संदेश भंडारे यांच्या चित्रप्रदर्शनाचे विद्यापीठात उद्घाटन
*नांदेड:*
पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची लोक आस्था आहे. अशिक्षितांपासून उच्चशिक्षितांना एकत्र बांधणारी ही वारीची परंपरा महाराष्ट्र संस्कृतीचे वैभव आहे. छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या कॅमेऱ्याने चित्रित केलेल्या 'वारी'तून लोकपरंपरेचे जिवंत दर्शन घडते, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.
चित्रप्रदर्शनाचे उदघाटन करताना कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी अचानक उपस्थित विदयार्थीनीस फीत कापण्यास सांगितले. वारीत जसा पूजेचा मान दिला जातो त्या प्रमाणे विदयार्थीनीस नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उदघाटनाची फीत कापण्याचा मान मिळाला.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा वाड्म़य व संस्कृती अभ्यास संकुल आणि माध्यमशास्त्र संकुलाच्या वतीने जागतिक ख्यातीचे छायाचित्रकार व माहितीपट निर्माते संदेश भंडारे यांचे 'वारी एक आनंदयात्रा' हे चित्रप्रदर्शन आणि 'फोटोग्राफी व डॉक्युमेंटरी फिल्ममेकिंग' या विषयावर दोन विद्यापीठात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे, त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, नॅकचे संचालक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, डॉ. रमेश ढगे, डॉ. शैलजा वाडीकर, डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. चंद्रकांत बाविस्कर,डॉ. सुहास पाठक, डॉ. अविनाश कदम, डॉ. योगिनी सातारकर, डॉ. नीना गोगटे, डॉ. वैजनाथ अनमूलवाड, शिवाजी चांदणे आदिंसह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत हे चित्रप्रदर्शन गुरुवारी देखील सर्वांसाठी खुले राहणार आहे.
या चित्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाषा वाड्म़य व संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण आणि माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा