प्रश्न उपस्थित करणारी लेखिका : डॉ. मथुताई सावंत

डॉ. बाळू दुगडूमवार, 

मु.पो. कुंटूर ता. नायगाव जि. नांदेड. 

मो-9767189392

जवाहरलाल नेहरू मा. व उ. मा. विद्यालय, बरबडा आयोजित 20 जानेवारी रोजी बरबडा येथे होणार्‍या सातव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. मथुताई सावंत यांची झालेली निवड ही त्यांच्या समाजहितैषी लेखनकर्तृत्वाचा गौरव आहे. डॉ. सौ. सावंत यांची आतापर्यंत 20 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ’राहु-केतू’ या कादंबरीमधून मराठवाड्यातील राजकारणाचे आणि राजकारणाने निर्माण केलेल्या दुःखाचे यथार्थ दर्शन त्यांनी घडविले आहे. संधीसाधू पुढार्‍यांचे स्वार्थकेंद्री राजकारण, त्यामुळे खर्‍या कार्यकर्त्यांची होणारी दमछाक, जनतेच्या अडीअडचणीचा तात्काळ फायदा उठविणारे असंवेदनशील राजकारणी असे ग्रामीण राजकारणाचे तलस्पर्शी चित्रण डॉ. मथुताई सावंत यांच्या लेखनातून प्रभावीपणे आले आहे.

’जिनगानी’ या कादंबरीतून त्यांनी ग्रामीण भागातील विधवा आणि परित्यक्ता स्त्रियांचे उद्ध्वस्त भावविश्व तर उभे केले आहेच, शिवाय स्त्रीजीवनातील ठसठसत्या वेदनेवर नेमकेपणी बोट ठेवले आहे. पूर्वी ग्रामीण राजकारण म्हटले की, पाटील-देशमुखांची पिढीजात भांडणे आणि जोडीला नाच-तमाशाचे फड असे ढोबळ चित्र रंगविले जात असे, पण मथुताई सावंत यांच्या राजकीय लेखनाने ही दृष्टीच बदलून टाकली. या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तर मिळालाच शिवाय ’राहु-केतू’ने वडोदरा (गुजरात) येथील मराठी वाङ्मय परिषदेचा अभिरूची गौरव पुरस्कारही खेचून आणला. ’राहु-केतू’ने मथुताई सावंत यांना लेखिका म्हणून महाराष्ट्रभर ओळख दिली.

’पाण्यातील पायवाट’, ’तिची वाटच वेगळी’ आणि ’पाणबळी’ या कथासंग्रहांतूनही डॉ. मथुताई सावंत यांनी मराठवाड्याचे दुःख समर्थपणे अभिव्यक्त केले आहे. मराठवाडा प्रदेशातली माणसे आणि त्यांचे जीवन हे मुळी अभावग्रस्त आणि कष्टप्रद असेच आहे. त्यात मराठवाडी स्त्री आणि तिचे जीवन हे तर आणखीनच खोल, अभावग्रस्त, कष्टप्रद आणि यातनामय आहे. याचा चढता आलेखच डॉ. मथुताई सावंत यांच्या एकूण कथांमधून दिसून येतो. स्त्री ही मुळातच पुरुषप्रधानतेच्या जोखडात पिचलेली आहे. प्रगत आणि समृद्ध प्रदेशातील स्त्रीसुद्धा याला अपवाद नाही. मग इथे मराठवाड्यात अनेक समस्यांच्या जंजाळातली स्त्री कशी असेल? इतर स्त्रियांप्रमाणे स्त्री म्हणून असलेले सारे दुःख मराठवाड्यातील स्त्रीच्या जीवनात जरा अधिकच भीषण होऊन आल्याचे दिसते आहे. कारण, स्त्री म्हणून आधीच उपेक्षित असणं आणि त्यात मराठवाड्यासारख्या मोगलाई प्रदेशातील अभावग्रस्ततेची भर, यामुळे मराठवाडी स्त्री ही खर्‍या अर्थाने दुःखांचे डोंगर पेलणारी स्त्री आहे.

