मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये गेली ९८ वर्षे मुंबई बंदर विश्वस्त कर्मचारी सहकारी पतसंस्था कार्यरत असून अ वर्ग मिळवीत आहे. या संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी युनियन व पतपेढी यांच्यामध्ये ६ मार्च २०२० रोजी झालेल्या वेतन करारानुसार कर्मचाऱ्यांना पगारवाढीची फक्त ४० टक्केच थकबाकी दिली. अद्याप ६० टक्के थकबाकी संचालक मंडळाने दिली नसून, १ जानेवारी २०२२ पासून बंदर व गोदी कामगारांना झालेली पगारवाढ, ही सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना देखील मिळाली पाहिजे. हे तत्व यापूर्वीच प्रशासनाकडून मान्य झाले असून, त्याप्रमाणे पगारवाढीची बोलणी ताबडतोब सुरू करावी. या महत्त्वाच्या मागण्यांसाठी २० जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता ऑपरेशन सर्व्हिस सेंटरमधील सोसायटीच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी तीव्र निदर्शने केली.
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, २०१५ साली सेवाशर्ती नवीन नियम लागू केले होते. त्यानंतर २०१८ साली त्यामध्ये एकतर्फी बदल करण्यात आले. म्हणून युनियनने न्यायालयात धाव घेतली व त्यावर स्थगिती मिळविली आहे. असे असतानाही एका कर्मचाऱ्याला ५८ व्या वर्षी निवृत्त केले. दुसऱ्या कर्मचाऱ्याला दबाव टाकून राजीनामा घेतला. तिसरा कर्मचारी ६० वर्षापर्यंतची सेवा करत आहे. असे वेगवेगळे नियम लावून कामकाज चालू आहे. सोसायटीवर निवडून गेलेले संचालक (कामगार कार्यकर्तेच) आज मालक झालेले दिसत आहे. याची आम्हाला खंत वाटते. त्यांनी स्वतःसाठी पगारवाढ व थकबाकी घेतली. परंतु ज्या सोसायटीमध्ये सभासदांची कामे जे कर्मचारी करतात, त्यांना मात्र थकबाकी देताना जाणीवपूर्वक दिरंगाई केली जाते. थकबाकीच्या रकमेची तरतूद करून त्यास वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी असताना देखील ती का दिली जात नाही? असा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना राहिलेली ६० टक्के थकबाकी एकरकमी ताबडतोब द्यावी व नवीन पगारवाढीची बोलणी सुरू करावी, अशी आमची युनियनची मागणी आहे. याप्रसंगी युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, विजय रणदिवे, उपाध्यक्ष रमेश कुऱ्हाडे, प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव, यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. निदर्शनामध्ये युनियनचे सेक्रेटरी मनीष पाटील, खजिनदार विकास नलावडे, संघटक चिटणीस आप्पा भोसले सहभागी झाले होते. मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष सी.जे. मेंडोसा, मुख्य सचिव डी. एच. डींग्रेजा, खजिनदार एल. व्ही. गोवेकर, संयुक्त सचिव बी.बी. चिपळूणकर, पदाधिकारी प्रकाश पवार यांनी निदर्शनात प्रत्यक्ष सहभाग घेऊन आंदोलनाला जाहिर पाठिंबा दिला. निदर्शनातील कर्मचाऱ्यांनी कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. थकबाकी आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची. कामगार एकजुटीचा विजय असो. अशा जोरदार घोषणा देऊन सोसायटी प्रशासनाचा जाहीर निषेध केला.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धीप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

addComments
टिप्पणी पोस्ट करा