नवी दिल्ली, १९ जानेवारी २०२५: इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमच्या चकचकीत प्रकाशात आणि जल्लोषाच्या गजरात भारतीय पुरुष आणि महिला संघांनी खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून इतिहास घडवला! नेपाळला अंतिम सामन्यात पराभूत करत भारतीय संघांनी संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण मिळवून दिला व भारतीय पुरुष व महिला संघांनी प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमवर भारताचे नाव विश्वचषकावर सुवर्णअक्षरात कोरले. भारतीय खो-खो संघांनी एक अनोखा आणि गौरवास्पद इतिहास रचला आहे. भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी खो-खोच्या पहिल्या विश्वचषकात संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवत पहिले विश्वविजेतेपद पटकावले. महिलंच्या सामन्यात भारताने नेपाळवर ७८-४० असा ३८ गुणांनी विजय साकारला. पुरुष अंतिम सामन्यात भारताने नेपाळला ५४-३६ असा १८ गुणांनी पराभूत केले.
रोमांचक अंतिम सामना, प्रेक्षक थक्क
अंतिम सामन्यांमध्ये भारतीय संघांने आपल्या चपळ खेळाने प्रेक्षकांना थक्क केले. महिला संघानेही उत्कृष्ट संघभावना आणि अचूक रणनीतीच्या जोरावर नेपाळला हरवून सुवर्ण कामगिरी केली.
खेळाडूंचे अप्रतिम कौशल्य आणि जिद्द
भारतीय संघाचा विजय ही त्यांच्या अथक मेहनतीचे फलित होते. जलद चपळाई, अचूकता आणि जिद्दीने मैदानावर भारतीय खेळाडूंनी एकतर्फी वर्चस्व सिद्ध केले. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि कर्णधारांच्या नेतृत्वाने संघाने प्रत्येक क्षणाला सामर्थ्यपूर्ण प्रतिसाद दिला.
जागतिक पटलावर पारंपरिक भारतीय खेळाची ओळख
खो-खो या पारंपरिक भारतीय खेळाने जागतिक पातळीवर आपले अस्तित्व दाखवले आहे. हा विजय केवळ संघाचा नव्हे, तर भारतीय क्रीडा संस्कृतीचा मोठा विजय आहे. देशभरातून खेळाडूंचे कौतुक होत असून, हा क्षण पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवला जाईल.
संपूर्ण देशात जल्लोष
भारतात या विजयाचा उत्सव सुरू आहे. घराघरात टीव्ही स्क्रीनसमोर तासनतास खो-खोच्या सामन्यांचा आनंद घेतलेल्या चाहत्यांनी जल्लोष केला. खो-खो विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाचा विजय ही केवळ खेळातील नव्हे, तर भारतीय स्वाभिमानाची आणि परंपरेची जागतिक पातळीवरील विजयगाथा आहे!
सामन्याचा आढावा :
महिलांच्या अंतिम सामन्यात पहिल्या टर्नमध्ये भारतीय संघाने आक्रमण करताना नेपाळची पहिली तुकडी ५० सेकंदात, दुसरी तुकडी १.४८ मि. तर तिसरी तुकडी १.२० मि. बाद केली व चौथी तुकडी १ मि. पाचवी तुकडी ४५ सेकंदात तर उरलेले दोन खेळाडू ३४ सेकंदाच्या आत बाद करत भारताच्या खेळाडूंनी ३४ गुण मिळवले या वेळी कर्णधार प्रियांका इंगळे, रेश्मा राठोड यांनी चमकदार खेळी केली.
दुसऱ्या टर्नमध्ये नेपाळच्या पहाडी मुलींनी कमालीचा खेळ करत भारताच्या ड्रीम रन गुणसंख्येला वेसन घातले. नेपाळने भारताची पहिली तुकडी तीन मि. नंतर बाद केल्याने भारताला एक ड्रीम रन चैतरा बी ने मिळवून दिला. दुसरी तुकडी १.३९ मि. बाद करण्यात नेपाळला यश मिळाले. तर तिसरी तुकडी ५३ सेकंदाच्या आत तंबूत परतल्याने खरतर भारताला हा मोठा धक्का होता. त्यानंतर नेपाळने आपल्या आक्रमणाची धार वाढवून १.१३ मि. चौथ्या तुकडीला बाद केले. तर त्यानंतर पुढची तुकडी नाबाद खेळल्याने भारताने मध्यंतराला ३५-२४ अशी ११ गुणांची आघाडी घेतली होती.
