संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. सौ. मथुताई सावंत यांचे अध्यक्षीय भाषण

  •  जवाहरलाल नेहरू शिक्षण समिती संचालित,
  • जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बरबडा आयोजित
  • स्वातंत्र्यसेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी बरबडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ
  • सातवे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन, बरबडा

सोमवार, दि. 20 जानेवारी 2025

संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. सौ. मथुताई सावंत

यांचे अध्यक्षीय भाषण

स्थळ ः स्वातंत्र्यसेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी, बरबडेकर साहित्यनगरी व कलावतीबाई धर्माधिकारी विचारपीठ.

जवाहरलाल नेहरू शिक्षण संस्थेच्या वतीने बरबडा येथे आयोजित करण्यात आलेल्या सातव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझ्यासारख्या एका शेतकर्‍याच्या मुलीला सन्मानित केलेत, त्याबद्दल मी संमेलनाचे संयोजक मा. श्री. दिलीपराव धर्माधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे सुरुवातीलाच मनापासून आभार मानते.

या साहित्य संमेलनाचे उद्घाटक, राज्याचे सहकारमंत्री नामदार श्री. बाबासाहेब पाटील, आमचे बंधू मा.आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, शिक्षक आमदार मा. विक्रम काळे, मा.आ. राजेश पवार, प्रा. नारायण शिंदे, सौ. छायाताई धर्माधिकारी, दै. ‘उद्याचा मराठवाडा’चे साक्षेपी संपादक रामभाऊ शेवडीकर, प्राचार्य चंद्रकांत पोतदार, संयोजक संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी, व्ही.टी. सुरेवाड, इरन्ना कंडापल्ले, जगदीशराव धर्माधिकारी, शिवाजीराव धर्माधिकारी, सर्व सन्माननीय पूर्वाध्यक्ष, या शैक्षणिक संकुलाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री सुदर्शनराव धर्माधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व साहित्यिक आणि साहित्यप्रेमी बंधू-भगिनींनो,

आरंभी या संस्थेचे दिवंगत सदस्य नारायणराव सर्जे गुरुजी आणि देवीदासराव नेरलेवाड यांच्या प्रेरणादायी स्मृतींना मी विनम्र अभिवादन करते.

बरबडा येथील सातव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या विचारपीठावरून अध्यक्षीय भाषण करताना माझ्या मनात असंख्य भावतरंग उठले आहेत. एका कुणब्याच्या लेकीच्या लेखणीचा सन्मान येथे होतो आहे. ही एक मोठी आश्वासक घटना आहे, असे मी मानते.

स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार करणारे खरे कर्मयोगी कै. गोविंदरावजी धर्माधिकारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी बरबडा येथे ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते, ही मोठी अनुकरणीय आणि आनंददायी गोष्ट आहे.

बरबडा हे गाव गोदावरी नदीच्या काठावर वसलेले असून हे एक कृषिप्रधान गाव आहे. निजामकाळात बरबडा ही एक मोठी बाजारपेठ होती. या गावात अठरापगड जाती, बलुतेदार आणि वतनदार आजही गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात.

आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या या गावात दुर्मीळ असे बळीराजाचे मंदिर आहे. त्याचबरोबर या परिसरात कपिलेश्वर, येताळेश्वर, श्री दत्त आणि विठ्ठल-रुक्मिणीची मंदिरे आहेत.

स्वातंत्र्यसेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी आणि दिगंबररावजी धर्माधिकारी यांनी अगदी सुरुवातीपासून बरबडा गावात सामाजिक प्रबोधन आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले.

 कीर्तने, प्रवचने, व्याख्याने, पारायणे आणि नवरात्रमहोत्सव अशा विविध कार्यक्रमांतून त्यांनी सामाजिक प्रबोधनाची येथे मुहूर्तमेढ रोवली. स्त्रीशिक्षणाच्या तळमळीपोटी मा. गोविंदरावजींनी नांदेड येथे मराठवाड्यातील पहिल्या महिला महाविद्यालयाची स्थापना केली. हाच वारसा अतिशय नेटाने आणि निष्ठेने दिलीपराव धर्माधिकारी पुढे चालवत आहेत. गावकरी आणि शिकणारी नवी पिढी यांच्या समन्वयाने परिसराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेले ग्रामीण नेतृत्व दिलीपराव धर्माधिकारी यांच्या रूपाने पुढे आले, ही अतिशय गौरवाची गोष्ट आहे.