राजकीय, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणामुळे एका वेगळ्याच दुष्टचक्रात अडकलेली ही स्त्री डॉ. मथुताई सावंत यांनी आपल्या कथांमधून उभी केली आहे. ग्रामीण राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या ’तिची वाटच वेगळी’ या कथेतली चंद्रकला पुरुषप्रधान राजकीय मानसिकतेची बळी ठरते. यातून चंद्रकलेच्या वाट्याला जे दुःख येते, त्या दुःखाचे यथार्थ दर्शन घडविण्यात डॉ. मथुताई सावंत यशस्वी झाल्या आहेत. सरपंचपदाची संधी प्राप्त होऊनही नवर्‍याच्या पुरुषी अहंकारामुळे चंद्रकलेला सरपंचपदापासून वंचित राहावे लागते. सरपंच होऊन समाजऋण फेडण्याचे तिचे स्वप्न पार धुळीला मिळते. हे केवळ पुरुषप्रधानतेमुळे घडले आहे, याचे दुःख चंद्रकलेला सतावते आहे. आपण केवळ स्त्री आहोत, म्हणून आपली ही संधी हिस्कावली जाते आहे, याचे शल्य उरात बाळगणारी चंद्रकला वेगवेगळ्या पातळ्यांवरचे दुःख भोगताना दिसते. 

डॉ. मथुताई सावंत यांनी केवळ दुःख भोगून गप्प राहणारी स्त्री रेखाटली नाही, तर आपल्या दुःखावर मात करून बंड करण्याची प्रेरणा देणारी कृतीही चंद्रकलेकडून करवून दाखवली आहे. आपला नवरा आणि त्याचा मित्र हे दोघेही लुच्चे राजकारणी आहेत. त्यांनी केवळ आपल्या पुरुषी अहंकारामुळे आपल्यावर अन्याय केला, याचे चीडमिश्रित दुःख चंद्रकलेच्या व्यक्तिमत्त्वातून अभिव्यक्त केले आहे.

’कानमंत्र’ ह्या कथेत राजकीय पुढार्‍यांकडून छोट्या कार्यकर्त्यांचा कसा वापर केला जातो आणि काम संपताच त्यांना कसे सोईस्करपणे बाजूला सारले जाते, याचे चित्रण येते. या कथेतल्या कमलताई अतिशय चांगल्या पद्धतीची विकासकामे करणार्‍या कार्यकर्त्या आहेत. पण त्यांच्या विकासकामांकडे केवळ स्त्री असल्यामुळे दुर्लक्ष केले जाते. पुढच्या निवडणुकीचे तिकीट नाकारले जाते. यामुळे कमलताईंना होणारे दुःख या कथेतून समोर येते. पुरुषप्रधान राजकारणात होणारी स्त्रीची घुसमट ’कोंडमारा’ ही कथा अत्यंत समर्थपणे व्यक्त करते.

स्त्री ही सहनशील असते. खूप सारे सहन करूनही ती उद्ध्वस्त होत नाही. ती सहनशीलतेतून जगण्याचे बळ घेत राहते. अशा सहनशील स्त्रीचे दर्शन ’ओळख’ या कथेत घडते. नवर्‍याचे राजकीय जीवन विस्कटते आहे आणि त्यामुळे आपला नवरा खचतो आहे, हे पाहून नवर्‍याच्या बरोबरीने सारी दुःखं सोसून उभी असलेली पारूबाई आपल्या नवर्‍याला ’अवं, धीर धरा. जातील हेबी दिस. कोणतेबी दिस थांबण्यासाठी येतात व्हय?’ असा धीर देते. नवर्‍याला धीर देतानाच स्वतः मात्र नवरा, मुलगा आणि कुटुंब यांच्या काळजीने दुःखी होत राहते.

अशिक्षित व्यक्ती राजकारणातल्या महत्त्वाच्या पदावर जाऊनही तिचा उपयोग होताना दिसत नाही.

