*'यशवंत ' मध्ये संगीत विषयावरील व्याख्यान व गझल गीतगायन उत्साहात संपन्न


नांदेड:( दि.२ जानेवारी २०२५) 

          श्रद्धेय डॉ.शंकररावजी चव्हाण स्मृती संग्रहालयातील सभागृहामध्ये मुंबई विद्यापीठाचे संगीत विभागप्रमुख डॉ. कुणाल इंगळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

            व्याख्यान कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे म्हणाले की, संगीतामुळे फक्त मनोरंजनच होत नाही तर संशोधनाअंती सिद्ध झाले आहे की, मानवी शरीरातील रोग संगीतामुळे बरे होऊ शकतात. राग यमन, राग मारवा, राग भैरव, राग हंसध्वनी आदी रागांच्या ऐकण्याने मानवी शरीरात डोपामाईन नावाचे रसायन तयार होते व ते रसायन मानवी शरीरामध्ये वेदनाशमक म्हणून कार्य करते. म्हणून संगीत हे मानवाच्या रोगमुक्तीचे महत्त्वाचे औषध होऊ शकते. 

         पुढे बोलताना त्यांनी, पीएम उषा योजना तसेच महाविद्यालयाच्या विकास व कार्यावर प्रकाश टाकला.

          प्रमुख वक्ते डॉ.कुणाल इंगळे यांनी, खेळ शैली व सुगम संगीताच्या प्रभावी प्रस्तुती करण्यासाठी आवाज साधना व रियाजाचे तंत्र या विषयावर मार्गदर्शन करत असताना 'आसवांचे जरी असे झाले' या मराठी गझलपासून व्याख्यानाची सुरुवात केली.

            'उसके हसते चेहरे से तो ऐसा लगता है' या गजलच्या माध्यमातून त्यांनी गझलचे मर्मबंध श्रोत्यांसमोर उलगडून दाखविले. त्यांनी आपल्या गझल गायनामध्ये, शब्द आणि त्या शब्दाला साजेसे स्वर कसे असावे, शब्द स्वरांचे उच्चारण कसे असावे, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले; त्याचबरोबर शास्त्रीय संगीतामध्ये रियाजाचे काय महत्त्व आहे, रियाजाच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, आवाज लावण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, या पद्धती शास्त्रीय संगीत व सुगम संगीत दोन्हीलाही फायदेशीर कशा आहेत, याबद्दल सप्रयोग मार्गदर्शन केले. त्याच पद्धतीने त्यांनी सभागृहातील सर्व विद्यार्थ्यांना राग नायकी कानडा या रागातील छोटा ख्याल शिकविला. 

          त्यांना तबल्याची साथ नांदेडचे सुप्रसिद्ध तबलावादक स्वप्निल धुळे तर हार्मोनियमची साथ डॉ. शिवराज शिंदे यांनी दिली.

           प्रारंभी संगीत विभागप्रमुख डॉ.एस.व्ही. शिंदे यांनी, संगीत विभागाची जडणघडण, परंपरा व योगदान या विषयावर मनोगत व्यक्त केले.  

           कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे होते. मंचावर उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, नांदेड येथील सुप्रसिद्ध गायक श्री.संजय जोशी, प्रबंधक संदीप पाटील उपस्थित होते. 

           कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संगीत विभागातील सर्व विद्यार्थी, नांदेडमधील विविध संगीत क्लासेसचे संचालक, महात्मा फुले हायस्कूल बाबानगर व विजयनगर येथील शिक्षक, महाविद्यालयाचे प्राध्यापक आदींची उपस्थिती होती.

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ. एल.व्ही.पदमाराणी राव, डॉ.प्रवीणकुमार मिरकुटे, डॉ.बी.बालाजीराव, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डी.एस. ठाकूर, गोविंद ठाकूर, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या