बंधू-भगिनींनो, आपल्या मायमराठीला मोठी उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. ही परंपरा टिकवून ठेवण्याबरोबरच ती समृद्ध करणे महत्त्वाचे आहे. इंग्रजीच्या प्रभावाच्या काळात आपला मातृभाषेविषयीचा आत्मविश्वास वाढीला लावणे ही मराठीजनांची मोठी जबाबदारी आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकता या बाबी अधिकाधिक व्यापक रूप धारण करू पाहात आहेत. तरीही भाषाभयाचा न्यूनगंड टाळून आपल्याला मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. इथल्या खेड्यापाड्यांतील सामान्य माणसांनीच खर्‍या अर्थाने मराठी भाषा टिकवून ठेवली आहे, जपली आहे, जोपासली आहे. गेल्या अनेक वर्षांच्या लढ्यानंतर नुकताच मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे, ही मोठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

जगात सर्वत्र मानवी जीवन झपाट्याने बदलत चालले आहे. दररोज नव्या संक्रमणाला सामोरे जावे लागत आहे. जीवनव्यवहारात आणि साहित्यव्यवहारात नव्या-जुन्या विचारांचा संघर्ष अटळ असतो. आज मानवी जीवनच भयंकर गतिमानतेने पुढे जात आहे. साहित्य म्हणजे आपल्या मनातील अव्यक्त आंतर्विश्वाचा कोलाज असतो. त्या अव्यक्तांची सर्वस्पर्शी, तलस्पर्शी आणि व्यापक ओळख करून देणारे साहित्य मराठी भाषेत निर्माण करणे, त्याला रसिकमान्यता आणि समाजमान्यता मिळवून देणे हे मराठी लेखकांचे एक महत्त्वाचे कार्य आहे. त्यासाठी प्रकाशक, रसिक आणि समीक्षक अशा सर्वच संबंधित घटकांचे सहकार्य अपेक्षित असते.

आद्य समाजशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीशिक्षणाच्या महान कार्याला आज गोड फळे आली आहेत. सावित्रीच्या लेकी आज ग्रामीण भागातही शिकत आहेत. स्वतःला घडवीत आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या वैचारिक नांगरणीमुळे आणि क्रांतिकारी कार्यामुळे मुली, भगिनी स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवीत अस्मिता जपताना दिसत आहेत. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आगरकर, महात्मा बसवेश्वर, महर्षी धोंडो केशव कर्वे, तसेच अन्य संतांनी आणि समाजसुधारकांनी केलेल्या प्रबोधनामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेचे बळ घेऊन तळागाळातील माणूस जगण्याच्या युद्धभूमीत खंबीरपणे पाय रोवून उभा आहे.

आजघडीला प्रत्येक जीव गोंधळलेला आहे. कधी निसर्ग कोपतो, तर कधी कोरोनासारखी महाभयंकर महामारी येते. ग्लोबल वार्मिंगवर चर्चा होते. तर कधी राज्यकर्त्यांचे रोज नवेनवे भ्रष्टाचार आणि घोटाळे समोर येतात. रोजचा दिवस उगवतो आणि मावळतो, तसे आपण आजचे सारे विसरून उद्याच्या दिवसासाठी स्वतःला जिवंत ठेवतो; आणि पुन्हा जगण्यासाठी तयार करतो. आपल्या विवंचना काही संपत नाहीत. रोज वर्तमानपत्रातील आणि टीव्हीच्या वाहिन्यांवरील जिवाचा थरकाप उडविणार्‍या बातम्या अंगावर धावून येतात. जगण्याच्या दुष्टचक्रात सापडलेले आपण सारे या उद्वेगजनक बातम्यांनी शारीरिक व मानसिक शक्तिक्षय झाल्याप्रमाणे कणाहीन होतो आणि अगतिक होतो. सामान्य माणसाचा आवाजच दबला गेला आहे. क्षीण झाला आहे. आज आपण आपला आवाज हरवून बसलो आहोत. मोबाईलच्या माध्यमातून जगाशी जोडला गेलेला प्रत्येक माणूस स्वतःला एकाकी समजतो आहे.

