत्तेदाराने काम पूर्ण करण्याऐवजी रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत सोडून पळ काढला आहे.
लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळेझाक केल्यामुळेच या पुलाला दयनिय अवस्था आली आहे. विशेष म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजूने मजबूत कठडे करण्याऐवजी त्या ठिकाणी लोखंडी पाईप टाकुन थातुर-मातूर कामे करुन या गुत्तेदाराने आपले उखळ पांढरे करुन घेतले खरे. परंतु पुलाला लावण्यात आलेले लोखंडी पाईप भुरट्या चोरट्यांनी भंगारात विकुन आपले चांगभले करुन घेतले आहे. लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षाची मोठी किंमत या मार्गावरुन मार्गक्रमण करणार्‍या वाहन धारकांना मोजावी लागत आहे. आता या ठिकाणाहून वाहनधारकांची अशी अवस्था असेल तर पायी प्रवास करणार्‍या पादचार्‍यांची अवस्था काय असेल याची कल्पना न केलेलीच बरी. चाळणी झालेल्या 200 फुटाच्या रस्त्यावर अवजड वाहने ये-जा करत असल्याने या ठिकाणावर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र व राज्य शासनाकडून थेट ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी रस्त्यांच्या दर्जेदार कामावर करोडो रुपये खर्च करण्यात येत आहे. ना.नितीन गडकरी यांनी तर रस्त्यांची बोगस कामे करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देवून सुध्दा हे गुत्तेदार मात्र आपल्याच तालात राहून स्वतःच्या तुंबड्या भरण्यात व्यस्त असल्याचे चित्र या पुलाच्या कामावरुन दिसून येत आहे. विशेष म्हणजे नांदेड शहरापासून अत्यंत जवळचा भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुलाची अशी अवस्था झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आता स्वतःला लोकाभिमुख नेतृत्व म्हणवून घेणार्‍या आमदारांनी जातीने लक्ष घालून संबंधीत गुत्तेदाराकडून पुलाचे काम दर्जेदार करुन अर्धवट रस्ता मजबूत व चांगला करुन द्यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 
टिप्पण्या