*मराठवाड्यातील शैक्षणिक दृष्ट्या नावाजलेल्या काही निवडक शैक्षणिक संस्थांमध्ये आडत व्यापारी शिक्षण संस्थेच्या देगलूर महाविद्यालयाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. या संस्थेच्या सचिव पदी नुकतीच नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ कर्मवीर ऊनग्रतवार यांची निवड झाली आहे. या निमित्ताने डॉ कर्मवीर यांच्या बद्दल माहिती देणारा हा लेख.*
देगलूर सारख्या तालुक्याच्या भागात तत्कालीन परिस्थिती व शैक्षणिक मागासलेपण पाहून ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी तथा समाजवादी, आर्यसमाजी नेते कै. पोशट्टीदादा ऊनग्रतवार यांनी 1963 साली आडत व्यापारी शिक्षण संस्थेची स्थापना केली. कै. पोशट्टीदादा यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामात अतिशय हिरारीने भाग घेतलेला असून शिक्षणाविषयी, समाजाविषयी व स्वतःच्या कर्तव्याविषयी असलेली जाणीव,आस्था व आत्मीयता यातूनच समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी आडत व्यापारी शिक्षण संस्थेची स्थापना करून देगलूर महाविद्यालयाची निर्मिती केली.अतिशय कडक शिस्तीचे एक सेवाभावी व्यक्तिमत्व अशी दादांची ख्याती होती. आजही पूर्ण महाराष्ट्रात देगलूर महाविद्यालयाची ओळख पोशट्टीदादा ऊनग्रतवार यांचे महाविद्यालय अशी आहे. या महाविद्यालयची एक वेगळी परंपरा होती.पण आता ती थोड्याफार प्रमाणात कमी झाली आहे असे वाटते. अनेक मोठमोठी मंडळी या महाविद्यालयाला प्राचार्य ,प्राध्यापक म्हणून लाभली आहेत. प्राचार्य हेमचंद्र धर्माधिकारी, प्राचार्य लक्ष्मीकांत तांबोळी आदींसारखी मोठ मोठी शिस्तप्रिय मंडळी या महाविद्यालयाला लाभली आहेत.या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी मराठवाडा, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात आपला व महाविद्यालयाचा नावलौकिक गाजवत आहेत.
सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल झालेला असून करोना काळानंतर शिक्षणाप्रती विद्यार्थ्यांची कमालीची निराशा, अनुत्साह व उदासीनता दिसत आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल झालेला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळी आव्हान निर्माण झालेली आहेत.
एकेकाळच्या अतिशय नावाजलेल्या या संस्थेच्या सचिव पदी नांदेड जिल्ह्यातील जेष्ठ हृदयरोग तज्ञ डॉ कर्मवीर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे.डॉ कर्मवीर यांची संस्थेच्या सचिवपदी निवड होणे म्हणजे त्या शैक्षणिक संस्थेला व संस्थेतील विद्यार्थी व प्राध्यापकांना योग्य न्याय मिळणे होय असे मी मानतो.डॉ कर्मवीर हे एक अभ्यासू , तज्ञ व्यक्ती असुन त्यांना दुरदृष्टी आहे.
अतिशय कडक शिस्तीचे वडील व वडिलांच्या ठाई असलेली निस्सीम भक्ती,त्यांच्याप्रती आदर व त्यांच्या संस्काराच्या जडणघडणीतून डॉ कर्मवीर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर 35 ते 40 वर्षांपूर्वी नांदेडमध्ये आपल्या वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. ' कर्मवीर हॉस्पिटल 'या नावाने त्यांनी 24 ऑगस्ट 1989 रोजी रेल्वे स्टेशन जवळ डॉक्टर लेन येथे आपली वैद्यकीय सेवा सुरू केली.
