*'यशवंत ' मधील रासेयो शिबिरात 'बालविवाह: एक समस्या' या विषयावर व्याख्यान संपन्न*


नांदेड:( दि.१२ जानेवारी २०२५)

          श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मौजे मरळक येथे  आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक शिबिरातील उद्बोधन सत्रात  बालविवाह:एक समस्या या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

            प्रमुख वक्त्या उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ.मीरा फड यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी पर्यवेक्षिका प्रा.बदने या उपस्थित होत्या.  

               डॉ.कविता सोनकांबळे यांनी, आजही बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे; ही खंत व्यक्त केली. आधुनिक विज्ञान युगात देखील प्राचीन चालीरीती तसेच रुढी, प्रथा, परंपरा बदललेल्या नाहीत. आजही देशांमध्ये केंद्र सरकारला बालविवाहमुक्त भारत, असे उपक्रम राबवावे लागत आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी बालविवाह रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते तसेच अनेक थोर समाजसुधारकांनीही बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले. बालवयामध्ये विवाह झाल्यानंतर स्त्री ही शरीराने, मनाने तसेच विचाराने सुद्धा परिपक्व झालेली नसते. त्यामुळे तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तेव्हा वाढते बालविवाह रोखणे; ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर त्यांनी विवाहाचे वय देखील किती आहे, हे सांगितले. मुलींनी जास्तीत जास्त शिक्षण घेतले पाहिजे व स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे; तेव्हाच त्या आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला प्रतिकार करू शकतील व आपण वाढत्या बालविवाहाला आळा घालू शकू, असे विचार व्यक्त केले.

       याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बालविवाहावर उत्तम नाटक देखील सादर केले. त्यास गावातील लोकांनी व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी नलावडे यांनी तर प्रास्ताविक प्रा.राजश्री भोपाळे यांनी केले.

           अध्यक्षीय समारोप डॉ.मिरा फड यांनी केला तर आभार आरती तिडके यांनी मानले.

          व्याख्यानास प्रा. प्रियांका सिसोदिया, डॉ. कांचन गायकवाड यांची उपस्थिती होती. 

             कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. कैलास इंगोले, डॉ.राजरत्न सोनटक्के, प्रा.अभिनंदन इंगोले, डॉ.श्रीराम हुलसुरे आणि शिबिरार्थी स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.

          विशेष शिबिरातील विविध उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे सहकार्य करीत आहेत.

टिप्पण्या