नांदेड:( दि.२६ जानेवारी २०२५)
भारत सरकारच्या पीएम-उषा योजनेतील सॉफ्ट कॉम्पोनंट घटकाअंतर्गत यशवंत महाविद्यालयातील इ-लर्निंग सेंटर येथे गणित व संख्याशास्त्र विभागाद्वारे आयोजित दोन दिवसीय व्याख्यानमाला उत्साहात संपन्न झाली.
विद्यार्थ्यांना विविध विषयांतील आधुनिक कौशल्यांमध्ये पारंगत करणे व त्यातून शाश्वत विकासाकडे वाटचाल करणे, ही व्याख्यानमालांची उद्दिष्ट्ये आहेत. यासाठी विविध विद्यापीठांमधील संबंधित विषयातील ज्येष्ठ व निष्णात तज्ज्ञ प्राध्यापक आणि संशोधक यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत आहे.
गणित व संख्याशास्त्र विभागातर्फे आयोजित व्याख्यान उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगूरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे होते तर प्रमुख अतिथी तथा व्याख्याते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील गणित विभागाचे प्राध्यापक तथा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ.विनायक जोशी होते.
याप्रसंगी व्यासपीठावर विभागप्रमुख डॉ.एन.ए.पांडे व डॉ.व्ही.सी.बोरकर उपस्थित होते.
उद्घाटन सत्राचे सूत्रसंचलन वैष्णवी पतंगेने केले व अनुष्का जयस्वालने व्याख्यात्यांचा परिचय करून दिला.
प्रमुख वक्ते डॉ.विनायक जोशी यांनी, गणितातील सूत्रे, प्रमेय, सिद्धांत यांना अनेक प्रकारे कसे सिद्ध करता येते व त्यांच्या वेगवेगळ्या सिद्धता कशा अनेक दृष्टींनी महत्त्वाच्या व उपयोगी आहेत, हे विविध उदाहरणांसह स्पष्ट करून सांगितले. पर्म्युटेशन ग्रुप्स या तांत्रिक विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. गणितीय संकल्पनांचा वापर करून अनेक जटील समस्या व कोडी कशा प्रकारे सहज सोडविता येतात, हे सोदाहरण विशद केले. विश्वातील प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षाप्रत्यक्षरित्या गणितावरच आधारीत असल्यामुळे, गणिताच्या वापराशिवाय विश्वातील कशाचाही अभ्यास पूर्ण होऊ शकत नसल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, गणित विषयाचे महत्त्व लक्षात घेण्याची गरज असल्याचे सांगून गणितीय संकल्पनांचा कुशल वापर करण्यावर भर दिला गेला पाहिजे, असे प्रतिपादन केले. त्यांनी गणित कसे सगळीकडे मुळ संकल्पनेच्या रूपात असतेच आणि त्याचे नेमके ज्ञान कशाप्रकारे प्रगतीला सहाय्यक होते, हे स्पष्ट करून सांगितले.
कु.साक्षी नरवाडेने आभार मानले. याप्रसंगी विभागातील प्रा.सचिन वडजे, प्रा.नागेश पवार, प्रा.कोमल देशमुख तसेच बी.ए. आणि बी.एस्सी. गणित व संख्याशास्त्र विषयाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे व डॉ.हरिश्चंद्र पतंगे, इंग्रजी विभागप्रमुख तथा अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका प्रा.डॉ.पद्मारानी राव, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, लेखापाल अभय थेटे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुनी यांनी सहकार्य केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा