डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरचे माजी कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे यांचे दि.१ डिसेंबर रोजी दुःखद निधन झाल्याची वार्ता वाचून मन दुःखी झाले.
'साधी राहणी व उच्च विचारसरणी' या तत्त्वाची पाठराखण करून प्रत्यक्ष जीवनात त्याचा अंमल करणारे, उत्स्फूर्तपणे मनातील बोलणारे, चांगुलपणाच्या बाजूने सदैव भक्कमपणे उभे राहणारे एक शिक्षणतज्ञ, अभ्यासक, प्रशासक, विचारवंताने पृथ्वीचा निरोप घेतला. नैसर्गिक नियमानुसार प्रत्येकालाच मृत्यूचा सामना करावा लागणार; हे जरी मान्य केले तरी आपल्या अल्प आयुष्यातील पायवाट इतरांना मार्गदर्शकाप्रमाणे आकर्षित करेल; असे जीवन जगणे, यातच सार्थकता आहे. धर्म व अध्यात्म यामध्ये वारंवार हे सांगितले जात असले तरी त्याचा अंमल करणे साधी आणि सोपी गोष्ट नाही. डॉ. शिवराज नाकाडे या व्यक्तिमत्वाने मात्र आपल्या आयुष्यातील वाटचाल, विचार, कार्य व सहवासातून हे सार्थ केले आहे.
प्रस्तुत लेखकास १९९४- १९९५ या शैक्षणिक वर्षी कुलगुरू डॉ.शिवराज नाकाडे यांचा विद्यापीठात सहवास लाभला. महाराष्ट्र विद्यापीठ कायदा: १९९४ नुसार विद्यार्थी संसदेचे वर्गप्रतिनिधी गुणवत्तेनुसार करण्याचा निर्णय घेतला आणि मी एम.ए.राज्यशास्त्र या द्वितीय वर्षी वर्गप्रतिनिधी झालो. १९९४ ते १९९९ हा डॉ.शिवराज नाकाडे यांचा विद्यापीठातील कुलगुरूपदाचा कालखंड. वर्गप्रतिनिधी झाल्यानंतर काही हितचिंतकांमुळे व विद्यापीठातील इतर मित्रांच्या आग्रहामुळे विद्यापीठ परिसराचा जनरल सेक्रेटरी पदावर देखील आरुढ झालो. सर्वात मोठा आनंद म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाल्यानंतरचा मी पहिला जी.एस. हे माझ्या आयुष्यातील सर्वात श्रेष्ठ, आनंददायी व अभिमानास्पद पद.
साहजिकच विद्यापीठाचा जनरल सेक्रेटरी झाल्यानंतर मा.कुलगुरुंसोबत बैठका, त्यांचे मार्गदर्शन, विविध उपक्रम, स्नेहसंमेलन, युवक महोत्सव हे ओघाने आलेच. विद्यापीठ परिसरातील वर्ग प्रतिनिधी व जनरल सेक्रेटरी यांच्या प्रथम बैठकीत कुलगुरू डॉ.शिवराज नाकाडे यांच्या मार्गदर्शनाने सर्वच प्रभावीत झाले. कोणतेही पद हे कार्य करण्यासाठी, पदाच्या अनुषंगाने सेवा करण्यासाठी असते. माणसाने सदैव सक्रिय राहून समाजोपयोगी विविध उपक्रम राबवले पाहिजे; या त्यांच्या संदेशाने बैठक मंत्रमुग्ध झाली. प्राप्त झालेल्या पदाबरोबरच एका उच्च दर्जाच्या प्रशासकासोबत, अंतरंगात माणुसकी असलेल्या शिक्षणतज्ञासोबत वावरावयास मिळेल; ही संधी आनंद द्विगुणीत करणारी होती. या ठिकाणी आमचे गुरु मार्गदर्शक ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणीचे सेवानिवृत्त राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.सुनील शिंदे यांचे वाक्य स्मरणात आले," माणसाने मूर्ख माणसावर हुकुमत गाजविण्याऐवजी शहाण्या माणसाच्या प्रत्येक शब्दाची, भावनेची जोपासना करावी."
