अंजली कुलकर्णी ह्या समकालातील अतिशय महत्त्वाच्या कवयित्री आहेत. त्यांचे 'मी एक स्त्रीजातीय अस्वस्थ आत्मा', 'संबद्ध', 'रात्र, दु:ख आणि कविता' आणि 'शाबूत राहो हे लव्हाळे' हे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. नवीन वर्षात त्या 'असण्याचे सुंदर ओझे' हा नवीन कवितासंग्रह घेऊन रसिक वाचकांच्या भेटीला आल्या आहेत.
आधीच्या दोन कवितासंग्रहांसाठी त्यांना दोन वेळा महाराष्ट्र शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या कविता हिंदी, इंग्रजी, उर्दू, नेपाळी, गुजराथी इ. भाषांमधून अनुवादित झाल्या आहेत. म्हणजे त्यांच्या कवितेने महाराष्ट्राच्या सीमा कधीच ओलांडल्या आहेत!
अंजली कुलकर्णी यांना त्यांच्या कवितेनेच जीवनद्रव्य पुरविले आहे. कवयित्रीने आपले 'प्रिय एकटेपण' फार असोशीने सांभाळले आहे. उदासीनेच आपले आयुष्य रम्य केले आहे, असे कवयित्रीला वाटते. म्हणूनच अशा 'अस्वस्थतेच्या क्षणांचा एकच एक वर मिळावा' असे कवयित्रीला वाटते. अवकाशाबाहेर झेपावलेल्या यानाची अवस्था कवयित्री अनुभवते आहे. 'या' उतरणीच्या टप्प्यावर कवयित्री या निरंतर अस्वस्थतेचे गुपित शोधू पाहते आहे आणि जिवंत असण्याचा हेतू शोधू पाहते आहे. 'काळाने मोडले' ह्या अभंग वृत्तातील कवितेत हे एकाकीपण फारच जोरकसपणे व्यक्त झाले आहे. ह्या कवितेतून कवयित्रीने एक प्रकारे आत्मशोध घेतला आहे.
'यश म्हणजे नुस्ती अफवा
वा-यावर सोडून द्यावी
धुंदीत फुलांची ओंजळ
उधळून सुखाने द्यावी'
इतकी निर्लेपता कवयित्रीला साधलेली आहे. वयाच्या ह्या टप्प्यावर, श्रेयस आणि प्रेयसच्या पलीकडे गेलेली, अनुभवांच्या समृद्धीने साधलेली ही निर्विकार अवस्था आहे. 'सभोवती चैनबाजीच्या माजावर आलाय जमाव' हे समकालाविषयीचे कवयित्रीचे सूक्ष्म निरीक्षण आहे. तरीसुद्धा
'कोलाहलाच्या ह्रदयात मावळून जाईल उन्मादी साम्राज्य आणि समुद्राच्या पाण्यात पुन्हा जन्माला येईल सळसळता जीव' अशी अपेक्षा कवयित्री बाळगून आहे.
जीवनाच्या अर्ध्या वाटेवर, अचानक जोडीदाराचा हात सुटतो आणि अनपेक्षितपणे एकाकीपण वाट्याला येते. तरी जगणं संपत नाही. अशा वेळी
'आता पुन्हा अध्याय हा नव्यानं सुरू
आता पुन्हा एकटीचे नवे सर्ग सुरू'
हा कवयित्रीचा संकल्प आहे. म्हणूनच कवयित्री म्हणते :
'शोभिवंत जगण्याचा कंटाळाच आला
नक्षीदार भांड्यामध्ये, जीव कोंडलेला'.
हा कोंडलेपणा निश्चितच अस्वस्थ करणारा आहे. असे असले तरी
'निर्माल्यातील फुले वाहती धार धरून पाण्याची
स्थिती गती ना ठाऊक त्यांना हीच रीत जगण्याची'
अशी समंजस जाणीव पुढील ओळींतून व्यक्त झाली आहे.
एकांताच्या गुहेत आयुष्याची सजा सरते आहे. हळूहळू का होईना, काळ पुढे सरकतो आहे. अशा परिस्थितीत कवयित्रीचे कवितेच्या माध्यमातून चिंतनवस्त्र विणण्याचे काम अखंडितपणे चालूच आहे. परिणामी
'पाय निघेना जगण्यामधुनी रुतून जाई
फांदीवर झुलता झुलता पक्षी उडून जाई'
अशी (अ)भावचित्रे ह्या कवितेत पुन:पुन्हा उमटत राहतात. आपलेच दु:ख काही जगावेगळे नाही. सभोवताल अशी अनेक दु:खे आहेत.
'प्रत्येक कबरीत
एक दु:ख निद्रिस्त असतं
प्रत्येक आत्म्यात
एक स्वप्न निद्रिस्त असतं'.
ही सभोवतालाला समजून घेण्याची जाणीवही फारच महत्त्वाची आहे.