आजचा भवताल भयंकराच्या दारात उभा आहे. एकीकडे सत्ता आणि बळाचा अनिर्बंध वापर तर दुसरीकडे भय, भूक आणि दारिद्य्र आहे. ज्यांचा आवाज क्षीण झालाय तो बुलंद करण्यासाठी, दुर्बलांचे मनोबल वाढविण्यासाठी लेखकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. सत्तेत राहूनही समाजकार्य करता येते. आजही काही लोकप्रतिनिधी ते करतातच. सध्या जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाकडे समाज वळतोय, हे चित्र फारच भयानक आहे. अशा वेळी साने गुरुजींसारखे हळवे साहित्य लिहून समाजाच्या संवेदना जागवाव्यात, की केशवसुतांची गगनभेदी तुतारी पुन्हा फुंकावी अन् क्रांतीचा एल्गार करावा? अशा परिस्थितीत  युवक-युवती, लेखक, कलावंत, पत्रकार, विचारवंत अशा अनुभवी नि विचारी लोकांचे संघटन करून नवसमाजबांधणी करण्याची गरज आहे. समाजातील दुष्कृत्यांवर वार करण्यासाठी जहाल विचारांची पेरणी करणारे, इतिहास घडविणारे शब्दप्रभू आमच्यातून निर्माण व्हायला हवेत. अशा साहित्य संमेलनांच्या आयोजनामागील हेतूच मुळी हा असतो. किंबहुना साहित्य संमेलन म्हणजे अतिशय सभ्यपणे आणि विचारपूर्वक चालविलेले वैचारिक आणि सामाजिक आंदोलन असते, असे मी मानते. इथे उपस्थित आपण सगळे त्या आंदोलनाचाच एक भाग आहोत.

ग्रामीण भागात साहित्य संमेलनाचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलने, विश्व मराठी साहित्य संमेलने होतात, पण त्यात सर्वांनाच संधी मिळते असे नाही. आमच्या ग्रामीण भागात शेतीत राबताना ओव्या गाणार्‍या कितीतरी बहिणी आहेत. कितीतरी नवोदित ग्रामीण लेखक-कवी आहेत. या लिहित्या हातांना बळ देऊन नवीन लेखकांची आणि कवींची आश्वासक पिढी अशाच साहित्य संमेलनांमधून घडत असते.

बंधू-भगिनींनो, 

ग्रामीण साहित्याला फार मोठा इतिहास आहे. महात्मा फुले यांच्यापासून सुरू झालेल्या या प्रवाहातील आनंद यादव, द. मा. मिरासदार, शंकर पाटील, वासुदेव मुलाटे, चंद्रकुमार नलगे, रा. रं. बोराडे, द. ता. भोसले, ना. धों. महानोर, नागनाथ कोत्तापल्ले, भास्कर चंदनशिव आणि इतर सन्माननीय लेखक-कवींनी माती आणि नाती यांचा समन्वय साधत शेतशिवाराचे, शेतकरी मायबापाचे वास्तवचित्र मराठी साहित्यात रेखाटले. गावगाड्यात अठरापगड जाती गुण्यागोविंदाने राहात आहेत. त्यांच्यातील जिव्हाळा अबाधित राहावा, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. तेच खरे मानवतेचे पुजारी आहेत. त्यांच्या जगण्याचे प्रश्न कथा, कविता, मुलाखतींच्या माध्यमातून इथे उजागर होतील.

या संमेलनाचे पूर्वाध्यक्ष ग. पि. मनूरकर, जगदीश कदम, नागनाथ पाटील, नारायण शिंदे, इंद्रजीत भालेराव आणि राजेंद्र गहाळ यांचे लेखनकर्तृत्व मराठी साहित्य विश्वाने मान्य केले आहे.