तिसऱ्या टर्नमध्ये भारताने आक्रमणात नेपाळची पहिली तुकडी १.४२ मि. बाद करून जोरदार प्रतिउत्तर दिले तर दुसरी तुकडी ३३ सेकंदात बाद झाली. तिसऱ्या तुकडीला १.०७ मि. बाद करत भारताने मोठ्या गुणसंख्येकडे वाटचाल सुरु केली. चौथी तुकडी ५० सेकंदात कापून काढली. पाचवी तुकडी ५५ सेकंदात बाद करून नेपाळला जोरदार झटका दिला. तर सहावी तुकडी ३४ सेकंदात बाद करून नेपाळची आणखी एक झटका दिला. सातव्या तुकडीतील एक खेळाडू बाद करण्यात भारताला यश मिळाल्याने भारताने ७३-२४ अशी गुणांची नोंद केली. या वेळी नेपाळच्या दीप बी के ने चांगला खेळ केला.
चौथ्या टर्न मध्ये नेपाळने आक्रमण केले पण ते आक्रमण परतवून लावताने भारताच्या पहिल्या तुकडीने ५.१४ मि. वेळ देत नेपाळला सामन्यात पुन्हा परतण्याची संधीच न देण्याची किमिया साधली व हा सामना भारताने ७८-४० असा ३८ गुणांनी जिंकला.
भारताने साखळी फेरीत दक्षिण कोरिया, इराण आणि मलेशियावर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर बांगलादेशवर उपांत्यपूर्व फेरीत आणि दक्षिण आफ्रिकेवर उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
सामन्याचे पुरस्कार:
• सर्वोत्तम आक्रमक: अंशू कुमारी (भारतीय संघ)
• सर्वोत्तम संरक्षक : मनमती धानी (नेपाळ संघ)
• सामन्याची सर्वोत्कृष्ट खेळाडू: चैत्रा बी (भारतीय संघ)
महिला कर्णधार प्रियांका इंगळेची प्रेरणादायी प्रतिक्रिया:
"हा विजय केवळ आमच्या संघाचा नव्हे, तर प्रत्येक भारतीय महिलेच्या स्वप्नांचा विजय आहे. या विश्वचषकासाठी आम्ही महिनोंमहिने कष्ट घेतले, प्रत्येक खेळाडूने आपले १०० टक्के योगदान दिले, आणि आज त्या सर्व मेहनतीचं फळ मिळालं आहे. महिला कर्णधारानेही या विजयाला "महिलांच्या प्रगतीचा आणि देशाच्या गौरवाचा क्षण असल्याचे" म्हटले.
नेपाळसारख्या पहाडी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळताना दबाव मोठा होता, पण आम्ही एक संघ म्हणून उभे राहिलो आणि प्रत्येक क्षणी एकमेकांना पाठिंबा दिला. हा विजय आमच्या टीमवर्कचा आणि भारतीय महिलांच्या अस्मितेचा सन्मान आहे
खो-खो हा खेळ आमच्या परंपरेचा एक भाग आहे आणि आता तो जागतिक पातळीवर पोहोचला आहे, ही भावना खूप अभिमानाची आहे. प्रत्येक लहान मुलीला सांगू इच्छिते की, तुमचं स्वप्न कितीही मोठं असो, ते पूर्ण होऊ शकतं. फक्त मेहनत, विश्वास आणि जिद्द पाहिजे.
आज आम्ही इतिहास रचला, पण ही फक्त सुरुवात आहे. भारतीय महिलांचा खेळ प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर चमकणार, याची खात्री आहे. हा विजय प्रत्येक भारतीयासाठी समर्पित आहे."
- प्रियांका इंगळे, भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार
भारतीय पुरुषांची जोरदार कामगिरी.
भारताने सुरवातीपासूनच आक्रमक खेळ करताना नेपाळला जरा सुध्दा डोकं वर काढायला दिले नाही. पहिल्या टर्न मध्ये भारताने तब्बल चार तुकड्या बाद करून नेपाळला जोरदार धक्का दिला व या आक्रमणाच्या टर्नमध्ये भारताने २६-० असे गुण वसूल केले.
दुसऱ्या टर्न मध्ये नेपाळच्या आक्रमणात भारताची पहिली तुकडी २.४४ मि. संरक्षण करू शकली तर दुसरी तुकडी १.५९ मिनिटात बाद झाली. तर तिसऱ्या तुकडीतील खेळाडूंनी २.०२ मि. वेळ देत बाद झाली तर चौथी तुकडी नाबाद राहिली त्यामुळे मध्यंतराला २६-१८ असा गुणफलक दिसत होता.