ठसठसत्या वेदनेचे असंख्य व्रण ह्या कवितेच्या पानोपानी उमटले आहेत.
रेडवुडच्या जंगलात वणवा पेटल्यावर आतूनबाहेरून जळत जातात झाडं.
'रेडवुडचे जळते अश्रू टपटपत नाहीत डोळ्यांतून म्हणून काय झालं?'
असा प्रश्न कवयित्रीने स्वतःलाच विचारला आहे. 'निसटलेले गतक्षण' हा ह्या कवितेचा वर्ण्य विषय आहे. ह्या क्षणांची गर्दी अनिवार आहे.
ह्या कविता म्हणजे 'शब्दांचं वेडंबागडं ट्रॅफिक आहे', असे कवयित्रीला प्रांजळपणे वाटते. हे ट्रॅफिक कंट्रोलच्या बाहेर गेले आहे, हेही कवयित्रीला जाणवते.
काही कवितांतून आलेला आई आणि मुलाचा संवाद, मुलाविषयीच्या चिंतेतून आलेली अस्वस्थता अतिशय टोकदार आहे.
ह्या कवितेत जवळच्या माणसांच्या दूरदूर जाणाऱ्या पावलांचे आवाज ऐकायला येतात. त्यामुळे हे एकाकीपण अधिकच गडद गहिरे होत जाते. कवितागत 'मी'चा एकांत एकुलत्या चांदणीसारखा मुसमुसत राहतो कोपरा पकडून'.
कवयित्रीला शांततेच्या वारूळात एकटेच बसल्याचे भास होतात.
ह्या कवितेच्या ओळीओळींतून भयंकराची चाहूल जाणवत राहते. झालेल्या पडझडीचे अवशेष सर्वत्र विखुरलेले आहेत. काही ठिकाणी भविष्याच्या भाळावरचे निर्मम संदेश ऐकायला येतात. कवितागत 'मी'च्या डोळ्यांत स्वप्नशून्य जगण्याचे स्वप्न साकळले आहे, असे वाटते.
'दिला घेतला मरवा ताजा चुंबून मीही
ध्यासामध्ये डुंबायाचे स्वप्न उडाले'
असा कबुलीजबाब ही कविता नोंदवते.
कविता आणि कवयित्री ह्या इतक्या एकजीव झाल्या आहेत, की त्यांना एकमेकांपासून वेगळे करताच येत नाही.
म्हणूनच 'क्लिक करा' ह्या कवितेत कवयित्रीने लिहिले आहे :
'माझं निरागस खरे-खोटेपण
माझ्या ऊर्मी माझे ध्यास
माझं उन्मळणं
माझी हताशा निराशा
माझा खोटा आत्मविश्वास
माझे गंड माझं भय
माझी निष्क्रियता
सगळं सगळं ठाऊक आहे तिला
माझ्या ह्रदयाच्या स्पंदनातच राहते ना ती'.
ह्या कवितेत कवयित्रीने आपल्या जगण्याचा सारांश मांडलेला आहे.
सूचकता हा ह्या कवितेचा स्थायीभाव आहे. एकांतगुहा, केविलवाण्या टेकड्या, अपंग ॲनिमिक चंद्र, मोबाईल टॉवर्सचे जंगल, तुंबून राहिलेलं शहर, लाल ओली मऊ मखमल हिरवळीची, इच्छेचा ओढाळ ओहळ, शांततेचे वारूळ, काळाची वाळू, यांसारख्या प्रतिमा प्रतीकांतून ही कविता वाचकांशी संवाद साधते.
'कळण्याचे भान नुरावे
असण्याचे भान नुरावे
मातीतून उमलून आले
मातीतच स्वस्थ विरावे'
ह्या ओळींनी केलेला समारोप अतिशय ह्रदयस्पर्शी झाला आहे.
अश्विनी खटावकर यांनी रेखाटलेले, मुखपृष्ठावरील स्मृतिमंजूषेवर बसलेले फुलपाखरू फारच बोलके आहे. पेटी आणि फुलपाखरू यांच्या साहचर्यातून अवतरलेले मुखपृष्ठ अतिशय अर्थपूर्ण आहे. तेजस्वी तावडे यांच्या रेखाचित्रांनी कवितेचा आशय आणखी गडद केला आहे. गीतेश गजानन शिंदे यांच्या सृजनसंवाद प्रकाशनाने केलेली पुस्तकाची निर्मिती अतिशय अप्रतिम आहे!
- 'असण्याचे सुंदर ओझे' (कवितासंग्रह)
- कवयित्री अंजली कुलकर्णी
- प्रकाशक : सृजनसंवाद, चरई, ठाणे.
- मुखपृष्ठ : अश्विनी खटावकर
- पृष्ठे ९६ किंमत रु. २५०
- पुस्तक परिचय :
- डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
- sureshsawant2011@yahoo.com

addComments
टिप्पणी पोस्ट करा