एकनाथ आव्हाड यांच्या छान छान नाट्यछटा डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

मुंबईतील ज्येष्ठ बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांचे 'जिवाभावाचा मित्र आणि इतर नाट्यछटा' हे नाट्यछटांचे पुस्तक ठाण्यातील व्यास पब्लिकेशन हाऊसने नुकतेच प्रकाशित केले आहे. एकनाथ आव्हाड हे बालकुमारांसाठी परिश्रमपूर्वक आणि सातत्याने लेखन करणारे लोकप्रिय लेखक आहेत. त्यांनी बालकुमारांसाठी कथा, कविता, काव्यकोडी, नाट्यछटा इ. वाङ्मयप्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांना ह्या लेखनासाठी महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे दोन पुरस्कार लाभले आहेत. साहित्य अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. 'जिवाभावाचा मित्र आणि इतर नाट्यछटा' हा आव्हाड यांच्या नाट्यछटांचा दुसरा संग्रह आहे. यापूर्वी त्यांचा 'मला उंच उडू दे' हा नाट्यछटांचा संग्रह प्रकाशित झालेला आहे. 

इतर वाङ्मयप्रकारांच्या तुलनेत नाट्यछटा कमीच लिहिल्या जातात. त्यातही वाचनीय आणि प्रयोगक्षम नाट्यछटा अगदीच कमी लिहिल्या जातात.               'नाट्यछटा' हा शब्द उच्चारताच नामवंत लेखक शंकर काशीनाथ उर्फ दिवाकर (१८८९ - १९३१) यांचेच नाव आठवते. दिवाकर हेच नाट्यछटा या वाङ्मयप्रकाराचे जनक मानले जातात. त्यांनी १९११मध्ये पहिली मराठी नाट्यछटा लिहिली, म्हणून १९११ हे मराठी नाट्यछटेचे जन्मवर्ष मानले जाते. जुन्या पाठ्यपुस्तकांमध्ये दिवाकरांच्या नाट्यछटा हमखास असायच्या. त्यामुळे आमच्या पिढीच्या मनात नाट्यछटा म्हणजे दिवाकर, हे समीकरण दृढ झाले आहे. तथापि मागील ११४ वर्षांत नाट्यछटा हा वाङ्मयप्रकार फारसा समृद्ध झाला नाही. मागील शतकभरात नाट्यछटांचे अगदीच तुरळक लेखन झाले आहे, असे दिसते. 

'नाट्यछटा' ह्या शब्दात 'नाट्य' असले, तरी नाटक आणि नाट्यछटा यात काही प्रमुख फरक आहेत. नाटकात एकापेक्षा अधिक पात्रे असतात, तर नाट्यछटा सादर करणारे पात्र एकच असते. नाटकात विविध पात्रांच्या तोंडी 'डायलॉग' असतात, तर नाट्यछटेत 'मोनोलॉग' असतो. नाट्यछटेत एकच पात्र बोलत असले, तरी सोबत एक किंवा अधिक पात्रं आहेत आणि तीही त्याच्याशी बोलत आहेत, असा आभास ते निर्माण करते. नाट्यछटा अतिशय आटोपशीर असते. नाट्यछटेचा जीव छोटा असला, तरी भाषा पीळदार असेल आणि सादरीकरण प्रभावी असेल, तर अपेक्षित परिणाम साधला जातो. एका नाट्यछटेत एकच प्रसंग नाट्यपूर्ण पद्धतीने मांडला असेल, तर त्याचा एकजिनसी परिणाम साधला जातो.

'जिवाभावाचा मित्र आणि इतर नाट्यछटा' ह्या पुस्तकात छान छान अशा एकूण १४ नाट्यछटा आहेत. यात विषयांची विविधता आहे. बहुतेक नाट्यछटांमध्ये मुले-मुली बोलतात, हे आपल्याला माहीत आहे, पण 'ऊन ऊन खिचडी' ह्या नाट्यछटेत साक्षात तूप बाळगोपाळांशी संवाद साधत आहे. 