ग्रामीण भागात राहूनही मायमराठीची सेवा करून सकस साहित्यलेखन करणारी सशक्त लेखक-कवींची एक मोठी फळी या मराठवाड्यात आहे. श्रीकांत देशमुख, मथु सावंत, आसाराम लोमटे, भीमराव वाघचौरे, शेषराव मोहिते, शंकर वाडेवाले, गणेश आवटे, बालाजी मदन इंगळे, विलास सिंदगीकर, केशव खटींग, विलास पाटील, पोपट काळे, श्रीराम गव्हाणे, रावजी राठोड, मोतीराम राठोड, माधव जाधव, भारत काळे, संदीप जगताप, ललित अधाने, योगीराज माने, आनंद कदम, शिवाजी मरगीळ, राम निकम, श्रीनिवास मस्के, शिवाजी आंबुलगेकर, ललिता गादगे, शांता जोशी, संजीवनी तडेगावकर, महेश मोरे, बाळू दुगडूमवार, अमृत तेलंग, प्रदीप पाटील कामरसपल्लीकर, प्रा. व्यंकटी पावडे, शिवाजी जोगदंड, नारायण शिवशेट्टे, व्यंकट सोळंके, वनमाला लोंढे इत्यादी मान्यवरांनी ग्रामीण साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. ही यादी परिपूर्ण नाही, याची मला जाणीव आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात ‘खेड्याकडे चला’ असे गांधीजी म्हणाले होते, परंतु आज ग्रामीण भागातील लोकांची शेतीच धनदांडग्यांनी गिळंकृत केली आहे. भूमिहीन शेतकरी उपजीविकेसाठी शहरांकडे धावतोय. खेडी उदास झालीत. वाड्यांवरचे चिरे जायबंदी होत आहेत. शेतीविषयक अनेक समस्या आहेत. नापिकी, तंत्रज्ञानाची कमतरता, सिंचनाचा अभाव, शेतीमालाला योग्य बाजारभाव न मिळणे, यामुळे अल्पभूधारक शेतकरी पुरता उसवून गेला आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे बिलोली तालुक्यातील मिनकी येथील एका 15 वर्षीय शाळकरी मुलाने शाळेसाठी पैसे नाहीत, म्हणून आपले जीवन संपवले. ते पाहून ज्या दोरीने मुलाने फाशी घेतली, त्याच दोरीने कर्जबाजारी बापानेही आपले जीवन संपवले. एकट्या मराठवाड्यात गतवर्षी 948 शेतकर्‍यांनी स्वतःचे जीवन संपवले. एकीकडे सत्तांध राजकारणी, गुंड-पुंड, सावकार तर दुसरीकडे कर्जबाजारीपणामुळे आयुष्याची दोरी कायमची ओढणारे शेतकरी हे भयावह चित्र आहे.

अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍याला वाटते, की सण-समारंभ येऊच नयेत, कारण सणाला गोडाधोडाचे जेवण करावे लागते. मुलांना नवीन कपडे घ्यावे लागतात. लेकीला माहेरी बोलवावे लागते. आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी मग स्वतःला अगतिक आणि अपराधी समजू लागतो. त्यातूनच तो आत्महत्येला प्रवृत्त होतो.

दुर्दैवाने शेतकर्‍यांविषयी समाजाला संवेदनाच उरलेली नाही. एकीकडे ओसंडून वाहाणारे मॉल्स, भव्य विमानतळे, मेट्रोचे जाळे, समृद्धी महामार्ग यांच्या झगमगत्या विकासाच्या दुनियेत शेतकरी पाचोळ्यासारखा कुठेतरी दूर फेकला गेला आहे. म्हणूनच त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्याचे जीवनमान उंचावण्यासाठी मदतीची आणि शाश्वत आधाराची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी या बाबींकडे गांभीर्याने पाहात कृती करण्याची आवश्यकता आहे.

सध्याचा काळ मोठा कठीण आहे. अशा वेळी धैर्याने काळाच्या छातीवर पाय देऊन उभे राहाण्याची गरज आहे. आपण सर्वकाही गमावून बसलो आहोत, हा निराशावाद झटकून पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल. आपल्या जीवनाची मूल्ये इतर कोणी ठरवू नयेत, तर आपणच ती ठरवून स्वतःची प्रगती करावी.

सभोवार दिसणार्‍या झगमगाटी भौतिक गोष्टींपेक्षा आपण साधेपणाच्या जगण्यावर भर देत श्रमप्रतिष्ठा निर्माण करायला हवी. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर चालत संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारायलाच पाहिजे.

समाजातील शोषकवर्ग संख्येने कमी असला तरी तो बलाढ्य आहे. अशा अतिबलाढ्य शक्तीला कधी एकजुटीने तर कधी युक्तीने शह देण्याचे मानसिक बळ आपल्यात निर्माण व्हावे. दुर्बलांनी, वंचितांनी, शोषितांनी जातीपातीत न गुरफटता सामाजिक सलोख्याने आणि एकजुटीने राहून वाईट प्रवृत्तींवर प्रहार करण्याची खरी गरज आहे. ही गरज साहित्यिकांनीही आपल्या सकस साहित्यकृतींतून दिशादर्शक लेखन करीत पूर्ण करावी. गुंड-पुंड शक्तींविरोधात ग्रामीण भागातील जनतेने ठामपणे उभे राहायला हवे. आपले गाव एका मजबूत किल्ल्यासारखे शाबूत ठेवा. जिवापाड जतन करा. स्वार्थी हेतूने आपल्या गावात येऊन शांतता भंग करणार्‍या प्रत्येक दुष्ट शक्तीविरोधात लढा पुकारण्यास सज्ज व्हावे, एवढेच मला या निमित्ताने सांगावेसे वाटते.

