किनवट प्रतिनिधी
किनवट व माहूर या दोन्ही तालुक्यात कार्यरत असलेल्या 5 पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत.अपुऱ्या संख्याबळामुळे कायदा व सुव्यव्यवस्था टिकऊन ठेवण्यासाठी कसरत होत असल्याची बाब लक्षात घेऊन आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन पोलीस कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्याची मागणी केली आहे.
लोकसंख्या व भौगोलिक दृष्टीने नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठे तालुके म्हणून किनवट माहूरची नोंद आहे. हा भाग आदिवासी डोंगराळ व मागास असल्यामुळे दोन्ही तालुक्यात 5 पोलीस ठाणे कार्यान्वित असून प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत 50 ते 60 गावांचा समावेश आहे.
परंतु गेल्या कित्येक दिवसापासून या पाचही पोलीस स्टेशनअंतर्गत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अनेक पदे रिक्त आहेत. किनवट पोलीस ठाण्यात 95 पदे मंजूर आहेत त्यापैकी केवळ 49 पोलीस कार्यरत आहेत.इस्लापूर ठाण्यात 59 मंजूर पदापैकी केवळ 26 कर्मचारी आहेत.मांडवी ठाण्यात 70 पदे मंजूर असताना प्रत्यक्षात 22 कर्मचारी आहेत.माहूर पोलीस ठाणेअंतर्गत 70 पदे मंजूर आहेत परंतु तेथे केवळ 36 पोलीस कर्मचारी आहेत.सिंदखेड ठाण्यात 45 पदाची मंजुरी असताना केवळ 23 कर्मचाऱ्यावर संपूर्ण भार आहे.या व्यतिरिक्त C-47 रायफलधारी 45 पदे मंजूर आहेत परंतु 12 हजर आहेत.
किनवट व माहूर या दोन्ही तालुक्यातील बहुतांश लोकसंख्या जंगलव्यापी दऱ्याखोऱ्यात, वाडी तांड्यात वास्तव्य करून आहे. अशा भागातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने व जनतेच्या रक्षणासाठी अपुऱ्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.गुन्हेगारी,अवैध धंद्यावर अंकुश ठेवताना तसेच सण उत्सव काळात पोलिसावर बंदोबस्तचा प्रचंड ताण पडतो.रिक्त पदासंदर्भात जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना अनेकदा तोंडी कळविले परंतु प्रतिसाद मिळाला नसल्याची बाब आ. भीमराव केराम यांनी पत्रात नमूद केली असून पाचही पोलीस ठाण्याअंतर्गत रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी संबंधिताना तातडीचे आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

addComments
टिप्पणी पोस्ट करा