तूप आपले विविध उपयोग सांगते. बालकुमारांची करमणूक करताना लेखक 'माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं' असा संदेश द्यायला विसरत नाही. 

'मदतीला धावणारा' ह्या नाट्यछटेत चक्क कांदा बोलतो आहे. आपले उपयोग तर तो सांगतोच, शिवाय मला कापताना लोकांच्या डोळ्यांत पाणी का येतं, याची कारणेही सांगतो. आहे की नाही धमाल! 

'काय चुकलं माझं?' ह्या नाट्यछटेत आपल्याला एक बडबड्या मुलगा भेटतो. त्याच्या असंबद्ध बडबडीतून लेखकाने छान विनोदनिर्मितीही केली आहे. 'कवितेचा दिवा' ह्या नाट्यछटेतला इटुकला माधव हा चक्क कविता लिहितो. घरीदारी त्याचं खूप कौतुक होतं. 

'कविता म्हणजे भाव मनीचा

सहज फुलासम फुलणारा

कविता म्हणजे घाव जिव्हारी

काळीज छेदून जाणारा' 

अशा शब्दांत त्याने कवितेचे रंगरूप वर्णन केले आहे. 

'माणसानं कमी बोलावं आणि जास्त ऐकावं. कमी लिहावं आणि जास्त वाचावं' असा कानमंत्रही तो देऊन जातो. 

'काखेत कळसा गावाला वळसा' ह्या नाट्यछटेतल्या नायकाला पुस्तकांचा लळा लागला आहे. म्हणूनच तो म्हणतो:

'पुस्तक माझा मित्र, सदासर्वकाळ हसरा

पुस्तकासारखा खराखुरा मित्र नाही दुसरा'

'देणे त्याला ठाऊक फक्त' ह्या नाट्यछटेतला निसर्ग पर्वतासारखी भक्कम उभी भिंत होऊन वाईट अडवायला शिकवतो. झ-यासारखा अडचणीतून वाट काढायला शिकवतो. सूर्यासारखा अंधारावर मात करून प्रकाशाचं राज्य आणायला शिकवतो. 

मानवाला सुखी, संपन्न, कृतार्थ जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा निसर्ग हा मानवाचा सर्वश्रेष्ठ मित्र आहे, हा संस्कार बिंबविणारी ही नाट्यछटा जबरदस्त आहे! 

'जिवाभावाचा मित्र' ह्या नाट्यछटेतला मित्र सोहम सत्याचा पुरस्कर्ता आहे. तो म्हणतो, सत्य नेहमीच सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आणि सुंदर असतं. 'माझा अभिमान' ह्या नाट्यछटेत तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज बाळगोपाळांशी संवाद साधतो आहे. आपल्या मनातील खंत व्यक्त करतो आहे. 

'मोठ्ठा झालोय' ह्या नाट्यछटेतला नायक 'शाळेला सुट्टी, अभ्यासाला बुट्टी, कामाशी कट्टी आणि खेळाशी गट्टी' हा मंत्र मनाशी जपतो आहे. पण आराम हराम आहे, हे त्याला समजते. खरा आनंद विश्रामात नाही, तर श्रमात आहे, याची त्याला जाणीव होते. गाडगेबाबा आणि बाबा आमटे यांच्या कार्याची तो स्वतःला आठवण करून देतो. 

'काम कणभर बाता मणभर' ह्या नाट्यछटेचा नायक शेजारच्या दामले आजींना वर्तमानपत्र वाचून दाखवतो. शेजारधर्माचे पालन करतो. उजव्या हाताने केलेली मदत डाव्या हाताला कळता कामा नये, म्हणून खबरदारी घेतो. 

'स्वादाला कडू पण आरोग्याचा गडू' ह्या नाट्यछटेत नायकाच्या रूपात एक कडू कारले आपल्यासमोर येते आणि ऐटीत म्हणते, 'जरी असलो कडू, तरी मी आहे आरोग्याचा गडू!' 