ग्रामीण भागात आरोग्याचे आणि स्वच्छतेचे प्रश्न आहेत. महिलांना आजही पुरेशा आरोग्यसुविधा नाहीत. दर्जेदार शिक्षणाची कमतरता आहे. सानेगुरुजींच्या निष्ठेने शिकवणारे शिक्षक कमी झाले आहेत. ग्रामीण भागात कौशल्यविकासाच्या संधींचा अभाव आहे. भरवशाचा वीजपुरवठा नाही. अपेक्षेप्रमाणे रोजगार नाही. वैफल्यातून तरुणाई व्यसनाधीन झाली आहे. जातीयवाद आणि विषमता ह्या सामाजिक समस्या भेडसावत आहेत. बालविवाहाबरोबरच महिला सुरक्षेचे प्रश्न आहेत. दळवळणाच्या साधनांचा अभाव आहे. घराघरात कष्टत आयुष्य घालवणारे असहाय्य वृद्ध आहेत. यांसारख्या असंख्य प्रश्नांवर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

हल्ली मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटचा प्रसार वाढल्यामुळे डिजिटल व्यवहार सुरू झाले आहेत. काही ग्रामीण तरुण-तरुणी रीलस्टार बनून पैसे कमावीत आहेत, हे चित्र काहीसे सुखद असले, तरी कर्जबाजारीपणामुळे बापाने मुलीला ऑनलाईन क्लास करण्यासाठी मोबाईल घेऊन दिला नाही, म्हणून तिने याच परिसरात आत्महत्या केल्याची बातमी फार जुनी नाही. तरुणाई मोबाईलमध्ये डोके घालून स्वतःचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवीत आहे. पांढरपेशावृत्तीला शेती करणे नको वाटते आहे. खरंतर, प्रयोगशील शेती ही काळाची गरज आहे. भरकटत जाणार्‍या तरुणाईला दिशा देण्याचे काम गावपातळीवर सर्वच ज्येष्ठांना करावे लागेल. शाळा-महाविद्यालयांवरही मोठी जबाबदारी आहे. 

सध्याचा गावगाडा हा पारंपरिकता आणि आधुनिकतेचा समन्वय साधून वैश्विक विचारसरणीकडे हळूहळू वाटचाल करीत आहे.

हे आणि असे अनेक प्रश्न नवोदित लेखकांना खुणावतात. त्यांनी आपल्या साहित्यातून आजच्या ग्रामीण भारताचे हे विदारक वास्तव मांडणे गरजेचे आहे.

ग्रामीण महिलांचे आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरण आणि त्यांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण विकासाचे अनुभव साहित्यात येणे बाकी आहे. वाढत्या शहरीकरणाचे गावांवर दूरगामी परिणाम झाले आहेत. पर्यावरण पार बिघडले आहे. आपल्या जलस्रोतांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. वन्यजीवन आणि जैवविविधतेच्या संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. तरुणाई स्थलांतर करीत आहे. शिक्षण आणि रोजगारासाठी गाव सोडणार्‍या ध्येयवादी तरुणांच्या प्रेरणादायी कथा साहित्यात यायला हव्यात.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधून तयार होणारे ग्रामीण नेतृत्व, चढाओढीच्या पक्षीय राजकारणातून होणारा राजकीय संघर्ष आणि ग्रामीण समाजाचे दुभंगलेपण हे सारे चिंतेचे विषय आहेत. ग्रामीण संस्कृतीतील लोककथांचा, लोकसंगीताचा आणि लोककलांचा लोप होत चालला आहे. आपली मायबोलीही आपण जपली पाहिजे. हा पिढ्यान्पिढ्यांचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याची जबाबदारी आपलीच आहे.

