*संतांच्या शिकवणी प्रमाणे समाजातील सर्वात शेवटच्या घटकांची सेवा करणारे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर सारख्या व्यक्ती क्वचितच आढळत असल्यामुळे त्यांचा नांदेडकरांना सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक ॲड. सी.बी.दागडिया यांनी केले.कडाक्याची थंडी पडल्यामुळे ५३ व्या महिन्याअखेर २६ भ्रमिस्टांची कटिंग दाढी करून गरम पाण्याने अंघोळ घातल्यानंतर स्वेटरसह नवीन कपडे देऊन कायापालट करण्यात आला.*
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी नांदेड येथे नियमित सुरू असलेल्या कायापालट या जगावेगळ्या उपक्रमांची महती सर्व भारतभर पसरली आहे.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,खा.डॉ. अजित गोपछडे, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, संघटन मंत्री संजय कोडगे, लायन्सचे योगेश जयस्वाल, शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन च्या वतीने हा उपक्रम चालविण्यात येतो. दिलीप ठाकूर हे वैयक्तिक खर्चातून हा उपक्रम राबवितात. सोमवारी सकाळी सहा वाजता अरुणकुमार काबरा, सुरेश शर्मा, कामाजी सरोदे, संजयकुमार गायकवाड यांनी शहरातील विविध भागातून स्वतःच्या दुचाकी वर बसून आणलेले भ्रमिष्ट, कचरा वेचणारे, अपंग, बेघर नागरिकांची गर्दी झाली. स्वयंसेवक राजूअण्णा व प्रसाद पस्पुनूर यांनी सर्वांची काळजीपूर्वक कटिंग दाढी केली. हिवाळा असल्यामुळे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या सहकार्याने गरम पाण्याने स्नान करण्याची व्यवस्था करण्यात आली. कित्येक दिवस आंघोळ न करणाऱ्या या नागरिकांना विलास जोगदंड यांनी साबण लावून अभ्यंग स्नान घातले. यावेळी अंडरपॅन्ट, बनियन व पॅन्ट सोबत स्वेटर देखील मिळाल्यामुळे सर्वजण खुश झाले. ही भ्रमिष्ट मंडळी कायापालट होण्यासाठी तयार व्हावे म्हणून शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळाची व्यवस्था करण्यात येते. दिलीप ठाकूर यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला असल्यामुळे सर्वांना मिठाईचे डबे देण्यात आले.पूर्वीचे मळके कपडे, अवास्तव वाढलेले केस आणि नंतरची चकाचक करण्यात आलेली कटिंग दाढी व नवीन कपडे घातल्यामुळे उपेक्षितांचा झालेला कायापालट पाहून सर्वजण चकित झाले. डॉ. दि.बा. जोशी व डॉ. अर्जुन मापारे यांनी सर्वांची वैद्यकीय तपासणी केली .जखमांची मलमपट्टी करून मोफत औषधी दिली. दिलीप ठाकूर यांच्या या उपक्रमात आपण सदैव वैद्यकीय सेवा देणार असल्याची या दोन्ही नामवंत डॉक्टरांनी ग्वाही दिली.हैदराबादच्या स्नेहलता जायस्वाल यांनी यावेळी असे सांगितले की, दिलीपभाऊ वर नांदेडकरांचे किती प्रेम आहे त्याची प्रचिती त्यांच्या एकसष्ठीच्या कार्यक्रमात आली आहे. तब्बल पाच क्विंटल पेक्षा जास्त ब्लॅंकेटने तुला करण्याची इतिहासातील पहिलीच घटना नांदेड मध्ये घडली आहे. त्याची साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभल्यामुळे मी धन्य झाली आहे. कायपालट उपक्रम संपल्यानंतर गोवर्धन घाट परिसर स्वच्छ करण्यात आला.दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम राबविण्यात येणार असल्यामुळे अशा बेघर व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या रविवारी द्यावी असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे. (छाया: संजय कुमार गायकवाड)

addComments
टिप्पणी पोस्ट करा