अशा बच्चेकंपनीच्या जिव्हाळ्याच्या विषयांवरील नाट्यछटा बालकुमार वाचकांना नक्कीच आवडतात.

काही नाट्यछटांतून पुस्तकांचे महत्त्व, सत्याचा आग्रह, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि संविधान यांचा अभिमान, क्रियाशीलता, पर्यावरणसंरक्षण, निसर्गरक्षण, सहकार्याची वृत्ती, वेळेचे महत्त्व आणि भूतदया यासंबंधी उद्बोधक संदेश दिला आहे. दृष्य-अदृष्य पात्रांचे स्वभावविशेष दाखवत मानवी स्वभावांतील विसंगती टिपल्या आहेत. मानवी भावभावनांचे छान प्रकटीकरण केले आहे. अनेक सामाजिक दोषांवर मार्मिकपणे बोट ठेवले आहे. ह्या नाट्यछटांमध्ये वर्तमानकाळातील समाजाचे आणि घटना - घडामोडींचे यथातथ्य प्रतिबिंब उमटले आहे. संतोष घोंगडे यांनी नाट्यछटांना साजेशी चित्रे काढली आहेत. शीर्षकांचे अक्षरलेखन फारच आकर्षक आहे! 

लेखकाने ह्या नाट्यछटांच्या माध्यमातून बालकुमारांसोबत तथाकथित मोठ्यांनाही आत्मचिंतन करण्याची संधी दिली आहे. केवळ दोन-तीन पृष्ठांच्या आटोपशीर नाट्यछटांतून विविध जीवनरंग दाखविले आहेत. एकनाथ आव्हाड यांची लेखनशैली अतिशय संवादी असल्यामुळे सर्वच नाट्यछटा परिणामकारक झाल्या आहेत. नाट्यछटांची शीर्षके मोठी बोलकी आहेत. बोलीभाषेचा मोकळेपणाने वापर केल्यामुळे ह्या लेखनात एक प्रकारचा जिवंतपणा आला आहे. यातील एखादी नाट्यछटा पाठ्यपुस्तकांत समाविष्ट केल्यास दिवाकरांच्या नाट्यछटेची परंपरा पुढे चालू राहील. 

एकनाथ आव्हाड यांच्या कथेत जशी कविता असते, तशीच त्यांनी काही स्वतंत्र कथाकाव्येही लिहिली आहेत. त्यांच्या ह्या नाट्यछटांमध्ये कथाही आहेत आणि कविताही आहेत. आव्हाड यांनी संतवचने आणि कवितेच्या ओळींचा श्रुतयोजन म्हणून चपखल वापर केला 

'चोराच्या उलट्या बोंबा, उचलली जीभ लावली टाळ्याला, पालथ्या घड्यावर पाणी, काखेत कळसा गावाला वळसा, परिश्रमाला पर्याय नाही, जगा सांगे तत्त्वज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, वक्तशीरपणा ही यशाची गुरुकिल्ली आहे, 

इ. म्हणी, लोकोक्तींचा आणि सुविचारांचा अतिशय कल्पकतेने वापर केल्यामुळे जनजीवनातील रसरशीतपणा ह्या लेखनात उतरला आहे. ह्या नाट्यछटा वाचनीय तर आहेतच, शिवाय प्रयोगक्षम आहेत. बालरंगभूमीला आणि शालेय रंगभूमीला ह्या नाट्यछटा उपयुक्त ठरतील, असा विश्वास वाटतो.

  • 'जिवाभावाचा मित्र आणि इतर नाट्यछटा' 
  • लेखक : एकनाथ आव्हाड 
  • मुखपृष्ठ आणि आतील सजावट : संतोष घोंगडे 
  • पृष्ठे ६८.      किंमत रु. १५०
  • प्रकाशक : व्यास पब्लिकेशन हाऊस, ठाणे. 
  • डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
  • sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या