आपल्या मराठवाड्यातच नव्हे, तर एकूण मराठी साहित्यात ग्रामीण लेखिका आणि कवयित्री यांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्या जीवन जगण्याच्या संघर्षातच इतक्या खचून, पिचून जातात, की रोजच्या धबडग्यात त्यांच्यासाठी साहित्यलेखन हे दुय्यम ठरते. याशिवाय त्यांना कुटुंबाकडून या कामी अपेक्षित सहकार्य मिळत नाही. अशा उदयोन्मुख ग्रामीण लेखिकांना अभिव्यक्त होण्याची संधी समाजाने द्यायला हवी. आजही तिच्या पावलांमध्ये आत्मविश्वास पेरण्याची गरज आहे. या संदर्भात मला दिवंगत कवी प्रा. भारतभूषण गायकवाड यांची कविता आठवते. त्यात किंचित बदल करून म्हणावेसे वाटते,

‘वाटा आपल्या नसतात,

पाय आपले असतात.

तुझी तू चालत राहा,

वाटा आपल्या करीत जा.’

स्त्री ही समाजाची ऊर्जा आहे. नवनिर्माणाची भूमी आहे. प्रबळ प्रेरणा आहे. स्त्रियांच्या सदर्भात आपल्या अवतीभोवती अनेक घटना घडत असतात. तीच कथा-कादंबर्‍यांची खरी बीजे असतात. ती शोधकवृत्तीने शोधा. लिहीत राहा. लगेच छापून येईल न येईल, पण कागदावर नोंदवीत राहा, असे मला तरुणींना सांगावेसे वाटते.

ग्रामीण जीवनातही वेगवेगळे स्तर आहेत. जातीची अस्मिता दिवसेंदिवस अधिकच टोकदार होत आहे. ‘ग्रामीण भारत’ आणि ‘शहरी इंडिया’ यांच्यातील सामाजिक आणि आर्थिक अंतर भयंकर वाढले आहे. 

ग्रामीण भारतात बहुसंख्येने ‘नाही रे’ वर्ग आहे, तर इंडियात ‘आहे रे’ वर्ग वाढत चालला आहे. ‘नाही रे’ गटात नव्वद टक्के समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे. तो जन्मापासून मरेपर्यंत रोटी, कपडा और मकान मिळविण्यासाठी ऊर फुटेस्तो धावतो आहे; आणि ‘आहे रे’ गटाला सारे काही मिळूनही त्याची हाव संपतच नाही. गैरमार्गाने पैसे खाण्याचा भस्म्या रोग वाढतोच आहे. अशा शोषक आणि शोषितांच्या रस्सीखेचीत ग्रामीण भाग पार विस्कटून गेला आहे. औद्योगिकीकरणातून बलुतेदार आधीच बेकार झाले. शेती कशीबशी तग धरून होती. अशा पिचलेल्या ग्रामीण माणसांच्या आत्मभान आणि आत्मशोधाचे वास्तव चित्रण ग्रामीण लेखक-कवींच्या कलाकृतींतून अभावानेच घडते आहे.

माझ्या शेतकरी बांधवांनो, 

शहरातील सेठ-सावकार, पैसेवाले, बिल्डर्स तुमच्या जमिनीच्या तुकड्यावर नजर ठेवून आहेत. तुमच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन मातीमोल भावाने जमिनी गिळंकृत केल्या जात आहेत. आपल्या काळ्या आईला जतन करून ठेवा. कितीही संकटे आली तरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. घरातील आया-बहिणींना कुटुंबाच्या निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घ्या. त्यांना आर्थिक बाबी आणि बँकींग शिकवा. या भयावह झंझावातात त्या तुमच्यासोबत खांद्याला खांदा भिडवून काम करतील. अशा कणखर भूमिकन्या ग्रामीण कथा-कादंबर्‍यांच्या नायिका बनाव्यात, हे माझे स्वप्न आहे.

 ‘स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास’ असे सांगणारी आमची संत जनाबाई जितकी शांत आहे, तितकीच ती ‘डोईचा पदर आला खांद्यावरी। भरल्या बाजारी जाईन मी’ किंवा ‘मनगटावर तेल घाला तुम्ही’ अशी बंडखोर भाषा आपल्या अभंगात वापरते. पांडुरंगालाही शिव्या घालताना ती लिहिते-

‘अरे, अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या,

तुझे गेले मढे, तुज पाहुनि काळ रडे’

यातून तिची भेदक आणि तेजस्वी वाणी लक्षात येते. हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आमच्या ग्रामीण भागातही जनाबाई आणि बहिणाबाई निर्माण व्हाव्यात, असे मला वाटते.