सुरुवातीच्या काळात वैद्यकीय सेवा अतिशय सेवाभावी वृत्तीची व सन्मानाची म्हणून गणली जात असे. लोक डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप मानत असत. परंतु आजच्या काळात यातील सेवाभाव लुप्त झालेला दिसत आहे व हा एक व्यवसाय झालेला आहे.कोरोना महामारीनंतर तर लोक या व्यवसायाकडे अतिशय वाईट नजरेने पाहत आहेत याची कारणेही तशीच आहेत. हा वाईट काळ आपण सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे.मोठमोठी हॉस्पिटल बांधुन लोकांना सर्रास लुटले जात आहे. कुठल्याही आजाराचे व्यवस्थित निदान न करता पेशंटचे मानसिक व आर्थिक शोषण केले जात आहे.
पण याही काळात डॉ व्यंकटेश काब्दे, डॉ भायेकर, डॉ शिवाजी शिंदे, डॉ चिद्रावार, डॉ नंदकुमार मुलमुले, डॉ साहेबराव मोरे, डॉ पुरुषोत्तम दाड, डॉ एन भास्कर, डॉ मुखेडकर इत्यादी सारखी बोटावर मोजणी इतकी मंडळी अतिशय सेवाभावी वृत्तीने समाजाप्रती आपली सेवा देत आहेत.डॉ कर्मवीर हे त्यापैकी एक.डॉ कर्मवीर यांनी आपला सेवाभाव अजूनही सोडलेला नाही.
ग्रामीण भागातील गोरगरीब लोक देगलूर, नायगाव तसेच महाराष्ट्राच्या सीमेवरील तेलगू भाषिक लोक ही डॉ कर्मवीर साहेबांचे मुख्य पेशंट. मराठी,हिंदी,तेलुगु व इंग्रजी या चारही भाषांची डॉ कर्मवीर यांना उत्तम जाण आहे. आजच्या अतिशय महागाईच्या काळात गरीब लोकांना न परवडणारा अतिदक्षता विभाग अतिशय योग्य व अल्प दरात डॉ कर्मवीर साहेबांनी जनतेसाठी उपलब्ध करून दिला होता. डॉ कर्मवीर यांच्याकडे ग्रामीण भागातील एखादा गरीब माणूस पेशंट म्हणून तपासायला येतो तेव्हा त्याला माय, आजी, बापू ,बाबा अशा आपुलकीच्या शब्दांनी,अतिशय आपलेपणाने बोलतात हे मी पाहत आलेलो आहे. त्याचबरोबर रोगाबद्दल अचूक निदान करून त्या पेशंटला योग्य मार्गदर्शन करून व आस्थेवाईकपणे त्यांची चौकशी करून डॉक्टर त्या पेशंटच्या मनातील भीती काढून त्या पेशंटच्या मनात आपले स्थान कायमचे निर्माण करतात व त्यामुळेच की काय एकदा त्यांच्या दवाखान्यात आलेला पेशंट पुन्हा नक्की त्यांचा सल्ला घेतोच .दैवयोगाने डॉ कर्मवीर यांचे व्यक्तिमत्व अतिशय रुबाबदार असे आहे. एखाद्या चित्रपटातील नायका प्रमाणे ते दिसतात व त्यातूनच ते अतिशय गोड व आत्मीयतेने बोलतात.त्यामुळेच की काय त्यांचा मित्रपरिवार सुद्धा फार मोठा आहे. सर्वच क्षेत्रातील लोक त्यांचे मित्र आहेत. मी त्यांच्या पेक्षा वयाने खूप लहान असून सुद्धा मला ते एखाद्या मित्राप्रमाणे बोलतात हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. आमच्या कुटुंबाची त्यांचे अतिशय स्नेहाचे संबंध आहेत.नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील जवळपास सर्वच पक्षांचे नेते ,कार्यकर्ते त्यांचे नियमित पेशंट्स आहेत. डॉ कर्मवीर यांचा ईश्वरावर सुद्धा गाढ विश्वास आहे.