’झेडपीनबाई’ ही कथा एका व्यापक अर्थाने स्त्रीचा राजकारणात शरीराने सहभाग तर झाला, पण तिच्या व्यक्तिमत्त्व नि मताचा कसलाच आदर केला जात नाही. स्त्री फक्त सहीची धनी, तीही स्वतःच्या मनाने करायची नाही, अशी नामधारी बनली. नवर्‍याच्या हातातली कठपुतळी बनली, हे वास्तव दाखवणारी ही कथा आहे. आपण अशिक्षित आहोत, अडाण्याला काहीपण कळत नाही, असा समज करून बसलेली राधाबाई. जेव्हा तिला आपण स्त्री आणि त्यात अशिक्षित असल्यामुळेच आपणास किंमत नाही, हे कळते तेव्हा तिला दुःख होते आणि ती या दुःखातून बाहेर पडण्यासाठी प्रौढशाळेत शिकायला जाऊ लागते.

’पुन्हा एकदा सावित्री’मधील सोनवणेबाईंना नवर्‍याच्या हट्टापायी सन्मानाच्या पदापासून दूर राहावे लागते. नवरा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आपला राजकीय बळी देतो आहे, याची प्रचंड चीड सोनवणेबाईच्या मनात आहे. पण पुढार्‍याची बायको असल्यामुळे हे सारे गिळून गप्प बसावे लागते. याचा उद्वेग ओकताना ’शेवटी तुम्हीही एक मतलबी पुरुषच निघालात,’ अशी जळजळीत प्रतिक्रिया सोनवणेबाई व्यक्त करतात. तथापि या उद्वेगातून, चीडांगारातून हाती काहीच लागत नाही. पद गेल्याच्या दुःखापेक्षा आपण स्त्री आहोत, पत्नी आहोत, त्यामुळेच हे आपल्यासोबत घडते आहे, याचे सोनवणेबाईंना अधिक दुःख होते.

’अडकित्त्यातील सुपारी’ या कथेतल्या सारजाबाईंना राजकीय डावपेचांची माहिती नसते, पण मिळालेल्या सन्मानाच्या सरपंचपदावरून अविश्वासाने काढून टाकल्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या सारजाबाई अपमानाच्या भीतीने चरफडतात. हे अपमानाचे दुःख सहन न झाल्यामुळे आत्महत्या करतात. ही सारजाबाईवर आलेली वेळ आपल्या राजकीय अधःपतनाचे सूचन नव्हे काय?

’वाटणी’ नावाची कथा ही सासुरवास भोगूनही समाधानात राहणार्‍या आणि आपल्या माहेरची होणारी वाताहत पाहून दुःखी होणार्‍या राधा नावाच्या नायिकेची दुःखग्रस्त जीवनकहाणी आहे.

डॉ. मथुताई सावंत यांच्या कथांमधून वेगवेगळ्या स्त्रियांचे भावदर्शन घडते. या कथांमधून वावरणारी स्त्री ही उरामध्ये दुःखाचा ज्वालामुखी दडवून जगणारी आहे, याची जाणीव होत राहते. विशेषकरून राजकीय जीवनात वावरणार्‍या स्त्रियांचे दुःख ह्या कथा ठळकपणे व्यक्त करताना दिसतात. डॉ. मथुताई सावंत यांनी हा राजकीय दुःखाचा अनुभव जीवनातूनच घेतला आहे. अनेक वर्षे राजकारणात आणि समाजकारणात वावरल्यावर आणि जीवनातील दुःखांना झेलल्यानंतर त्यांची कथावृत्ती तरी कशी गप्प बसणार? डॉ. मथुताई सावंत यांच्या कथेत एक विलक्षण प्रभावी नाट्य असते. या नाट्यमयतेमुळे त्यांच्या कथेची वेधकता आणि वाचनीयता वाढली आहे.

’तिची वाटच वेगळी’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा राज्य पुरस्कार, सोलापूरचा भैरू रतन दमाणी साहित्य पुरस्कार, प्रवरानगरचा पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आनंदीबाई शिर्के पुरस्कार, हिंगोलीचा संत नामदेव साहित्य पुरस्कार असे सात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. स्वा. रा. ती. म. विद्यापीठाच्या बी. ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात आणि सोलापूर विद्यापीठाच्या एम. ए.च्या अभ्यासक्रमात या कथासंग्रहाचा समावेश झालेला आहे. आकाशवाणीच्या नांदेड आणि उस्मानाबाद केंद्रांवरून या कथांचे नाट्यीकरण सादर करण्यात आले. त्या प्रसारणाला ग्रामीण श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.