एकदा एका लेखिकेला प्रश्न विचारला गेला की, ‘तुम्ही का लिहिता?’ तिने ताबडतोब उत्तर दिले, ‘मी माझ्या आयुष्याचा भोगवटा माझ्याच शब्दांत जगाच्या वेशीवर टांगण्यासाठी लिहिते’. ही अपरिहार्य अभिव्यक्ती तिची आंतरिक गरज आहे. एका हिंदी कवयित्रीने म्हटले आहे, ‘तू बोलेगी मुँह खोलेगी, तब ही तो जमाना बदलेगा।’ या ओळींतूनही स्त्रीच्या अभिव्यक्तीची अपरिहार्यता व्यक्त झालेली आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, ‘अत्त दीप भव!’ तूच तुझा दीप हो. स्वयंप्रकाशी हो. तू लिहीत राहा, बोलत राहा, तरच आपल्या प्रश्नांना वाचा फुटेल.

जागतिक हवामान बदल, बेभरवशाच्या शेतीचे बिघडलेले गणित, स्त्रियांवर होणारे अन्याय-अत्याचार, बेकायदेशीर आणि अनियंत्रित वाळू उपसा, तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता, मुलींचे सर्व स्तरांवर होणारे शोषण, स्त्रीभ्रूणहत्या, शिक्षणाचे बाजारीकरण, एज्युकेशन मॉलमधील भरमसाठ फीस, आरक्षणासाठीचा आक्रोश जातीजातींमध्ये आणि धर्माधर्मांमध्ये वाढलेले वितुष्ट, कर्मकांडात आणि अंधश्रद्धेत गुंतत चाललेला बहुजन समाज, बाबाबुवांचे वाढते प्रस्थ, राजकारणामुळे गावागावात होणारी भांडणे, मारामार्‍या, कोर्टकचेर्‍या, मुलामुलींचे व्यस्त प्रमाण आणि त्यामुळे लग्नाळू मुलांना मुली मिळण्यातील अडचणी, बाह्य जगाच्या आकर्षणापोटी मुलींच्या नवर्‍या मुलाकडून अवाजवी अपेक्षा, ‘शेती करणारा, शेतकरी नवरा नकोच’ ही भूमिका घेतलेल्या लग्नाळू मुली, शाळा-कॉलेजला जाताना शिक्षणावर लक्ष न देता इतर फसव्या गोष्टींत रमून आई-वडिलांची फसवणूक करणारी मुले, हतबल म्हातार्‍या जिवांची होणारी ससेहोलपट, शेतीमालाला योग्य भाव न मिळणे, पाणीटंचाई अशा कितीतरी प्रश्नांवर लेखन करण्याचे आजच्या लेखकांसमोर मोठे आव्हान आहे. आता आम्हाला बदलायलाच हवे. प्रतिकूलतेशी लढून स्वतःचे साम्राज्य इमानदारीने उभे करणारा नायक कथा-कादंबर्‍यांतून उभा करणे ही काळाची गरज आहे.

माझ्या आयाबहिणींनो, 

आता आपले ‘रांधा-वाढा-उष्टी काढा’ इतकेच मर्यादित कार्यक्षेत्र राहिलेले नाही. हे कार्यक्षेत्र खूप विस्तारले आहे. व्यापक झाले आहे. यासंदर्भात आज मी तुम्हाला पुणे जिल्ह्यातील एका खेड्यातील तरुणीच्या कर्तबगारीचा किस्सा सांगणार आहे. तिचं नाव आहे नूतन विकास टेमगिरे. नूतन ही एका अल्पभूधारक शेतकर्‍याची मुलगी आणि एका अल्पभूधारक शेतकर्‍याची सून आहे. ती बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर शिकली आहे. तिचे पती स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात राहतात. शेतीत काही नवीन प्रयोग करायचे, शेती सुधारायची म्हणून ती आपल्या खेड्यात राहते. गावी तिच्यासोबत तिचे सासूसासरे आहेत. नूतनला दोन वर्षांची मुलगी आहे. नूतनने ‘सारथी’ संस्थेच्या माध्यमातून फेब्रुवारी 2024मध्ये राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात 7 दिवसांचे ड्रोन पायलट प्रशिक्षण घेतले.

ड्रोन म्हणजे काय, माहीत आहे ना?