अध्यात्मिक तसेच सर्व क्षेत्रातील पुस्तक वाचण्याची त्यांना आधीपासूनच खूप आवड आहे. पंढरीच्या वारीतून आलेला एखादा वारकरी जेव्हा सर्दी, खोकल्याने आजारी पडला तर डॉ साहेब त्यांना महिनाभर तुम्ही उन्हातानाच राहिलात एवढं तर होणारच व काहीही काळजी करू नका पांडुरंग तुमची काळजी घेईल, अशा पद्धतीने बोलुन मानसिक समाधान देत असतात. जो माणूस पंढरपूरची पायी वारी करतो त्याला कुठल्याही प्रकारचा आजार जवळही येऊ शकत नाही असं त्यांचं परखड मत आहे. जर एखादा पेशंट गंभीर असेल तर डॉ साहेब लगेचच त्यांच्या मित्र परिवारातील तज्ञ डॉक्टर मंडळी यांना बोलून त्यांच्या सोबत चर्चा करून, गरज पडल्यास त्यांना बोलावून मग त्या पेशंटला पुढील उपचार देण्यासंबंधी ठरवत असत व त्यांना योग्य ठिकाणी पाठवून तिथे डॉक्टरांना फोनवर बोलून मदत करतात.यातूनच 20 एक वर्षांपूर्वी त्यांनी डॉ साहेबराव मोरे,डॉ नारलावार, डॉ करडीले, डॉ बन यांच्या सोबतीने ' *धन्वंतरी न्यूरोकेयर'* ची स्थापना केली होती व सर्व जनतेची अतिशय माफक दरात व्यवस्था केलेली होती. डॉ कर्मवीर यांनी जातपात कधीही मानला नाही. मागील 35 वर्षापासून त्यांच्या दवाखान्यात शादुल्ला नावाचा एक कर्मचारी कार्यरत असून एखाद्या घरच्या माणसाप्रमाणे त्या कर्मचाऱ्याला वागणूक दिली जाते असे तो कर्मचारी स्वतः सांगतो. त्यांच्या दवाखान्यातील कर्मचारी यांना डॉक्टर सुखदुःखात मदत करतात. डॉक्टर साहेबांच्या अतिशय दिलखुलास व प्रेमळ स्वभावाने त्यांचे कर्मचारी सुद्धा पेशंट सोबत अतिशय आत्मीयतेने वागतात.डॉ कर्मवीर दरवर्षी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ देगलूर येथे कै. पोशट्टीदादा ऊनग्रतवार व्याख्यानमाला आयोजित करतात. त्या अंतर्गत महाराष्ट्रातील अतिशय नावाजलेले लेखक, वक्ते यांना बोलवून महाराष्ट्रातील अतिशय ज्वलंत प्रश्नावर व्याख्यान ठेवून समाजाला दिशा देण्याचे एक चांगले कार्य ते अविरतपणे करीत आहेत. दरवर्षी वैदकिय चर्चासत्राच्या निमीत्ताने मित्रांसह फिरायला जाणे हा कर्मवीर साहेबांचा आवडता छंद .जगभरातील बऱ्याच देशात त्यांनी भ्रमंती करून ते सदा प्रफुल्लित राहतात. डॉ कर्मवीर साहेब कधीही प्रसिद्धी किंवा पुरस्काराच्या मागे धावले नाहीत. वैयक्तिक आयुष्यात सुद्धा ते अतिशय समाधानी आहेत. त्यांच्या या कार्यात त्यांना नेहमीच सौ कर्मवीर मॅडम यांनी साथ दिली आहे . डॉ कर्मवीर यांचा मुलगा डॉ विवेक,मुलगी डॉ अपूर्वा, त्यांचे डॉक्टर जावई हे त्यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून वैद्यकीय व्यवसायात आपले नाव करत आहेत. डॉ कर्मवीर सरांसारख्या अशा प्रेमळ,मनमिळावू व अभ्यासू तज्ञ डॉक्टरांचे देगलूर महाविद्यालयाच्या सचिव पदी नियुक्ती झाल्यामुळे देगलुर महाविद्यालयाला एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण झाली आहे. निश्चितच यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीस फायदा होईल.
यापुढेहि डॉ कर्मवीर यांच्या कडून महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व समाज हित संबंधित कार्य होऊन त्यांना निरोगी दीर्घायुषी स्वास्थ लाभो हीच त्या जगत विधात्या पांडुरंग चरणी प्रार्थना.🙏🙏
*प्रा डॉ विजय नागोराव भोसले,*
यशवंत महाविद्यालय, नांदेड.
मो.9403067252

addComments
टिप्पणी पोस्ट करा