तिसऱ्या टर्न मध्ये आक्रमण करताना भारताने नेपाळची पहिली तुकडी १.४९ मि. बाद केली तर दुसरी तुकडी १.१० मि. तंबूत परतली. तर तिसरी तुकडी अवघ्या ४५ सेकंदात बाद केली. चौथ्या तुकडीला १.०७ मि. बाद केले. पाचव्या तुकडीतील दोन खेळाडू बाद झाले. यावेळी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा गुणफलक ५४-१८ असे गुण दर्शवत होता.
चौथ्या व शेवटच्या टर्न मध्ये नेपाळने आक्रमणाला सुरवात केली व भारताची पहिली तुकडी दोन मिनिटात परतवण्यात नेपाळने यश मिळवले. तर दुसरी तुकडी २.१६ मि. बाद झाली तर तिसरी तुकडी २.01 मि. बाद झाली तर चौथी तुकडी नाबाद राहिली व भारताने हा सामना ५४-३६ असा १८ गुणांनी जिंकत विश्वचषकाला कवटाळले.
भारतीय संघाचा विजय प्रवास:
भारताने गट फेरीत ब्राझील, पेरू, आणि भूतान यांच्यावर प्रभावी विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशला आणि उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
सामन्याचे पुरस्कार:
• सर्वोत्तम आक्रमक: सुयश गरगटे (भारत)
• सर्वोत्तम संरक्षक : रोहित बर्मा (नेपाळ)
• सामन्याचा सर्वोत्कृष्ट खेळाडू: मेहूल (भारत)
-----------------------------------------------------------------------
सर्व सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येकी २ कोटी २५ लक्ष रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच थेट क्लास वन अधिकारी म्हणून नोकरी देखील राज्य शासनाच्या वतीने दिली जाणार आहे. – चंद्रजीत जाधव, सह सचिव भारतीय खो खो महासंघ.
------------------------------------------------------------------------
पुरुष कर्णधार प्रतीक वाईकरची उत्साहवर्धक प्रतिक्रिया:
"हा विजय आमच्या मेहनतीचे प्रतीक आहे. संपूर्ण भारतासाठी हा एक सुवर्ण क्षण आहे," असे पुरुष संघाच्या कर्णधाराने सांगितले. "आजचा दिवस केवळ माझ्या काराकीर्दीतालाच नाही, तर भारतीय खो-खोच्या इतिहासातील सुवर्ण दिवस आहे. हा विजय आमच्या संघाच्या अथक मेहनतीचा, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचा, आणि प्रत्येक भारतीयाच्या पाठिंब्याचा परिणाम आहे.
नेपाळसारख्या काटक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळताना आमच्यावर मोठा दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता, पण आम्ही जोरदार लढत देऊन दबावाला बळी न पडता नैसर्गिक खेळ करत विजय खेचून आणला. मैदानावर प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता, आणि आम्ही एकमेकांवर असलेला विश्वास शेवटच्या क्षणापर्यंत टिकवून ठेवल्यामुळेच हा विजय शक्य झाला.
"हा विजय फक्त संघाचा नव्हे, तर प्रत्येक भारतीयाच्या स्वप्नांचा विजय आहे," असे कर्णधाराने नमूद केले.
खो-खो हा खेळ आपल्या परंपरेशी जोडलेला आहे, आणि आज या परंपरेला जागतिक पटलावर नेण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. हा विजय केवळ आमचा नाही; तो संपूर्ण भारताचा आहे, ज्याने आम्हाला पाठिंबा दिला, विश्वास दाखवला आणि आमच्यावर प्रेम केले.
मी तरुण पिढीला एकच सांगू इच्छितो – तुमच्या स्वप्नांचा पाठपुरावा करा. मेहनत, जिद्द, आणि शिस्त यांचं महत्त्व कधीच कमी होत नाही. हा विजय प्रेरणा आहे की भारतीय खेळाडू कुठल्याही स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करू शकतात.
आजचा विजय भारतीय खो-खोला नव्या उंचीवर नेणारा आहे. हा विजय देशासाठी आहे, आणि भविष्यातही आम्ही अशीच कामगिरी करत राहू."
- प्रतीक वाईकर, भारतीय पुरुष खो-खो संघाचा कर्णधार

addComments
टिप्पणी पोस्ट करा