आपल्याकडे लग्नसमारंभात, सभासमारंभात व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी ते आपल्या डोक्यावरून चमकत फिरत असते. तेवढाच त्याचा उपयोग नसतो. ड्रोनचे आणखीही खूप काही उपयोग असतात. नूतनने शेतीत ड्रोनचा वापर करण्याचे प्रशिक्षण घेतले. तिला शेतीच्या आधुनिकीकरणासाठी शेतीत ड्रोनचा वापर करायचा होता. त्यासाठी तिला ड्रोन विकत घ्यायचा होता, पण ड्रोनची किंमत होती 10 ते 12 लाख रुपये. ही किंमत तिला परवडणारी नव्हती. म्हणून तिने आपल्या पतीच्या मदतीने दोन ते अडीच लाख रुपयांत ड्रोन असेंबल करून घेतला. त्यासाठी तिने आपले दागिने, स्त्रीधन गहाण ठेवून गोल्ड लोन घेतले.

बायकांना दागिने किती प्रिय असतात, हे आपल्याला माहीत आहे. पण नूतनने आपल्या उद्योग-व्यवसायासाठी दागिने गहाण ठेवताना अजिबात मागे-पुढे पाहिले नाही. कारण तिला तिच्या ध्येयाने झपाटले होते. तिला नवीन काहीतरी करायचे होते. जून 2024पासून तिने ड्रोनद्वारे पिकांवर फवारणीचे काम सुरू केले. केवळ आपल्याच गावात नाही, तर आसपासच्या 10 गावांत जाऊन ती ड्रोनद्वारे पिकांवर फवारणीचे काम करते. दररोज 15 ते 20 एकर शेतीवर ती फवारणीचे काम करते. तिला एकरी 500 रुपये मोबदला मिळतो. सासूसासरे आणि दोन वर्षांची लहान मुलगी यांची जबाबदारी सांभाळून ती हे काम करते.

सकाळी 7 वाजता ती शेतावर जाते आणि फवारणीचे काम करून दुपारी दीड वाजता घरी परत येते. त्यानंतर आपल्या कुटुंबाला वेळ देते. पुण्यात राहून शिकत असलेल्या पतीला ती दरमहा 15 हजार रुपये देते आणि उर्वरित उत्पन्नात घर चालवते. भविष्यात तिचे हे उत्पन्न आणखी वाढणारच आहे. नोकरीच्या मागे न धावता, ड्रोनद्वारे पिकांवर फवारणी करणारी नूतन ही महाराष्ट्रातील पहिली महिला आहे. नूतन म्हणजे नवीन. नूतनने चाकोरीबाहेरचे, नवीन काम सुरू करून आपले नाव सार्थ ठरविले आहे. आपली स्वतंत्र अशी वेगळी पायवाट निर्माण केली आहे. आपल्यातही अशा अनेक ध्येयवेड्या नूतन दडलेल्या आहेत. परिस्थितीपुढे रडतकुढत न बसता आपल्यातील कर्तबगार नूतनला जागवा. एक दिवस हे जग तुमच्या मुठीत येईल, हा विश्वास बाळगा. 

मैत्रिणींनो, नुकतीच मकर संक्रांत झाली आहे. आता आपण शिक्षणाचं आणि स्वावलंबनाचं ओजस्वी वाण लुटू या.

बंधू-भगिनींनो, मी एक आशावादी लेखिका आहे. आजच्या अंधारवाटांचे दुःख मला सतावत असले, तरी उद्याच्या प्रकाशवाटा मला खुणावत असतात. आजच्या अंधारवाटेवर कदाचित उद्या एखादी सौदामिनी, प्रकाशाची शलाका येईल आणि दुरितांचे तिमिर संपून जाईल, अशी उमेद बाळगून लेखन करणारी मी एक लेखिका आहे. म्हणूनच एका छोट्याशा कवडशावरही मला उद्याच्या प्रगतीचा भरोसा वाटतो. अनेक स्थित्यंतरांनी ढवळून निघालेले आजचे ग्रामीण जीवन न डगमगता आज ना उद्या काळाच्या छातीवर पाय देऊन समर्थपणे उभे राहील, असा मला विश्वास वाटतो.

प्रो. डॉ. सौ. मथुताई सावंत,

अध्यक्ष,

सातवे ग्रामीण साहित्य संमेलन, बरबडा,

जि. नांदेड.

टिप्पण्या