वर्षभरातील डॉ.शिवराज नाकाडे यांच्यासमवेतच्या सहवासातील अनेक प्रसंग व नंतरच्या कालखंडातीलही आठवणी आज स्मृती म्हणून मनात तरंगत आहेत. त्यातील काही निवडक स्मृतींना स्मरण करून डॉ.शिवराज नाकाडे यांना शब्दरूपी श्रद्धांजली देण्याचा हा प्रयत्न.
विद्यार्थी संसदेच्या हेडखाली असलेला सर्व निधी जनरल सेक्रेटरी म्हणून त्याकाळी मी विद्यार्थ्यांच्या हितासाठी, शैक्षणिक गरजांसाठी माझ्या स्वाक्षरीनिशी खर्च केला. प्रत्येक उपक्रमासाठी निधी खर्च करताना डॉ. शिवराज नाकाडे आणि संबंधित पदाधिकारी माझ्यासमवेत चर्चा करीत, मार्गदर्शन करीत व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अंतिमतः माझा निर्णय मान्य करून उपक्रम राबविण्यासाठी परवानगी देत असत. दिव्यांग विद्यार्थ्यांना शेअर, स्टीक, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणविषयक आर्थिक मदत, स्नेहसंमेलन अशा उपक्रमांचा त्यात समावेश असे.
नामांतरानंतर विद्यापीठात स्नेहसंमेलन झाले व आमचे मित्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील माध्यमशास्त्र संकुलाचे विद्यमान संचालक डॉ.राजेंद्र गोणारकर, मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथील इतिहासतज्ञ डॉ.देवेंद्र इंगळे, डॉ. विजय पाईकराव, डॉ.विनोद देशमुख, डॉ. अजित भांजी, संजय जाधव, डॉ. मिलिंद बुक्तरे, डॉ.सुरेश शेळके, दत्ता जगदाळे, विद्यमान चित्रपटतारका गीता अग्रवाल (शर्मा), डॉ.भास्कर गायकवाड, मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर, प्रा.डॉ.संदीप व्ही.शिंदे यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील नामवंत कवी नारायण सुर्वे यांना स्नेहसंमेलनासाठी पाचारण करण्यात आले. कवी नारायण सुर्वे यांच्या क्रांतिकारी कवितांनी, विचारांनी स्नेहसंमेलन अविस्मरणीय ठरले. या स्नेहसंमेलनासाठी डॉ. शिवराज नाकाडे यांचे सहकार्य विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत करणार होता. स्नेहसंमेलनातील उपक्रमांनी सरांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून येत होते.
आणखीन एक उल्लेखनीय प्रसंग असा की, मा. कुलगुरू, विद्यार्थी प्रतिनिधी आणि प्राचार्यांच्या बैठकीत माझे मामा लॉ कॉलेज, बीडचे सेवानिवृत्त प्राचार्य रामराव शिंदे यांची उपस्थिती होती. या बैठकीत ते मला विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करताना पाहून आश्चर्यचकित आणि आनंदीत झाले. बैठक संपल्यानंतर त्यांनी कौतुकाने माझी पाठ थोपटली व डॉ.शिवराज नाकाडे यांच्यासारख्या कर्तृत्ववान कुलगुरूंच्या काळात जनरल सेक्रेटरी होणे आणि त्यांच्यासमोर मत ऐकण्याची व मांडण्याची संधी मिळणे, यासाठी भाग्य लागते. असे उदगार त्यांनी काढल्यामुळे आत्मसंतोष व आत्माभिमान या बाबींचा प्रत्यय आला.