’पाणबळी’ हा डॉ. सावंत यांचा तिसरा कथासंग्रह ग्रामीण जीवनातील स्त्रियांच्या दुःखभोगावर प्रकाश टाकतो. या संग्रहातील कथा ग्रामीण स्त्रीचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक कुचंबना मांडतानाच, ’निसर्गाच्या अवकृपेला सर्वप्रथम स्त्रीच बळी पडते,’ याचे गडद सूचन करणारा आहे. या कथासंग्रहातून येणार्‍या स्त्री व्यक्तिरेखा डॉ. मथुताई सावंत यांच्या प्रतिभासामर्थ्याचे सूचन करणार्‍या आहेत. ग्रामजीवन आणि निसर्ग यांचा अन्योन्य संबंध आहे. ग्रामीण जीवन हे निसर्गाच्या प्रत्येक कृतीने प्रभावित होणारे आहे. एखादवेळी निसर्ग अनुकूल झाला तर ग्रामजीवन सुखी, समृद्ध होते, उलट निसर्गाने प्रतिकूलता दाखविली तर हे ग्रामजीवन, पर्यायाने इथल्या माणसांचे जीवन उद्ध्वस्त, वैराण होते. याचा प्रत्यय देणार्‍या या कथांमधून स्त्रियांचे म्हणून एक वेगळे दुःख आपल्याला व्यथित केल्याशिवाय राहात नाही.

’पाणबळी’ या पहिल्याच कथेत नागम्मा ही नायिका आणि तिचे प्राक्तन निसर्गाच्या अवकृपेने कसे उद्ध्वस्त होते, याचे प्रत्ययकारी दर्शन घडते. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे हैराण झालेल्या गावात नागम्मा या गरोदर स्त्रीचा पाण्यासाठी कसा बळी जातो, पाण्याच्या पायी नागम्माच्या जीवनात दुःख प्रवेश करते आणि त्यातच तिचा शेवट होतो. या कथेत नागम्मा ही स्त्री पाण्याच्या दुर्भिक्षाला सर्वप्रथम बळी पडते. दूर नदीवरून पाणी वाहून आणताना दोन जीवांची नागम्मा कोसळते. तिला मार लागतो आणि ती तिथेच एका मुलीला जन्म देऊन प्राण सोडते. पाण्याचे दुर्भिक्ष हेच स्त्रीचे नशीब बनते आणि बळी जातो तो स्त्रीचाच... ’पाणबळी’ ही कथा वाचून झाल्यावर ’जर तिसरे जागतिक महायुद्ध झालेच तर ते पाणीप्रश्नावरून होईल’, हे एका जागतिक विचारवंताचे विधान वाचकाच्या मनात रुंजी घालत राहते.

’पाणबळी’ संग्रहातील इतर कथांमधून येणार्‍या स्त्रिया वेगवेगळ्या पातळ्यांवरचे दुःख भोगताना दिसतात. ’गळाटा’ कथेतली बळीची बायको मुलीच्या लग्नाची चिंता करते तर ’करपलेला कोंब’ कथेत किसनची आई किसनच्या नोकरीपायी व्यथित होत राहते. अशा एक ना अनेक स्त्रिया ग्रामीण भागात दुःखग्रस्त जीवन जगतात. स्त्रियांच्या वाट्याला आलेले हे दुःखमय जीवन बदलले पाहिजे, स्त्रीला सर्व क्षेत्रांत समानतेचा दर्जा व अधिकार मिळाला पाहिजे, तिच्या व्यक्तिमत्त्वाला सन्मान आणि कर्तृत्वाला संधी मिळाली पाहिजे, हीच तळमळ डॉ. मथुताई सावंत यांच्या या कथांमधून स्रवत राहते. 

’राहु-केतू’ मधील वेणूताई असो, की ’जिनगानी’तील राधा असो, ’तिची वाटच वेगळी’मधील चंद्रकला असो, की ’पाणबळी’तील नागम्मा असो, ’कानमंत्र’ मधील कमलताई असो, की ’हातचा एक’ मधील रातोळीकरबाई असो, ही सर्व बाणेदार वृत्तीची आणि ठसठशीत व्यक्तिचित्रे वाचकाच्या मनात कायमची घर करून राहतात. जगण्याचं संजीवक बळ देणारी आश्वासक पात्रे मनाला उभारी देऊन जातात.