डॉ.शिवराज नाकाडे हे कार्यक्रम छोटा असो की मोठा, विद्यार्थी संख्या कमी असो की जास्त; अशा अहंकारमय बाबींना जास्त महत्त्व देणारे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज विद्यार्थी वसतिगृह क्र.एक येथील विद्यार्थ्यांच्या गेट-टुगेदर व निरोप समारंभालाही येऊन विद्यार्थ्यांमध्ये सरमिसळ होत असत. कुलगुरू आणि विद्यार्थी असे अंतर त्यांनी आपल्या कार्यकाळात व नंतरही कधी ठेवले नाही. कोणतेही अंतर दरी, अढी निर्माण करते व सर्वांच्याच मनाची कवाड आपोआपच बंद करते; मात्र सरांचे आयुष्य आकाशात संचार करणाऱ्या मुक्त पक्षाप्रमाणे भासले. लपून-छपून याला काही सांगायचे, त्याला दुसरेच सांगायचे, विकासात स्पीडब्रेकर निर्माण करीत जायचे; अशा बाबी त्यांच्यापासून कोसो दूर होत्या. विद्यापीठ विद्यार्थी केंद्रित असावे, याचा केवळ भाषणातून उच्चार न करता व्यवहारात व प्रशासनात त्यांनी आणला.
वर्गप्रतिनिधी आणि जनरल सेक्रेटरी म्हणून आम्ही वेटिंग रूममध्ये असताना बाहेर दिग्गजांची यादी व गर्दी असली तरी ते जनरल सेक्रेटरी व वर्ग प्रतिनिधींना अगोदर दालनात प्रवेश देत असत; तसेच पुरेसा वेळही देत असत. विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडे घाई हा शब्द नव्हता.
समकाळात रसायनशास्त्र विभागात माझे दुसरे मामा डॉ.बी.आर. आरबाड कार्यरत होते. विद्यापीठाचे नियम, संकेत, सभागृह व बैठकीचे डेकोरम याविषयी त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले.
डॉ.शिवराज नाकाडे यांच्या शब्द व आवाजाला कर्तृत्वाची, प्रामाणिकतेची धार होती. 'कर नाही त्याला डर कशाला' या म्हणीचा प्रत्यय होता. स्वार्थ, अहंकार हे शब्द त्यांच्या आसपासही फिरकत नव्हते.
सर कुलगुरू म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर काही महिन्यांनी रेल्वे प्रवासात भेट झाली. मी डॉ. सुनील शिंदे यांच्यासोबत प्रवास करीत होतो. मला पाहताच सरांनी, "अजय कुठे जातोयस, ये बस इथे" असे म्हणून आस्थेवाईकपणे चौकशी केली. छाती अभिमानाने फुलून आली. भेटीनंतर डॉ. सुनील शिंदे लगेचच मला म्हणाले, "कुलगुरू पदावरील एवढ्या मोठ्या व्यक्तीने एका विद्यार्थ्याचे नाव लक्षात ठेवावे आणि आस्थेवाईकपणे जवळ बोलावून चौकशी करावी, हीच घटना माणसाच्या आयुष्यातील खरी संपत्ती आहे."
काही वर्षानंतर सरांची भेट दरभंगा (बिहार) येथे झाली. गांधी विचारांवरील राष्ट्रीय परिषदेत. तिथे देखील सरांचा सहवास, मार्गदर्शन, साधेपणा आणि सदोदित क्रियाशील राहण्याचा मंत्र पुन्हा मिळाला.
डॉ. शिवराज नाकाडे यांचे निधन म्हणजे एक शिक्षणप्रेमी, हाडाचे शिक्षक, उपक्रमशील प्राचार्य, व्यापक व उदार अंतःकरणाचे कुलगुरू, सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानवतेवर प्रचंड श्रद्धा व विश्वास असणाऱ्या गुरूचा अस्त होय. आपण नेहमी एक वचन उद्गारतो, मरावे परी किर्ती रुपी उरावे, हे वचन डॉ. शिवराज नाकाडे यांना तंतोतंत लागू पडते. सरांची कीर्ती दूर आसमंतात सदैव दरवळत राहील.
सरांना भावपूर्ण श्रद्धांजली!
*-डॉ.अजय गव्हाणे,*
राज्यशास्त्र विभागप्रमुख,
यशवंत महाविद्यालय,नांदेड
addComments
टिप्पणी पोस्ट करा