डॉ. मथुताई सावंत यांनी बालसदनातील अनाथ व निराधार मुलांच्या जीवनावर ज्या कथा लिहिल्या, त्या पुढे ’निवडुंगाची फुलं’ या पुस्तकात संग्रहित करण्यात आल्या आहेत. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मयनिर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार, बुलडाणा येथील भारत विद्यालयाचा शशिकलाताई आगाशे पुरस्कार आणि मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर या संस्थेचा शेवडे गुरुजी साहित्य पुरस्कार असे तीन पुरस्कार लाभले आहेत.

मराठवाड्यातील ताकतीच्या कथालेखिका आणि पहिल्या ग्रामीण कादंबरीकार म्हणून डॉ. मथुताई सावंत यांचे स्थान निर्विवाद महत्त्वाचे आहे. अज्ञान, उपेक्षा आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे मागास राहिलेल्या या प्रदेशाला आणि त्याच्या दुःखभोगाला शब्दबद्ध करून डॉ. मथुताई सावंत यांनी जणू वाचाच दिली आहे. त्यांनी आपल्या लेखनातून ग्रामजीवनातील भीषण वास्तव प्रगट केले आहे. त्यांचे लेखन मराठवाड्याकडे आणि मराठवाड्यातील स्त्रियांकडे बघण्याचा एक वेगळा, नवा असा दृष्टिकोन देणारे आहे.

कथा-कादंबर्‍यांबरोबरच डॉ. मथुताई सावंत यांनी संस्कारक्षम वाचकांसाठी ’समाजशिक्षिका सावित्रीबाई फुले’, ’महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ आणि ’राजर्षी शाहू महाराज’ ही प्रेरणादायी चरित्रे लिहिली आहेत. आपल्या देशात बालविवाह प्रतिबंधक कायदा असला, तरी राजरोस बालविवाह होतात, हे एक कटुसत्य आहे. या दुष्ट प्रथेच्या विरोधात समाजमन घडविण्यासाठी त्यांनी ’लगीनघाई? मुळीच नाही!’ हे नाटक लिहिले.

’कथाकार भास्कर चंदनशिव’ हा संशोधनपर ग्रंथ आणि ’सर्जनाचा शोध’ हा समीक्षाग्रंथ त्यांच्या संशोधक वृत्तीची साक्ष देतो. अलीकडे त्यांचे ’समाज, साहित्य आणि संस्कृती’, ’साहित्यसौरभ’, ’अधोरेखित’, आणि ’अक्षरवाटा’ हे अभ्यासपूर्ण समीक्षाग्रंथ प्रकाशित झाले आहेत.

कथा असो वा कादंबरी, नाटक असो वा चरित्रे डॉ. मथुताई सावंत यांनी आपल्या लेखनातून शाश्वत जीवनमूल्यांचा आग्रह धरला आहे. मूल्याग्रही लेखिका म्हणून त्यांचे स्थान अव्वल दर्जाचे आहे. ’गीत आमचे उषःकालचे एकमुखे गाणार। सावित्रीचा वसा वारसा आम्ही पुढे नेणार।’ हा त्यांचा नेक निर्धार आहे.

सर्जनशील साहित्यनिर्मितीबरोबरच महिला व बालकल्याणाच्या क्षेत्रात डॉ. सौ. सावंत यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनातर्फे तत्कालीन मुख्यमंत्री ना. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. पुण्याच्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे महाराष्ट्रातील श्रेष्ठ लेखिकेला दिला जाणारा मालतीबाई दांडेकर जीवनगौरव पुरस्कार डॉ. मथुताई सावंत यांना प्रदान करण्यात आला. यावरून त्यांचे साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य अधोरेखित झाले आहे.

डॉ. मथुताई सावंत यांच्या आगामी लेखनप्रवासाला हार्दिक शुभेच्छा!

टिप्पण्या